आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असमन्वयाचा बळी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आश्लेषा महाजन

चुकीचा निरोप गेल्याने झालेले गोंधळ आणि प्रत्यक्ष जीवनातले ‘संशयकल्लोळ’ व ‘मानापमान’ हे तर नाटकसिनेमांचेही विषय आहेत. सर्वच बाबतीत समन्वय नसेल तर त्या व्यवहारात कच्चा दुवा राहतोच. कालांतराने कच्च्या दुव्यामध्ये असमतोलाचे पाणी मुरल्यावर तो डोके वर काढतो आणि व्यवहाराचा डोलारा कोसळू लागतो. असमन्वयाची गुंतागुंत मानवी व्यवहारातही गोंधळ उडवते.

कुठल्याही व्यवस्थेमध्ये अनेक बाबी एकमेकींना जोडलेल्या असतात. त्यांच्या एकत्रित समन्वयातून व्यवस्था कार्यरत राहते. एखादी बाब कमकुवत, कुचकामी झाली, ढासळली, तर त्याचा परिणाम अन्य बाबींवर व पर्यायाने संपूर्ण व्यवस्थेवर होतो. हीच असमन्वयाची गुंतागुंत मानवी व्यवहारातही गोंधळ उडवते. घराघरात, कार्यालयात, व्यावहारिक  देवाणघेवाणीत, मित्रमंडळींमध्ये, समाजमाध्यमांमधील गावगप्पांमध्ये कुठेही हे घडत असते. कधी असे गोंधळ किरकोळ असतात, कधी खूपच गंभीर. ‘कानगोष्टी’चा खेळ हे याचे उत्तम उदाहरण. गोलात बसून हा खेळ खेळतात. “डाळ जरा जाड दळा” हा पहिल्या व्यक्तीने सांगितलेला निरोप शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचतो, तेव्हा होत्याचे नव्हते झालेले असते. सांगणाऱ्याचा निरोप, शेजारच्या ऐकणाऱ्याची श्रवणशक्ती, आकलनशक्ती, ऐकणाऱ्याची स्मरणशक्ती, ऐकलेले शब्द सांगण्याची हातोटी….ही मालिका पुढच्या पुढच्या व्यक्तीकडून प्रवाहित होते. “जाण जरा, जार खरा.”, “जाड रवा वाढ मला”, “टाळ मला, हार तुला” असे काहीही होत अखेरची व्यक्ती सांगते, “काळ भला, काळ बुरा…!” मग हास्यकल्लोळ होतो. चुकीचा निरोप गेल्याने झालेले गोंधळ आणि प्रत्यक्ष जीवनातले ‘संशयकल्लोळ’ व ‘मानापमान’ हे तर नाटकसिनेमांचेही विषय आहेत. सर्वच बाबतीत समन्वय नसेल तर त्या व्यवहारात कच्चा दुवा राहतोच. कालांतराने कच्च्या दुव्यामध्ये असमतोलाचे पाणी मुरल्यावर तो डोके वर काढतो आणि व्यवहाराचा डोलारा कोसळू लागतो. 

एखाद्या २५ मजली, टोलेजंग इमारतीचे उदाहरण आपण घेऊ. संपूर्ण इमारतीसाठी ज्येष्ठ अभियंता व निष्णात आर्किटेक्ट नेमला. प्रत्येक मजल्यासाठी एकेक उपअभियंता नेमला गेला. सर्वांच्या समन्वयासाठी वेळोवेळी बैठका होत होत्या. सौंदर्य, दर्जा आणि भक्कमपणा यासाठी ती कंपनी प्रसिद्ध होती. पण ५व्या मजल्यावरच्या एका फ्लॅटच्या दिवाणखान्याच्या स्लॅबला निकृष्ट प्रतीचे सिमेंट वापरले गेले. वाजवीपेक्षा जास्त वाळू घालून त्या मालाचे आकारमान वाढवण्यात आले. त्या वेळी इंजिनिअर आणि कंत्राटदार यांच्यात साटेलोटे झाले. संबंधितांनी गुपचूप भ्रष्टाचार करून थोडीफार माया कमावली. 

एकदोन कामगारांनी सिमेंट चांगले नाही, अशी तक्रार केली, तर त्यांचा आवाज बंद करण्यात आला. एका सत्शील गवंड्याने ते पापाचे काम सोडून तो निघूनच गेला. कालांतराने त्या विशिष्ट फ्लॅटला खूप ओल आली. ती ओल शेजारच्या फ्लॅटमधल्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचली. खालच्या फ्लॅटमध्ये तर चक्क पाणी टपकू लागले. काही काळानंतर संपूर्ण इमारतीला छोट्या-मोठ्या भेगा पडल्या. 

प्रचंड मोठ्या इमारतीच्या अपयशाची कारणे अर्थातच अनेक असतात. पाणी ५व्या मजल्यावर मुरत असले तरी १६व्या, २२व्या मजल्यावरच्या भलामोठा टेरेस-बगिचाही कारणीभूत असू शकतो. हवामान, पाऊसमान, सिमेंट कंपनी, स्लॅबवर पाणी मारणारे कामगार, रेनवॉटर हार्वेस्टिंग करणारे, वॉचमन…अशा अनेकांवर खापर फोडता येते. तात्पर्य, असमन्वयाचा गोंधळ कुणाचा बळी घेईल, ते कोणी कसे सांगावे?

लेखिकेचा संपर्क : ९८६०३८७१२३

बातम्या आणखी आहेत...