Magazine / राजाश्रयाशिवाय कला बहरत नाही?

कला सादर करणारा कलाकार जेवढा तयार असतो तेवढे प्रेक्षक ‘ तयार’ असतात का? 

आश्लेषा महाजन

Jun 18,2019 12:07:00 AM IST

हल्ली प्रत्येक लहान मोठ्या निमित्तानं, सार्वजनिक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. अनेक कलाकार त्यात कला सादर करतात. समाजातल्या विविध स्तरांतील आणि जीवनमान असणारी मंडळी असे कार्यक्रम आयोजित करतात. कला सादर करणारा कलाकार जेवढा तयार असतो तेवढे प्रेक्षक ‘ तयार’ असतात का?

भ्रष्ट नेत्यांनी, उद्योजकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात अनेक श्रेष्ठ कलाकार आपली कला सादर करतात. अशाच एका मैफलीनंतर मी एका ख्यातनाम गायकाला त्याविषयी छेडले. तेव्हा ते म्हणाले, “राजाश्रयाशिवाय कला बहरत नाही हो. हे सुदैव की दुर्दैव कळत नाही. खूपदा बिनडोक व अभिरुचीशून्य राजापुढे कला सादर करायची वेळ येते. तिथे मोजके दर्दी असतात. त्यांच्यासमोर कला पेश करता आली, हे समाधान मात्र मिळते.”
यासंदर्भातले इंग्लिश विधान मला आठवले- Performing before mad/fraud people is like a prostitution. It’s like a trap, neither you can avoid it, nor you come back...!


ते पुढे म्हणाले, “अर्थात, स्वान्तसुखाय, प्रसिद्धिपराङ््मुख मंडळी सन्माननीय अपवाद असतात. पण प्रसिद्धिपराङ््मुख राहायचे तर मग त्या कलेचे समाजासाठी काय योगदान? कलेचा स्रोत आत्मलुब्ध एकांतप्रियतेत लुप्त होणे, ही कलेची अपरिमित हानीच. कला ही पिढ्यांमधून प्रवाहित व्हायला हवी. त्यासाठी ती सतत अभिव्यक्त व्हायला हवी. त्या भ्रष्ट आयोजकांमध्ये जे कोणी जाणते प्रामाणिक असतील, त्यांच्यातून उगवेल निर्मळ काही. हा आशावाद तर कलेचा पाया असतो.”


मला जाणवले, काही सुचणे, लेखन, रियाज एकांतात होते. पार्श्वभूमीवर विश्व असते. सादरीकरण/मुद्रण/ म्हणजे लोकांत. इथे समाज समोर असतो. अगणित डोळे रोखलेले असतात. तिथे आपण विभागले/विखुरले/ वाटले जातो. गणिते बदलत जातात. ती बदलू द्यायची की नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न. सांस्कृतिक कार्यक्रम हा महागडा इव्हेंट असतो. जमाना जाहिरातीचा, बिंबवण्याचा आहे. हल्ली ‘पेड स्टेज’ ही नवी कन्सेप्ट लोकप्रिय होतेय! या गोष्टीकडे बघण्याचा ज्याचा त्याचा दृष्टिकोन असतो. महत्वाकांक्षा, अग्रक्रम, ऐपत व नैतिकता इत्यादी मुद्दे लक्षवेधी ठरतात. नैतिकता बदलती व व्यक्तिसापेक्ष असते. सोयीस्कर असते. एखाद्या आयोजक संस्थेला आपण भ्रष्ट वा दिखाऊ म्हणतो, तेव्हा आपण जीवनात निर्मळ आहोत का, कायदापालन करतो ना, हेही प्रश्न पोखरून काढतात.


ते मग म्हणाले, “सर्जनशील गोष्टी करणं, सातत्य नि दर्जा टिकवून ‘करत राहणं’ महत्त्वाचं. त्याची कधीतरी नोंद होते. लवकर अथवा उशिरा. ‘अरसिकेषु कवित्वनिवेदनम् शिरसी मा लिख मा लिख मा लिख’, ह्या सुभाषितानुसार भाग्य उजळले, तर सोन्याहून पिवळे.”

X
COMMENT