आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिव्यक्तीवरील सेन्सॉरशिप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आत्मचरित्र लिहिणारा लेखक ते स्वत:च्या दृष्टिकोनातून लिहितो. ते पूर्ण सत्य नसते. सत्यालाही अनेक कंगोरे असतात. काही गोष्टी आवृत, तर काही चतुराईने अनावृत होतात. म्हणजे सामाजिक इतिहासाचा एकाच बाजूचा हा झोत ठरतो. स्त्रियांवर तर वैयक्तिक, कौटुंबिक नि सामाजिक अभिरुचीचे, वाचकांच्या अप्रगल्भतेचेही निर्बंध असतात.

 

एका प्रथितयश लेखिकेला मुलाखतीत पत्रकाराने विचारले, “तुम्ही अद्याप आत्मचरित्र का लिहिलं नाही? लिहायचा विचार आहे का?” त्यावर स्मितहास्य करत त्या म्हणाल्या. “प्रत्येक लेखकानं आत्मचरित्र लिहिलंच पाहिजे, असं नाही. मला ते लिहावंसं वाटत नाही. व्यक्तिगत आयुष्यातील अनुभव जाहीरपणे मांडावेत, असं मला वाटत नाही. मला जीवनाविषयी काय वाटतं, ते माझ्या अन्य लेखनात वेळोवेळी आलंय की...” 

 

पत्रकाराचा पुढचा प्रश्न : “आत्मचरित्र ह्या साहित्यप्रकाराबद्दल तुमचं काय मत आहे?”  लेखिकेनं दीर्घ श्वास घेत उत्तर दिलं, “मराठीत जीवनदर्शन घडवणारी अनेक महत्त्वाची आत्मचरित्रं लिहिली आहेत. स्त्री-आत्मकथनांचे तर शंभर वर्षांहून अधिक काळापासूनचे मोठे दालन आहे. व्यक्तिगत अनुभवांच्या माध्यमातून माणूस, नाती, कुटुंब, समाज, तत्कालीन सामाजिक-राजकीय-आर्थिक परिस्थिती अशा परिमितींतून विहंगावलोकन करता येते. आत्मचरित्रे म्हणजे सामाजिक इतिहास सांगणारा दस्तऐवज. काही आत्मचरित्रे मात्र लेखकाच्या नजरेतून साकारल्यामुळे मीच कसा बरोबर, माझ्यावर कसा अन्याय झाला…एवढंच प्राधान्यानं सांगतात. ती एकांगी, एकारलेली वाटतात. त्याउलट स्वत:च्या गुण-दोषांचं, सुख-दु:खाचं, यश-अपयशाचं, औदार्याचं-स्खलनाचंही  जो चित्रण करतो, तो लेखक खरा नि धाडसी. ते आत्मचरित्र श्रेष्ठ.” 

 

मुलाखत पुढेही रंगत गेली. पण माझ्या मनातल्या मनात आत्मकथन सुरू झाले. काही लेखकांना आत्मचरित्र लिहावेसे वाटतच नाही. त्या साहित्यप्रकारासाठी त्यांची लेखणी सहज नसते. स्वत:विषयी लिहावे, अशी प्रत्येकाची वृत्ती नसते. आयुष्यातील अनुभव ते कधी कथानायकाला चिकटवतात, कधी अनुभवांची सरमिसळ करतात. पण आत्मचरित्र हा त्यांचा अग्रक्रमच नसतो. लेखकाने आत्मचरित्र लिहावे/लिहू नये याविषयीचे त्याचे स्वातंत्र्य आपण मान्य करतो. करायला हवे.  

 


पण काही लेखक-लेखिकांनी आत्मकथन लिहायची उत्कट इच्छा असूनही कुटुंबकलह, नातेसंबंधक्षती, लोकभय, चारित्र्य उघडे होण्याचे भय, संभाव्य कोर्टकचेऱ्या इत्यादी कारणांस्तव लिहिणे टाळले असल्याचेही दाखले आहेत. काही आत्मचरित्रांमुळे कुटुंबांची वाताहत झाल्याची, धमक्या-पत्रांनी झोप उडाल्याची उदाहरणे आहेत. लेखक आपल्या दृष्टिकोनातून लिहितो. ते पूर्ण सत्य नसते. सत्यालाही अनेक कंगोरे असतात. काही गोष्टी आवृत, तर काही चतुराईने अनावृत होतात. म्हणजे सामाजिक इतिहासाचा एकाच बाजूचा हा झोत ठरतो. स्त्रियांवर तर वैयक्तिक, कौटुंबिक नि सामाजिक अभिरुचीचे नि वाचकांच्या अप्रगल्भतेचेही निर्बंध असतात. अभिव्यक्तीवरील हे ज्ञात-अज्ञात दबाव, निर्बंध वा सेन्सॉरशिप हा चिंतेचा आणि शोधाचा विषय होतो.  

बातम्या आणखी आहेत...