आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तासले गेलेले कंगोरे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माणसाचा स्वभाव, आवडी-निवडी, वागणं, विशिष्ट सवयी यावर भूतकाळाची सावली असतेच. भूतकाळानं हिरावलेलं, वर्तमान किंवा भविष्यात मिळाल्यास त्याचा भरभरून उपभोग किंवा मग भूतकाळात सुटून गेलेल्या गोष्टींबद्दल मनात अढी, कायमचा तिटकारा अशा दोन अगदी टोकाच्या वृत्ती पहायला मिळतात.  
 

बालपणी जशी जडणघडण होते, ज्या गावात नि वातावरणात मूल वाढते, ज्या खाण्यापिण्याच्या सवयी लागतात, शाळेत वा ‘बिनभिंतींच्या मुक्त विद्यापीठात’ जे शिक्षण घेतलेले असते, जे अनुभव मनात कोरले जातात, घरात जे संस्कार होतात, ते खूपसे पुढे वय वाढल्यावर टिकून राहतात. घर आणि माणसे अपत्याला घडवतात. मोठे झाल्यावर बालपणीची ही प्रतिबिंबे माणसाच्या वागण्यात उमटलेली दिसतात. उदा. सीमाला बालपणी फारशी चॉकलेट्स मिळाले नाहीत. परिस्थिती बेताची होती. त्याकाळी खेड्यात चॉकलेट्स उपलब्ध नव्हते. रानमेवा मात्र भरपूर खाल्ला. सीमा लग्न झाल्यावर सुस्थितीत- उच्च मध्यमवर्गीय घरात  आली. पण तिला आजही चॉकलेट तितकेसे आवडत नाही, त्याची क्रेझ नाही. चॉकलेटसाठी सैरभैर होणाऱ्या तिच्या मैत्रिणी पाहून तिला गंमत वाटते. 
काही जण बालपणी जे मिळाले नाही, ते आवर्जून  भरपूर उपभोगतात, खातात, पितात. अनुशेष भरून काढतात. उदा. क्षमाचे बालपण कोकणातल्या बाळबोध घरातले. ती, गरीब भिक्षुकाची लेक. भोवताली लहरी निसर्ग. दैनंदिन जीवनात अभावग्रस्तता, कष्ट आणि उपेक्षा.  लग्नानंतर ती शहरात आली. नवऱ्याचे घर श्रीमंत. घरात रसिक मंडळी. एका पार्टीत आयुष्यात पहिल्यांदा तिने पनीर खाल्ले. पनीर म्हणजे काय तिला माहीत नव्हते. बालपणी जे मिळालं नाही, ते ते ती हल्ली आवडीने खाते, पिते. मोबाईलवरच्या अ‍ॅपवर बघून चांगलेचुंगले बनवते व भरपेट खाते. मुगाचा शिराही खाते नि मॅगीही खाते. घरपोच ऑर्डर करून पिझ्झा खाते. सढळ हाताने तूप वापरते. गोडधोड खाते. 


काही जण जुन्या सवयी व नवा काळ यांची सांगड घालतात. आपले स्वत्त्व न सोडता नवे प्रवाह  स्वीकारतात. नवे काही त्यांना आवडू लागते व काही जुन्यालाही ते कुरवाळतात. उदा. ज्ञानू बालपणापासून खादीचे कपडेच वापरायचा. तो आजीआजोबांबरोबर, आईवडीलांबरोबर चरखा चालवत  असे.  कोल्हापुरी चपलांशिवाय त्याला कुठल्याच वहाणा  आवडत नसत. स्वदेशी वस्तूच वापरायचा. पण साठी आली आणि डायबेटिसने त्याला घेरले. डॉक्टरांनी त्याला बूट घालून चालण्याचा व्यायाम सांगितला. गड्याला कोल्हापुरी वाहणा सोडून बूट घालणे ही शिक्षाच वाटली. आधी कुरकुरत पण कालांतराने गॅंगरीनच्या भीतीने त्यांनी बुटात पाय सरकवले. ज्ञानूची मुलगी नि जावई सिमल्यात असतात. ज्ञानू  तिथे जातो तेव्हा स्वेटर, लोकरी कपडे घालावेत लागतात. ते स्वदेशी आहेत की विदेशी आहेत,याची उठाठेव करता येत नाही. कारण आधी थंडीपासून जीव वाचवणे महत्त्वाचे ठरते. तब्येत सलामत तो जिंदगी पचास! काळ माणसाचे कंगोरे तासून त्याला मऊ करतो नि शहाणपण शिकवतो, हेच खरे.

बातम्या आणखी आहेत...