आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाया पाणी नासतात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सकृत्दर्शनी बाया पाणी ‘नासतात’ असे जरी दिसले इतर मंडळी तिच्या ‘पापात’ सहभागी असतात!  पण हे त्यांना कळत नाही किंवा ते वेड घेऊन पेडगावला जातात. बायांना स्वयंपाक करावा लागतो, घराचे व्यवस्थापन करावे लागते, म्हणून बायांना पाणी लागते. त्या सुस्थापित घराचा उपभोग इतर सर्व घेतात. फवारलेली, माती लागलेली भाजी धुवायला पाणी लागते, ती स्वच्छ, हायजेनिक भाजी बाकीचे मिटक्या मारत खातात. 

 

गुरुवारी नळाला पाणी येणार नाही,” वर्तमानपत्रात बातमी होती. अलकाने बुधवारी रात्रीच जास्तीचे पाणी भरले. पाण्याने भरलेली ४/५ पातेली, हांडे, पिंप पाहून तिच्या नवऱ्याने- रमेशने मस्करी केली, “पाणी? की आणीबाणीच? बायांना फार पाणी लागतं नासायला…” तिचा दीर आणि सासराही सरसावला, “तर काय? बाया म्हणजे जलपऱ्याच! नुसत्या पाण्याशी खेळत राहतात.” दिराने मुक्ताफळे उधळली. अलका काही बोलली नाही, पण पिंपावर झाकण ठेवताना तिनं बोलबच्चन, ऐतखाऊ पुरुषांकडे रागीट कटाक्ष टाकला. सासरा घाबरल्यासारखे करत मिश्कीलपणे म्हणाला, “ह्या बायांचं पाणी काही निराळंच बरं का..!”


पुढच्या गुरुवारीसुद्धा पाणी येणार नव्हते. अलकाने गंमत करायची ठरवली. तिने स्वत:पुरते कळशीभर पाणी भरून ते ओट्याखाली दडवून ठेवले. दोन बादल्या भरून त्या वळचणीला झाकून ठेवल्या. “उद्या पाणी येणार नाहीय. पाणी भरून ठेवा. मी बाहेर चाललेय. रात्री उशीर होईल.” असे म्हणून ती शेतावर गेली. रात्री घरी आली तर पुरुषांनी पाणी भरले नसल्याचे ध्यानात आले. ती गप्पच राहिली. 


उन्हाळ्यामुळे अंघोळ करून झोपायची सासऱ्याला हुक्की आली, पण न्हाणीघरात पाणीच नव्हते. मग गुमान जाऊन झोपले. नवऱ्याला तांब्याभर पाणी लागते उशीपाशी, पण माठात पाणीच नव्हते. दुसऱ्या दिवशी अलकाने आपल्यापुरता चहा केला. प्रातर्विधी, अंघोळ व कपडे दीड बादलीत उरकले, अर्धी जपून ठेवली. उपवास असल्याने वाटीभर भगर करून आपला डबा भरला. 


चहा, नाष्टा, कपबशा, भांडी, पीठ मळणे, डाळ-तांदूळ धुणे, शिजवणे…ह्यासाठी पाणी लागते. हात, भांडी, ओटा स्वच्छ ठेवायला पाणी लागते. बायांना स्वयंपाक करावा लागतो, घराचे व्यवस्थापन करावे लागते, म्हणून बायांना पाणी लागते. त्या अन्नाचा, सुस्थापित घराचा उपभोग इतर सर्व घेतात. फवारलेली, माती लागलेली भाजी धुवायला २/३ पातेली पाणी लागते. ती स्वच्छ, हायजेनिक भाजी बाकीचे मिटक्या मारत खातात. सकृत््दर्शनी बाया पाणी ‘नासतात’ असे जरी दिसले इतर मंडळी तिच्या ‘पापात’ सहभागी असतात!  पण हे त्यांना कळत नाही किंवा ते वेड घेऊन पेडगावला जातात. 


अलका डबा घेऊन कामावर निघून गेली. तोंडचे पाणी पळाल्यावर घरच्या मंडळींनी गल्लीतल्या विहिरीवरून चार बादल्या आणि एक हंडा भरून आणला. शेतावर जाण्यापूर्वी रडतखडत त्याने पिठले-भात केले. ते करतानासुद्धा किती पाणी लागते, याचा अंदाज रमेशला आला. “बाया पाणी नासतात.” असे सरसकटीकरण करणारे विधान त्याने मागे घेतले. 
 

बातम्या आणखी आहेत...