आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नकली नोटा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आश्लेषा महाजन

भेसळ आणि बनावटीच्या आजच्या युगात अस्सल नेमकं ओळखायचं कसं हा प्रश्न सर्वांनाच पडतो. आपल्याला पारख करता येत नाही आणि लक्षात येईपर्यंत वेळ निघून गेलेली असते. अशा वेळी ‘नकली’ वस्तूसाठी होणारा त्रागा, मनस्ताप मात्र अगदी ‘असली’ असतो...


भाजीवाला तरुण बोलबच्चन होता. मी तीनशे रुपयांची भाजी घेतली. पाचशेची नोट दिल्यावर त्याने खुशीने सुट्टे दिले आणि दुसऱ्या क्षणी आवराआवरी करू लागला. मी पुढच्या फळवाल्याकडे बघेपर्यंत याने दुकान बंदही केले. फळांचीही खरेदी झाली. मी मगाचे मुठीतले दोनशे रुपये पुढे केले. त्याबरोबर फळवाला म्हणाला, “मस्करी करता का ताई? नकली नोटा आहेत ह्या! दुसऱ्या द्या नाहीतर गुगल-पे करा.” मी अवाक् झाले. मगाशी मला उल्लू बनवून घाईने दुकान बंद करून पोबारा करणाऱ्या त्या लबाड भाजीवाल्याचा चेहरा डोळ्यांसमोर आला. दुकान बंद करण्याची घाई त्याने का केली, याचाही अर्थबोध झाला. भाजीवाला नि फळवाला यांच्यात साटेलोटे असेल काय? आता त्या ‘जाली’ नोटांचे काय करायचे? बँकेत कुणाला तरी विचारावे आणि पोलिसातही सांगावे, असा विचार केला. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा त्या दुकानात ‘तहकीकात’ करायला गेले तर बोलबच्चनच्या जागी एक बिहारी भय्या पूजासाहित्य विकत होता. त्याने गोलमाल उत्तरे दिली. दिनचक्राच्या रामरगाड्यात विषय मागे पडला नि तो आमच्या ‘अक्कलखात्यात’ जमा झाला.एकदा मी एका सरकारी बँकेतल्या भल्यामोठ्या एका रांगेत उभी होते. माझ्यापुढे एक दूध विक्रेता बाबू होता. “आपलं हे रोजचंच काम. नोटा इथं द्यायच्या.” तो मला म्हणाला. त्याने नोटांची बंडले कॅशिअरला दिली. कॅशिअर रोजच्याप्रमाणे मशीनमधून नोटा मोजू लागला. त्यात ‘लाय-डिटेक्टर’पण असावे. कॅशिअरने चष्म्यातून संशयाने पाहिले नि त्याची उलट तपासणी सुरू केली. बंडलामध्ये दहा नकली नोटा होत्या. “माझा काहीच दोष नाही. मला कळलंच नाही, गिऱ्हाइकानी दिलेल्या ह्या नकली नोटा आहेत.” त्याने हात जोडले. बंदूकधारी वॉचमनने बाजूला बोलावून घेतले. त्याला एक भलामोठा किचकट फॉर्म भरायला दिला. माझे काम झाले तरी बाबूचे फॉर्म भरणे चालूच होते. बंदूकधारी त्याला जरब दाखवत होता. मी आणखी एका रांगेत उभी राहिले नि मग पार्किंगमध्ये आले तर बाबू तिथे भेटला. “केवढं झंझट! आधी कळलं असतं, तर फाडूनच टाकल्या असत्या नोटा. नुकसान झालं ते झालं नि वर माझ्यावर पोलिस केस करू म्हणाले बँकवाले…” 

“फाडायच्या कशाला? जरा शोध घ्यायचा नं त्या फसवणाऱ्या गिऱ्हाइकाचा. सापडला, कबूल झाला तर बरंच. त्याला धाक दाखवायचा. मग त्याच्याशी व्यवहार बंद करायचा.” मी म्हणाले.
“कोण कबूल करेल हो?” बाबू म्हणाला आणि फटफटीवरून निघून गेला.

आता तिसरा प्रसंग : 
दुसऱ्या एका बँकेतला. एका बुवाने दिलेल्या कॅशमध्ये नकली नोटा होत्या. बँकेतल्या बाईंनी त्यांना उजेडात धरून त्या दाखवल्या. “नोटा घेताना तपासून पाहत जा. बघा कसे नुकसान झाले तुमचे.” असे म्हणत बाईंनी नोटांना क्षणात कात्री लावली. तो चक्रावून पाहतच राहिला नि एकदम ओरडला, “अहो बाई, फाडताय काय नोटा? माझ्या नोटा फाडण्याचा तुम्हाला काय अधिकार? मी बघून घेतलं असतं ना त्यांचं काय करायचं ते. मी तुमच्याविरुद्ध पोलिसात तक्रारच करतो थांबा…” असे म्हणत तो तरातरा निघून गेला. 

बुवांना संताप का आला असेल? त्या त्यांनी नकली नोटा त्यात मुद्दाम घुसडल्या असतील काय? तो नकली नोटांचा छोटा दलाल असेल काय? वैतागलेल्या बाबूला नोटा फाडायच्या होत्या. बुवा फाडलेल्या नोटांमुळे संतापला होता. बाबूचा वैताग ‘असली’ तर बुवाचा संतापच ‘नकली’ वाटत होता. 

लेखिकेचा संपर्क : ९८६०३८७१२३