आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफीचा डंखा…

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अशोक आबुज
तसं सद्या दुख्ख पचवायचा लै खंबीर व्हता. याआधीही त्याच्या नशिबाला सरकारच्या एक्याही यवजनेचा लाभ मिळल्याला नव्हता. या वर्षी काहीबी करुन कर्ज माफ झालं फायजी म्हणून गेल्या सालासारखं कर्जाचं नवं-जुनं करण्याचं टाळलं व्हतं. 


दिसभर रानात काम करुन दमलेल्या सद्यानं कोट्याच्या पुढं टाकलेल्या बाजीवर आंग टाकलेलं होतं. त्याला कुठून तरी कर्ज माफीची कुनकुन लागली, तसा सद्या आळुके-पिळुके देत उठला आन् माचुळीच्या जौळ ठिवलेल्या गाडग्यातल्या पाण्यानं चूळ भरली, थोडं तोंडावरुन गार-गार पाणी आंबाळलं- चोंबाळलं आन् मारतीच्या पाराकडं सद्या जायला निघाला. धोतराच्या आच्या-कोच्या खवून धोतराच्या खालचा पदर तोंडात धरुन, सद्या ताड-ताड चालत व्हता. मदनरावाच्या कोट्यावरचं बांड्या कुत्रं इव्हळंत व्हतं. काही टायमानं टिवटिवीनंबी घायटा घालायला सुरवात केली. कुत्र्याचं इव्हळंन् आन् टिवटिवीचं घायटा करणं ह्ये कायतरी वंगाळ व्हण्याची लक्क्षण असल्याचं सद्याला माहीत व्हतं. त्याचा त्यावर ईस्वासबी व्हता. आता इतकी संकटं आलीचं आहेत. त्याच्यापेक्शा काय वाईट घडणारै म्हणून, त्याला याचं काहीच वाटतं नव्हतं. 
असं असंलं तरी कर्जमाफी ही त्याच्यासाठी चांगली व्हती. कारण गुदस्ता त्यानी कर्जाचं जुनं-नवं केलं व्हंत आन्, त्यामुळं कर्जमाफीच्या यादीमधी सद्याचं नाव आलं नव्हतं. त्यामुळं सद्या गेल्या सालापसून लैच बेजारीत व्हता. तरी सद्या न खचनारा शेतकरी असल्यानं त्यो खचून गेलेला नव्हता. त्यो निम्मीच लोकांना सांगायचा “त्याचे बायलीला समद्या लोकायच्या वावरात दुस्काळ पडलाय आन् मह्या एकट्याच्याच वावरात कसा पडला नाय कायनू.” असं म्हणून मनातल्या मनात वर-वरन्  कुढत रहायचा. त्यालाही वाटतं व्हतं की गेल्या सालातलं कर्ज जर माफ झालं असतं तर लै झ्याक झालं असतं. पण सद्यानं त्याच्या बोलण्या-वागण्यातून त्याला सरकारनं कर्जमाफी न दिल्याचं दुख्ख कधीही जाणवू 
दिलं नाही. 

तसं सद्या दुख्ख पचवायचा लै खंबीर व्हता. या आधीही त्याच्या नशिबाला सरकारच्या एक्याही यवजनेचा लाभ मिळल्याला नव्हता. या वर्षी काहीबी करुन कर्ज माफ झालं फायजी म्हणून गेल्या सालासारखं कर्जाचं नवं-जुनं करण्याचं टाळलं व्हत. सद्या आता मारतीच्या पाराच्या जौळ आला व्हता. गावात गल्ली-गल्लीत टोळक्यानी बसल्याल्ल्या बोडक्या टोप्या-पटकाधारी लोकायच्या मधून फक्त सद्याला कर्ज माफीचा शब्द फक्त ठळक स्वरुपात आयकायला येत व्हता. सद्याची नजर मारतीच्या पारावर बसलेल्या पाटलाकडं गेली. अन् बरेचसे लोक पाटलाच्या आसपासं गोंडा घोळीत असल्याचं सद्याला दिसलं. तसं त्यो पुढं गेला. पाटलाला रामराम घातला अन् त्यांच्या टोळक्यात शामील झाला. तसं कोण-काय काय बोलतंय त्याच्याकंड सद्याची कानं टवकारायला लागली. बराच टाईम झाला तरी कुणीच कर्जमाफीचा इषय काढीना म्हणून सद्यानंच त्या इषयाला गुळनी फोडली. 

“व्हयं, पाटील त्ये कर्जमाफी का काय ती सरकारनं केलीया म्हणं असं आयकीलंय, काय खरंय का ह्ये.” तसं पाटलांना त्यांच्या कुत्सितपणे बघत, हसण्याची सवय आवरता आली नाही. त्यांनी कुत्सितपणे नजर टाकीत सरकार तरी तुम्हाला काय-काय देणारै सद्या. मायला फुकट खायाला फायजी लोकायला असं म्हणत सद्याला पाटलानं गार केलं. आन् कर्ज माफीचा इषय फेटाळून लावला. पाटील कर्जाचा इषय निघाला अन चांगलाच गरम झाला व्हता. कारण पाटील ज्या पक्शाचं काम करायचा त्यो पक्श कधी काळी कर्जाच्या पायीच सत्तेतून पायउतार झालं व्हता, पाटलाची गावातल्या लोकायच्या वरची पकड मातर अजुकबी कायम व्हती. त्यामुळं पाटलांचा गावावर दरारा व्हता. त्यामुळंं कर्जमाफीच्या ईशयी बोलण्याची पुढं कुणाची हिम्मत झाली नाही. त्यानंतर बराच टाईम गावातच्या इकाडच्या-तिकाडच्या, बाजार-हाटाच्या गप्पा रंगल्या व्हत्या. तेवढ्यात गावचा कोतवाल इस्माइल तात्या मारतीच्या पाराकडं येतांना दिसला. तलाठी भाऊसाहेबांचा तात्या खास माणूस व्हता. त्याला तालुक्याची खबरबात पक्की माहीत असायची. त्यामुळं आख्या गाव त्यांना तात्या-तात्या करीत असायचा. तात्यांनी आज तालुक्यावरुन काहीतरी खबरबात आणली असणारै असं सद्याला वाटलं. तात्या मारतीच्या पाराच्या जौळ आला. पाटलाला रामराम घातला आन् सांगु लागला की, गावात उद्यांच्याला कर्ज माफीची दौंडी द्याला सांगीतलंय तशी सगळी कागदपत्र ब्यांकीत अन् तलाठ्याच्या हाफीसात जमा करायला सांगितंल गेलंय. असं सांगून झाल्यावर, पाटलांनी  तिथं गप्पा आयकतं बसलेल्या राम्याला सांगितलं की, दवंडी देणाऱ्या हलगीवाल्या हाऱ्याकडं जाऊन त्याला हालगी घेऊन ये म्हणावं, एक दवंडी देयचीय गावात. मी बोलविलंय म्हणून सांग, त्यावर लगेच राम्या हाऱ्याच्या घराकडं निघून गेला आन् काही टायमानं हाऱ्या व तो दोघंही मारतीच्या पाराकडं आले.

हालगीवाल्या हाऱ्यानं किलकारी आवाजात ईचारलं पाटील कसंली दौंडी देयचीय सांगा की, एक्या मिनटात देतू, पाटलांना इस्माईल तात्याला कसली दवंडी देयची ते विचारलं आणि  हाऱ्याला दंवडी देयला लावली की, येणाऱ्या बाजारा पस्तोर, ज्यायनी ज्यायनी कर्ज घेतलं त्यायनी त्यायनी आपली आपली आधारकर्डे ब्यांकीमध्ये जाऊन देऊन यायचं हो....... असं गावभर हाऱ्या हालगी वाजवू वाजवू सांगत व्हता. 

त्यानंतर सगळे आप-आपल्या घरी गेले. दुसरा दिवस उजाडण्याची वाट बघत. येत्या बाजारा पस्तोर म्हंजी गुरवार पस्तोर आता एकच दिवसं राहिला व्हता. कर्ज घेत असतांना समद्या गोष्टीवर सह्या अंगुठे घेऊन तर कर्ज देत्यात. आधारकार्डे पण त्या बरुबर अगुदरच घेतलेल्याली असत्यात. मग आता उगचं कशाला हे झ्यांगाट माघं लावलं असंल असं सद्याला वाटतं व्हतं. पण त्याचा ना-ईलाज व्हता. त्याला त्यी कागदपत्र ब्यांकीत तर द्यावीच लागणार व्हती. त्याच्या शिवाय त्याचं कर्ज माफ होईल का नाही यामुळ त्यो व्याकुळ व्हता. गेल्या सालातली कर्जमाफी त्याला मिळालेली नव्हती. म्हणून सद्यानं ह्या सालाला हाईगाई करायची नाही, असा इच्चार करुन दुसऱ्याचं दिशी ब्यांकीत जाऊन एकदाचं झ्यांगाट मिटवून टाकण्याचा ईच्यार केला व्हता.  गुरवारी सकाळी उठून, ब्यांकीत कागद जमा करायला जाणार व्हता. सकाळी उठुन जनावरांचे शेण-पाणी करुन नेहरी वक्ता पस्तोर सगळी कामं करून जनावरांची वैरण-काडी करुन त्यो ब्यांकीत जाणार व्हता. बैलायला वैरण टाकण्यासाठी त्यो गेला व्हता. तेवढ्या हारण्या गोऱ्यानं सद्याला मागुन ढुसनी दिली व सद्या वैरणीच्या गव्हाणीत जाऊन कोलमडून पडला. 

गव्हाणीची मेख त्याच्या पोटरीत घुसली व्हती. त्याला बैलांनं मारल्यानंतर त्याला आता दवाखान्यात जावं की, ब्यांकीत जावं हे कळत नव्हतं, गावातल्या एक-दोघांनी सद्याला त्याच दिवशी तालुक्याला दवाखान्यात नेहलं. तालुक्यातल्या डाक्टरानं जिल्य्याच्या मोठ्या दवाखान्यात जायला सांगितलं, महिनाभर दवाखान्यात राहुन सद्या वाचला. तो पर्यंत कर्जमाफीची यादी जाहीर झाली त्यात सद्याचं नाव नव्हतं. कारण सद्याचं आधारकार्ड ब्यांकेच्या खात्याला जोडल्यालं नव्हतं म्हणे.

लेखकाचा संपर्क - 9881051265

बातम्या आणखी आहेत...