आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घामाची किंमत शून्य...मृत्यूची एक लाख...

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अशोक आबुज

कुण्यातरी गावातल्या भल्या माणसांनं आडतीवरच्या साहेबांला तुम्ही चेक दिला नाही म्हणून तात्याचा टेन्शननी मृत्यू झाल्याचं बोललं जातंय असं सांगितलं. काही बला येऊ नाही म्हणून, तसं साहेबांना अख्ख्या गावाचे चेक दोन दिवसांत तयार केले. त्यात बाजीराव तात्याच्या नावाचादेखील चेक व्हता. त्याच्यावर रक्कम लिहिलेली व्हती पाच हजार रुपये.
बाजीराव तात्यांनी सरकारच्या अडतीवर तुरी घातल्याला दोन-तीन महिने झाले व्हते. त्या तुरीचा त्यानला कवा चेक मिळतु, ह्याची ते वाट बघत व्हते. दोन कुंटल अन काहीतरी किलु तुरी भरल्याच्या पावतीवर दिलं व्हतं. त्याच्यातही अडकण्या ३० किलु धरल्या व्हत्या. तसंच त्याच्या तुरीला तीन हजारापेक्षा कमी भाव लागला व्हता. तुराट्या अवकाळी पावसात भिजल्यानं त्या तुरीला कवडीची किंमत लागली नव्हती. आइन हांगामाच्या टायमाला तुर फुलोऱ्यात असताना पानधुई अन जाळधुई आली व्हती. त्याच्यामुळं तुरीची पान, फुलं, पाते, गळून गेली. उरल्या सुरल्या सुगीवर इगीन पडलं व्हत. त्येच्यामुळं तुरीच्या नुसत्या सणकाड्या दिसत व्हत्या. त्या तुरीच्या पिकासाठी बाजीरावांनी जिवाची बाजी लावीत गावच्या सावकाराकडून त्या तुरीची खुरपणी करण्यासाठी पाचीक हजार कर्ज घेतलं व्हत, आधीच कर्जाचा डोंगर डोसक्यावर असतांनी पुन्हा हे कर्ज त्यांनी घेतलं व्हतं. तेवढं बी कर्ज फकस्त मोल मजुरीवरच्या बायांच्या कामाचे पैसे देण्यासाठी म्हणजी त्या तुरीची खुरपणी करण्यासाठी गेलं व्हतं. पुन्हा त्या तुरीच्या ब्याची पिशवी, खताची पिशवी, कापणी, तुर बडवून खळं केल्याचा खर्च तसंच फवारणीच्या अवषधायाचा खर्च तर वायलाच राह्येला. हे समदं करुन तुरीचे किती पैकं येत्यात ह्याचीच चिंता बाजीरावाची डोस्क्यात घर करुन राह्येली व्हती.गावातल्या लोकाय परमानं बाजीराव तात्यांनी सुध्दा पैशाच्या चेकासाठी वाहना झिझिल्या व्हत्या. तरी त्या आडतीवरचा सायेब हिडीस-फिडीस व तोंड टाकून आपर-टपर बोलतू म्हणून त्याच्याकडं बाजीराव तात्याला तोंड घ्यावा वाटत नव्हतं. पण त्याचे केसं अडकल्यासारखे झाले व्हते. त्या सायेबाला काही उरफाट बोल्ल तरं आजुन महिना दिडमहिना पैशाचा चेक मिळायचा नाही. गावातला कचऱ्या असंच काहीतरी साहेबाला सहेज बोलायला गेला तर त्येजा चेक सहा महिने झालं तरी अजून दिलेल्ला नाही. म्हणून त्या साहेबाला सगळा गाव चळाचळा कापायचा. आपल्याच मालाचं हक्काचं पैकं घेयासाठी चोरागत खाली मुंडी घालून हूब राहावं लागतंय अन त्यो जोवर म्हणत नाही तोवर नुसत्या चकरा मारल्या बिगर काहीच गत्यंतर नसतंय हे बाजीरावाला चांगलंच उमगलं व्हतं. व त्याचा भयानक राग त्यांनला आला व्हता. असं असलं तरी, बाजार हाटाच्या निमतांना तालुक्याला गेलं तर तेवढंच पैकं मिळत्याल म्हणून अटपंधरा दिसाला जाऊन इच्चारपुस करायला लागायची. त्येज्यामारी माल देऊन चोर झाल्यासारखं वागावं लागतंय याचा बाजीरावाला लै राग यायचा. पण त्यो राग घटाघटा गिळून टाकायचा. कधी-कधी असल्या जगण्याला काय अर्थय असं त्याला वाटायचं. पण तसं वाटून तरी काय उपेग व्हता. ज्याचं त्येलाच भोगायचं असतं असं मनाला समजून सांगत त्यो स्वतःला सावरायचा.असंच बाजारचा दिवस व्हता. पालकुरातली रातची शिळी अर्धी भाकरं खावून पालकुर बाभळीच्या झाडाला बांधुन ठिवून तुरीचे पैकं मिळतैन म्हणून त्यो बाजाराच्या निमतांनं तालुक्याला गेल्ता. त्याच्या पैशाचं काय झालं म्हणून त्यो  त्या अडती वाल्याकडं गेला पैशाचं काय झालं असं साह्येबाला इच्चारलं तव्हा त्या साह्येब असं वसकला की इच्चारु नका. म्हणून तसंच मागल्या उरफाट्या पायांनी बाजीराव तात्या परत आला. आपलाचा पैका आपल्याला टायमाला मिळतं नाही ह्याचं त्यांनला लै  वाईट वाटतं व्हत. जड पावलांना तात्या गावाकडंच अंतर कापीत व्हता. पैका न मिळाल्यांन बाजारची पिशवी रिकामी हाताला अडकून ठिवल्याली व्हती. फाटलेल्या जोड्याचा फस-फस-का-चू-कु असा आवाज प्रत्येक पावला गणीक येत व्हता. दिवस मावळतीला जाऊन बराच वेळ झाला व्हता. कडूस पडंलं व्हंत. मध्येच सापाच्या सळसळण्याचा आवाज येत होता.  रात किड्यांची म्हणजी किरकिऱ्यांची किरकिरी सुरु झाली व्हती. मध्येच एखादं रानटी जनावर जवळून जात असल्याची भनक लागत व्हती, अशातच  बाजीरावाच्या बुटाचा असला भयावय आवाज वातावरणातील शांतता चिरुन भयावहता निर्माण करीत व्हता. तात्यांनी सकाळी खालेल्या अर्ध्या भाकरीशिवाय काहीही खालेल्ल नव्हतं. त्याला आता गावच्या रस्त्यांनं चालवलं जात नव्हतं. मध्येच त्याचे कल जायाला लागले व्हते. असं असलं तरी गावाच्या शिवारात  तात्या येऊन पोहचला व्हता. तेवढ्यात तात्याचा तोल गेला अन् अल्कल्म येऊन त्यो रस्त्याच्या कडीला पडला. जाणाऱ्या येणाऱ्यांनी त्यांच्याकडं लक्ष दिलं नाही कुणीतरी दारुड्या रस्त्याच्या कडीला दारू पिऊन पडला असावा म्हणून त्याची कुणीही इच्चारपुस केली नाही. अंगात भयानक ताप असल्यानं दरादारा घाम आला व्हता. आडरानात भवळ येऊन पडल्यानं त्याला कुणी उचलायलाबी नव्हता. बराच येळ त्यो तसाच पडून राहिला. काही टायमानी गंपु पाटलाची बैल गाडी बाजाराहून गावाकड येत व्हती. त्यांनी गाडीवानाला सांगुन तात्याला गाडीत उचलून ठिवलं तात्याचं अंग गार पडलं व्हतं, तात्या काही केल्यानं काहीच बोलत नव्हता. पाटलाची गाडी तात्याच्या दारावर आली त्याचा ह्यो अवतार अन दशा बघून त्याची बायको रकमा तिला डोळ्यातले आसू आवरता आले नाहीत. ती हमशा-धुमशा रडत व्हती. तात्या तिला सोडून गेला व्हता अगदी कायमचाच.तात्याला दिवसभर बिना अन पाण्याचं फिरुन-फिरुन उन्हाच्या कार्हामुळं तात्याला ताप आला व्हता त्यो ताप रात्रीतून त्यांच्या मेंदूत गेला अन तात्याचं व्हत्याचं नव्हतं झालं. दुसऱ्या दिशी गावातले लोक तात्याच्या तिरडीजवळ ओक्साबोक्सी रडत त्याच्या आठवणी काढू लागले. बाया-बापड्या रकमाच्या गळ्यात पडूनपडून रडु लागल्या. कशाला तालुक्याला तात्या गेल्ता यावर उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. कुणी म्हणायचं काही तरी पिला असंलं. पान लागलं असंल, कुणी म्हणायचं त्याला उन लागलं म्हणून गेला तर कुणी म्हणायचं साहेबांनी चेक दिला असता तर तात्या वाचला असता. अशी चर्चा होत असल्याचं कुण्यातरी गावात्या भल्या माणसांनं  अडतीवरच्या साहेबांला तुम्ही चेक दिला नाही म्हणून तात्याचा टेन्शननी मृत्यू झाल्याचं बोलंलं जातय असं सांगितलं. काही बला येऊ नाही म्हणून, तसं साहेबांना अख्ख्या गावाचे चेक दोन दिवसात तयार केले. त्यात बाजीराव तात्याच्या नावाचा देखील चेक व्हता त्याच्यावर  रक्कम लिहीलेली व्हती पाच हजार रुपये.शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यावर या आधीच्या सरकारणं शेतकऱ्यांचा विमा उतरुन त्याच्या कुटुंबाला एक लाखाची नुकसान भरपाई देण्याचं जाहीर केलेलं असल्यानं रकमाच्या नावानं पुढच्या महिन्याभरत एक लाख रुपयाचा चेक आला व्हता. बाजीराव तात्याला केवळ त्याच्या तुरीचे पैसे वेळेवर मिळाले नाहीत म्हणून आपला जिव गमवावा लागला व्हता. असे कित्येक बाजीराव असंख्या गावागावात आहेत. ज्यांच्या घामाला शून्य किंमत आहे.
लेखकाचा संपर्क - 9881051265

बातम्या आणखी आहेत...