आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
औरंगाबाद/ नांदेड/मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर होऊ लागले तसे राजकीय पक्षांत रणकंदन माजले असून चंद्रपूर मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार निवडीचा वाद विकोपाला गेला आहे. शिवसेनेचा आणि आमदारकीचा राजीनामा देणारे बाळू धानोरकर यांचे नाव चर्चेत असताना अचानक विनायक बांगडे यांचे नाव उमेदवारीसाठी जाहीर झाल्याने संतापलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आता मीच राजीनामा देण्याच्या मन:स्थितीत असल्याची व्यथा बोलून दाखवली. तो ऑडिओ शनिवारी व्हायरल झाला.
दरम्यान, औरंगाबादसाठी काँग्रेसने कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांची शिफारस केल्याने नाराज झालेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनीच बंडाचा झेंडा फडकवला आहे. दुसरीकडे उस्मानाबादेत आेमराजे निंबाळकर यांना शिवसेनेने ऐनवेळी उमेदवारी दिल्याने विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड समर्थक भडकले. जोवर गायकवाड यांना उमेदवारी जाहीर होत नाही तोवर अर्धनग्न राहण्याचा अर्थात बनियनवर राहण्याचा निर्धार शिवसैनिकांनी व्यक्त केला. या गोंधळात राहुल गांधी यांच्या विश्वासू वर्तुळातील नेते म्हणून ओळख असलेले राजीव सातव यांनी लोकसभा रिंगणातून माघार घेतली, तर प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यासह सोलापुरातून रिंगणात उतरण्याचा निर्णय जाहीर केला.
काँग्रेसने रात्री उशिरा जाहीर केलेल्या देशभरातील आणखी ३८ उमेदवारांच्या यादीत अशोक चव्हाण यांना नांदेडमधून उमेदवारी देण्यात आली आहे.
व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे काँग्रेसींना धक्का
चंद्रपूर मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार निवडीचा वाद विकोपाला गेला आहे. शिवसेनेचा व आमदारकीचा राजीनामा देणारे बाळू धानोरकर यांचे नाव चर्चेत असताना अचानक विनायक बांगडे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण संतापले. आपण आता राजीनामा देण्याच्या मन:स्थितीत असल्याची व्यथा त्यांनी बोलून दाखवली. यासंबंधीची एक ऑडिओ क्लिप शनिवारी व्हायरल झाली. चार दिवसांपूर्वी विरोध लक्षात घेऊन विशाल मुत्तेमवार यांनी रिंगणातून माघार घेतली. नंतर बाळू धानोरकर यांचे नाव चर्चेत होते. स्वत: प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे धानोरकर यांच्यासाठी आग्रही होते, असे सांगितले जाते. मात्र, मुकुल वासनिक यांनी विरोध दर्शवल्याने विनायक बांगडे यांचे नाव जाहीर झाले. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष चव्हाण संतापले. दरम्यान, 'माझे पक्षात कुणी ऐकत नाही... मीसुद्धा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहे,' असे संभाषण असलेला तो व्हायरल झालेला व्हिडिओ खरा आहे. पण तो खासगी आहे. हा व्हिडिओ सार्वजनिक व्हायला नको होता, अशी सारवासारव अशोक चव्हाण यांनी केली.
आ. अब्दुल सत्तार यांची पक्षाविरुद्ध बंडाची भाषा
सिल्लोड | औरंगाबादमधून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांची शिफारस पक्षाने मान्य न करता काँग्रेसची उमेदवारी आ. सुभाष झांबड याना जाहीर केल्याने काँग्रेसचे नाराज जिल्हाध्यक्ष आ. अब्दुल सत्तार यांनी बंडखोरीचा झेंडा फडकवला आहे. जनता व कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून आपणच निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
आमदारकीचा पूर्वीच राजीनामा...
मी ३६ वर्षांपासून राजकारणात आहे. माझ्या कामाची पावती मला आता माझे मतदार देतील. त्यामुळे मी थेट जनतेच्या दरबारात जायचे ठरवले आहे. मी आमदारकीचा राजीनामाही यापूर्वीच दिला आहे, असे अब्दुल सत्तार म्हणाले.
दिल्ली अशोकरावांचे ऐकत नाही, मी त्यांचे का ऐकू? :
प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण तुम्हाला अपक्ष म्हणून कसे लढू देतील, असे विचारले तेव्हा अब्दुल सत्तार म्हणाले, मी उमेदवारी मागितली होती. मी अशोकरावांकडे विचारणा केली तर ते म्हणाले, दिल्लीत माझेच कुणी ऐकत नाही. जर दिल्ली त्यांचे ऐकत नसेल तर मी अशोकरावांचे का एेकू, असा प्रतिप्रश्न अब्दुल सत्तार यांनी केला.
रवी सरांसाठी शिवसैनिक आक्रमक
विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांना ऐनवेळी डावलून माजी आमदार ओमराजे निंबाळकर यांना शिवसेनेने लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे संतप्त झालेल्या गायकवाड समर्थक शिवसैनिकांनी थेट उद्धव ठाकरे यांनाच इशारा दिला. सोमवारपर्यंत ओमराजे निंबाळकर यांची उमेदवारी रद्द करून पुन्हा गायकवाड यांना दिली नाही तर निष्ठावंत शिवसैनिक व पदाधिकारी सामूहिक राजीनामे देतील, असे इशाऱ्यात म्हटले आहे. यादरम्यान व्यासपीठावरच बाबाजी भोसले यांनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.
हिंगोलीमधून यंदा नाहीच : सातव
हिंगाेलीतून काँग्रेसचे खा. राजीव सातव या वेळी लढणार नाहीत. गुजरातकडे लक्ष द्यावयाचे असल्याने या वेळी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सातव यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.
अॅड. आंबेडकरांचे २५ रोजी दोन अर्ज!
अॅड. प्रकाश आंबेडकर सोलापुरातून २५ मार्चला अर्ज दाखल करतील. तसेच अकोल्यातूनही ते अर्ज भरणार असल्याची चर्चा असून त्यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर यांनी ही शक्यता नाकारलेली नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.