आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष मुलाखत अशोक चव्हाण : जिंकण्याचे सामर्थ्य असलेल्यांनाच काँग्रेस देणार उमेदवारी 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकांत भाजपला पराभूत करून सत्तारूढ झालेल्या काँग्रेसच्या गाेटात देशभरात उत्साहाचे वातावरण अाहे. महाराष्ट्रातील नेते, कार्यकर्त्यांमध्येही जाेश संचारला अाहे. अागामी लाेकसभा निवडणुकीत काेणत्याही परिस्थितीत खासदार संख्या वाढवण्याबराेबरच विधानसभेतही भाजपला सत्तेवरून खाली खेचण्याचा चंग काँग्रेसने बांधला अाहे. 'अागामी निवडणुकीत निवडून येण्याची क्षमता हाच उमेदवार निवडीचा पॅटर्न असेल,' असे प्रदेशाध्यक्ष अशाेक चव्हाण यांनी 'दिव्य मराठी'ला सांगितले. 

 

प्रश्न : उमेदवार निवडीची तयारी कुठपर्यंत अालीय? 
चव्हाण : राज्यातील पक्षाच्या जिल्हा समित्यांनी आपल्या मतदारसंघातील उमेदवारांची नावे प्रदेश काँग्रेसकडे कळवली आहेत. अाघाडीत कांग्रेसच्या वाट्याला येऊ शकणाऱ्या २६ मतदारसंघांतील नावांवर चर्चा झाली आहे. पण, ती निश्चित आहेत असे नाही. अजून निवड समितीचे काम बाकी आहे. जिंकण्याची क्षमता असलेला उमेदवारच निश्चित केला जाईल. इच्छुक उमेदवारांची नावे म्हणजे प्रदेश काँग्रेसची शिफारस आहे. अंतिम निर्णय केंद्रीय निवडणूक समिती घेईल. 

 

प्रश्न : काँग्रेस किती जागा लढवणार? 
चव्हाण : यासंदर्भातला अंतिम निर्णय अजून पक्षाच्या पातळीवर झालेला नाही.मात्र अाघाडीत सकारात्मक चर्चा हाेत अाहे. सुमारे ४०% काम झाले आहे. प्रत्येक बारीकसारीक बाबींवर चर्चा चालू आहे. मतदारसंघातील चेहरे बदलण्याचा प्रयत्न राहणार आहे. इतके नक्कीच की, लायक उमेदवारालाच उमेदवारी दिली जाणार आहे. 

 

प्रश्न : पक्षात इच्छुकांची संख्या वाढलीय? 
चव्हाण : काही लोकसभा मतदारसंघांत कुठे दोन, तीन तर कुठे चारपाच नावे आली आहेत. सात मतदारसंघांत एकाच नावाची शिफारस केलेली आहे. मुंबईतील तीन जागांवरची चर्चा बाकी आहे. लातूरमध्ये सर्वाधिक ५७ इच्छुकांची नावे आली आहेत. त्यावर एक समिती बसणार आहे. लातूरची सध्याची यादी आहे, शाॅर्टलिस्ट केली जाईल त्यानंतर याेग्य क्षमतेचाच उमेदवार निवडला जाईल. 

 

प्रश्न : घराणेशाहीचा प्रभाव यंदाही जाणवेल ? 
चव्हाण : राजकीय घराण्यातील उमेदवारांनाच पसंती असेल असे नाही. २६ मतदारसंघांची चर्चा केली आहे, पण अंतिम निर्णय झालेला नाही. केवळ शिफारस करण्याइतपत चर्चा झालेली आहे. ज्यांनी लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे, त्यांचे इलेक्टिव्ह मेरिट किती आहे, या निकषांवर नावे निश्चित केली जातील. जिल्हा समित्यांनी इच्छुक उमेदवारांची जी नावे पाठवली आहेत, त्याचे अॅप्लिकेशन आॅफ माइंड व्हायचे बाकी आहे. ते झाल्यानंतर हा प्रस्ताव दिल्लीला राष्ट्रीय नेत्यांकडे पाठवला जाईल. मुंबईच्या मतदारसंघातून इच्छुकांची संख्या अधिक आहे. त्याचे कारण मुंबईत काँग्रेसची स्थिती चांगली आहे. 

 

प्रश्न : अाघाडीचे जागावाटप अंतिम झाले का? 
चव्हाण : काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये बहुतांश जागावाटपावर एकमत झाले अाहे. मात्र काही जागा राष्ट्रवादीला हव्या आहेत, त्याच काँग्रेसलासुद्धा हव्या आहेत. त्यामुळे पाच-सहा मतदारसंघांबाबत अजून मतभेद आहेत. अदलाबदलीची कुठे गरज आहे, त्याचा शोध घेतला जातो आहे. त्याच्यावर विचारविनिमय व्हावा, अशी काँग्रेसची मागणी असणार आहे. 

 

प्रश्न : नगरच्या जागेवरून बराच खल सुरू अाहे? 

चव्हाण : अहमदनगर लोकसभा मतदारसंघावर दाेन्ही काँग्रेस दावा करत अाहे. तिथे जिंकणारा उमेदवार काँग्रेसकडे आहे. राष्ट्रवादीपेक्षा तिथे काँग्रेसची स्थिती अधिक भक्कम आहे. अहमदनगरची जागा काँग्रेसच लढवेल यात शंका नाही. 

 

मनसेशी अाघाडी नाहीच; प्रकाश अांबेडकरांशी चर्चा सुरू 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुलाच्या लग्नाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल आले होते. याचा अर्थ मनसे आमच्या महाआघाडीत येईल असे बिल्कुल नाही. मनसेचा तसा प्रस्ताव नाही. हा पक्ष अामच्यासेाबत येणार नाही. 

अॅड. प्रकाश आंबेडकर यांना महाआघाडीत घ्यायचे आहे. समविचारी पक्षांच्या मतांचे विभाजन होऊ नये, अशी भूमिका आहे. 
अॅड. आंबेडकर यांच्याशी ५ वेळा भेट झाली. त्यांना १२ जागा हव्या अाहेत. काँग्रेसला इतर मित्रपक्षांनाही जागा द्यायच्या आहेत. यातून मार्ग काढू. 

 

२ काेटी लाेकांना उत्पन्नाची हमी 
काँग्रेस निवडणुकीचा जाहीरनामा बनवण्यासाठी जनतेकडून सूचना मागवत आहे. हा जाहीरनामा सर्वसामान्यांचा असेल. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी गरिबांना किमान उत्पन्नाची हमी देण्याचे आश्वासन दिले अाहे. महाराष्ट्रात १७.४ टक्के (२ कोटी) लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत. ते या योजनेचे लाभार्थी असतील. जाहीरनाम्यात यासंदर्भात अधिक स्पष्टता येईल. 


 

बातम्या आणखी आहेत...