आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशोक चव्हाण विधानसभा लढणारच; पण कुठून?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण सध्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी भोकर विधानसभा मतदारसंघात दौरे वाढवत कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यात व्यग्र झाले. 


भोकर हा चव्हाण कुटुंबीयांचा पारंपरिक मतदारसंघ आहे. स्व. शंकरराव चव्हाण यांनी याच मतदारसंघातून विधानसभेवर प्रतिनिधित्व केले. राज्याचे ते दोनदा मुख्यमंत्री झाले. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र अशोक चव्हाणांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. जवळपास पाच विधानसभेच्या निवडणुका ते याच मतदारसंघातून लढले. सध्याही चव्हाणांच्या पत्नी अमिता चव्हाण या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. चव्हाण कुटुंबीय नांदेडमध्ये राहत असले तरी आजपर्यंत त्यांच्या कुटुंबातील कोणीही नांदेड शहरातून विधानसभा निवडणूक लढवली नाही. अशोक चव्हाणांना दिल्लीपेक्षा राज्याच्या राजकारणात जास्त रस आहे. त्यामुळेच त्यांनी लोकसभा निवडणूक लढण्यास नकार देऊन उमेदवारीसाठी अमिता चव्हाण यांचे नाव पुढे केले होते. लोकसभा निवडणुकीत पराजय झाल्याने त्यांना आता विधानसभेचा मार्ग मोकळा झाला आहे. 


वेगळीच चर्चा : भोकर हा चव्हाणांचा परंपरागत मतदारसंघ असला तरी लोकसभेत या वेळी त्यांना केवळ ४ हजार ७८६ मतांची आघाडी मिळाली. २०१४ मध्ये ती २३ हजारांहून अधिक होती. नांदेड उत्तरमधून  त्यांना ३० हजारांहून अधिक मताधिक्य मिळाले. त्यामुळे अशोकराव  या वेळी भोकरऐवजी उत्तरमधून निवडणूक लढतील अशी चर्चा आहे.   हा त्यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघ आहे, असे काही राजकीय तज्ञांचे मत आहे. तथापि लोकसभा निकालानंतर चव्हाणांनी भोकर मतदारसंघातील संपर्क जोरकसपणे वाढवल्याने भोकर की नांदेड उत्तर? हा संभ्रम सध्या  आहे. 


एका आमदाराचा पत्ता कटणार :  चव्हाणांनी कोणत्याही मतदारसंघाची निवड केली तरी काँग्रेसच्या एका विद्यमान आमदारांचा पत्ता कटणार हे निश्चित आहे. भोकर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सध्या अमिता चव्हाणांकडे आहे. अशोक चव्हाणांनी तेथून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास अमिता चव्हाण यांना उमेदवारी मिळणार नाही. नांदेड उत्तरची निवड केली तर विद्यमान डी. पी. सावंत यांना निवडणूक लढवता येणार नाही. यामुळे कोणातरी एका आमदाराला चव्हाणांसाठी आमदारकी सोडावी लागणार हे निश्चित. 

 

पक्षश्रेष्ठींचा आदेश काय? 
अशोक चव्हाण यांना याबाबत विचारले असता पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील त्याप्रमाणे काम करू, असे त्यांनी सांगितले.   भोकर मतदारसंघातील गावागावात सध्या त्यांनी संपर्क अभियान सुरू केल्याने ते भोकरमधूनच लढतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.