आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई : सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी बुधवारी मंत्रालयातील कार्यालयातून कामकाजास प्रारंभ केला आणि पहिला फोन लेकीला लक्ष्मी मानून टिकटॉकवर व्हिडिओ करणाऱ्या पित्याला लावला. चव्हाण यांनी मंगळवारी त्यांच्या व्हॉट्सअॅपवर आलेला टिकटॉकचा हा व्हिडिओ ट्विट केला होता. मूळ कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेले नागेश पाटील यांनी दोन आठवड्यांपूर्वी नवीन वाहन खरेदी केले होते. त्या वाहनाची पूजा करताना त्यांनी आपल्या दोन वर्षीय मुलीचे पाय कुंकवात बुडवून लक्ष्मीची पावले म्हणून त्यांची छाप नव्या गाडीच्या बोनेटवर उमटवली होती.
लेकीवरील अपार प्रेम व्यक्त करणारा हा व्हिडिओ अशोक चव्हाण यांच्या हृदयाला स्पर्श करून गेला. त्यांनी आपल्या ट्विटर आणि फेसबुकवर हा व्हिडिओ शेअर करून एक पिता म्हणून आपल्या भावनादेखील व्यक्त केल्या. आपल्या पोस्टमध्ये ते म्हणाले की, मोबाइलवर हा व्हिडिओ नजरेस पडला. मन भरून आलं. खूप कौतुक वाटलं त्या पित्याचं जो आपल्या नव्या गाडीची पूजा मुलीच्या पदस्पर्शाने करतोय. दोन मुलींचा बाबा असल्याने बाप-लेकीचं नातं काय असतं, त्यातील ओलावा काय असतो, याची मला जाणीव आहे. या बाप-लेकीला भेटायला मला नक्कीच आवडेल! अशोक चव्हाण यांची ट्विटर व फेसबुकवरील ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली. हा टिकटॉक व्हिडिओ तयार करणारे नागेश पाटील यांच्यापर्यंतही ती पोहोचली. रात्री उशिरा त्यांनी ट्विटरवरून चव्हाण यांचे आभार व्यक्त केले. चव्हाणांनी सकाळी ते ट्विट पाहिले.
नागेश पाटील यांचे केले कौतुक, भेटीचेही आश्वासन
सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून मंत्रालयातील कार्यालयात बसण्याचा त्यांचा पहिलाच दिवस होता. कार्यालयात पूजा करून स्थानापन्न झाल्यानंतर अशोक चव्हाण यांनी पहिला फोन नागेश पाटील यांनाच लावला. नागेश पाटील हे वाहनचालक असून, ते पुण्याला खासगी नोकरी करतात. चव्हाण यांच्या ट्विटला रात्री उशिरा उत्तर दिल्यानंतर सकाळीच त्यांचा फोन आल्याने ते देखील भारावून गेले होते. नागेश पाटील यांच्याशी केलेल्या संभाषणात चव्हाण यांनी या व्हिडिओ मागील भावनेचे कौतुक केले. त्यांच्या कुटुंबाची विचारपूस केली आणि कोल्हापूर किंवा पुण्याला आल्यावर नक्की भेटू, असे आश्वासनही दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.