आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानांदेड - स्व. शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचा थाटात प्रारंभ होत असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे काँग्रेस श्रेष्ठींनी पद काढून घेतले. लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाच्या धर्तीवर प्रदेशाध्यक्षपदाचा खांदेपालट होणार हे उघड होते. तथापि हा खांदेपालट करताना काँग्रेस श्रेष्ठींनी योग्य वेळ निवडली नाही.
स्व. शंकरराव चव्हाण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. त्यांनी प्रदीर्घ काळ काँग्रेस संघटनेत काम केले. राज्याचे दोनदा मुख्यमंत्रिपद, केंद्रात संरक्षण, अर्थ, नियोजन व गृह यासारखी महत्वाची पदे त्यांनी भूषविली. त्यांचाच वारसा घेऊन अशोक चव्हाण यांनीही काँग्रेसमध्ये अनेक वर्षे मंत्रिपद व दोनदा मुख्यमंत्री म्हणून काम केले. सध्या ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीला १४ जुलैपासून प्रारंभ होणार होता. जन्मशताब्दी संपूर्ण राज्यात साजरी करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला होता. त्यासाठी शिवराज पाटील चाकूरकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीही नेमण्यात आली. जन्मशताब्दी सोहळ्याच्या पूर्वसंध्येलाच काँग्रेस श्रेष्ठींनी अशोक चव्हाण यांच्या जागी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती केली. अशोक चव्हाणांनी लोकसभा निवडणुकीनंतर राजीनामा दिला होता. त्यामुळे नव्या पक्षाध्यक्षांची निवड धक्कादायक नसली तरी ज्यावेळी ही निवड करण्यात आली ती वेळ चुकली.
अशोक चव्हाण शंकरराव चव्हाणांचे सुपुत्र आहेत. प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्याच नेतृत्वात राज्यभर कार्यक्रम होणार होते. त्याचा शुभारंभ नांदेड येथेच होणार होता. पूर्वसंध्येला माहीत असलेले व माहीत नसलेले शंकरराव चव्हाण, या विषयावर ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचे व्याख्यानही आयोजित करण्यात आले. तो कार्यक्रम संपल्याबरोबर अशोक चव्हाण यांच्या जागी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती, अशा बातम्या वृत्तवाहिन्यांवर झळकल्या. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांत निराशा पसरली. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून जवळपास दीड महिना लोटून गेला. त्यामुळे अजून एक दोन दिवस उशिरा जरी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती झाली असती तर काही बिघडले नसते. किमान शंकरराव चव्हाणांच्या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमानंतर ही नियुक्ती जाहीर करायची, अशी प्रतिक्रिया काँग्रेस गोटात व्यक्त झाली.
मराठवाड्यात परिणाम होणार
आगामी विधान सभा निवडणुकीच्या दृष्टीने विचार केला तर अशोक चव्हाण यांचे प्रदेशाध्यक्षपद गेल्याने मराठवाड्यात विधानसभा निवडणुकीवर त्याचा परिणाम होणार, अशी चर्चा आहे. काँग्रेस सध्या अडचणीत आहे. मराठवाड्यातून काँग्रेसला काही जागा मिळाल्या असत्या. चव्हाणांचा लोकसभेत जरी पराभव झाला तरी त्यांच्यासारखा मास-बेस दुसरा नेता काँग्रेसकडे नाही. त्यात आता मराठवाड्याकडे असलेले प्रांताध्यक्ष पदही गेल्याने त्याचा परिणाम कार्यकर्त्यांच्या मनोबलावर होऊन त्याचा फटका निवडणुकीत बसणार, अशी काँग्रेस गोटात चर्चा आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.