आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप नेत्यांची सत्तेची मस्ती जनताच उतरवेल : चव्हाण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दर्यापूर, अमरावती  - संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना दुष्काळी उपाययोजना करण्याऐवजी सरकारमधील मंत्री बेताल वक्तव्ये करून जनतेची क्रूर थट्टा करत आहेत. चार वर्षे भ्रष्टाचाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैसा कमावल्याने भाजपचे मंत्री मस्तवाल झाले आहेत. आगामी निवडणुकीत पराभवाची धूळ चारून जनता भाजपच्या नेत्यांची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. काँग्रेसच्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेच्या चौथ्या टप्प्याच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात गुरुवारी अमरावती येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली. 

 

जनसंघर्ष यात्रा दर्यापुरातील बसस्थानक चौकात पोहोचल्यावर प्रमुख नेत्यांनी संविधानाची प्रत ठेवलेली पालखी खांद्यावर घेऊन संविधान बचाओ दिंडी काढली. या संविधान बचाओ दिंडीत हजारो नागरिक सहभागी झाले होते. या वेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री वसंत पुरके, आ. वीरेंद्र जगताप, आ. यशोमती ठाकूर यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. चव्हाण म्हणाले , संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय. लोकांना प्यायला पाणी नाही. जनावरांना चारा नाही. अनेक भागांत रब्बीची पेरणीच झाली नाही. त्यामुळे वर्ष कसे काढायचे, पशुधन कसे जगवायचे, या विवंचनेत असलेले राज्याभरातील शेतकरी चारा छावण्या सुरू करण्याची मागणी करत आहेत. त्यांच्या मागण्या मान्य करून दुष्काळी जनतेला दिलासा देण्याऐवजी मंत्री राम शिंदे चारा नसेल तर जनावरे नातेवाइकांकडे नेऊन सोडा, असे शेतकऱ्यांना सांगत आहेत. त्यांचे हे वक्तव्य दुष्काळी जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे. सत्तेची मस्ती डोक्यात गेल्यामुळे भाजप नेते, अशी उद्दाम भाषा बोलत आहेत. जनता यांची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही. शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, तरुण विद्यार्थी, दलित, आदिवासी अल्पसंख्याक, व्यापारी असे सर्वच घटक सरकार नाराज आहेत. वारंवार रस्त्यावर उतरून आंदोलने करत आहेत. एकही समाजघटक सरकारच्या कामावर समाधानी नाही. त्यामुळे हे सरकार कोणासाठी काम करते आहे? भ्रष्टाचाऱ्यांना क्लीन चिट देणे एवढेच या सरकारचे काम आहे, असेही चव्हाण म्हणाले. 

 

संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न : पृथ्वीराज चव्हाण 
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, देशाच्या अर्थव्यवस्थेचे सरकारने वाटोळे केले आहे. स्वायत्त संस्थांवर संघाशी संबंधित लोकांच्या नेमणुका करून संस्था ताब्यात घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मोदींची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू आहे. माजी मंत्री वसंत पुरके, आ. वीरेंद्र जगताप, आ. यशोमती ठाकूर यांनीही आपल्या भाषणांमधून टीका केली. दरम्यान, शुक्रवारी जनसंघर्ष यात्रा रिसोड येथे जाहीर सभा होईल. त्यानंतर ही यात्रा अकोला येथे पोहोचणार आहे. 
अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे आणि सचिन सावंत यांना संविधान ग्रंथाची भेट देताना स्थानिक कार्यकर्ते. 

 

मोदींच्या धमक्यांना काँग्रेस भीक घालत नाही 
सोनिया गांधी व राहुल गांधी यांना पाहून घेऊ म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धमक्यांना काँग्रेस पक्ष भीक घालत नाही. धमक्या दिल्यामुळे काँग्रेसचे नेते घाबरून घरी बसणार नाहीत. संविधान व लोकशाहीच्या रक्षणासाठी भ्रष्ट, धर्मांध व हुकूमशाही वृत्तीच्या मोदी सरकारविरोधातील लढा आणखी तीव्र करू, असेही ते म्हणाले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मोदी यांनी काँग्रेसच्या धाेरणावर टीका केली होती. 

 

बातम्या आणखी आहेत...