Home | Maharashtra | Western Maharashtra | Kolhapur | Ashok Chavhan criticize BJP government in Jan Sanghsh Yatra

अागामी निवडणुकीत भाजपच्या पापाची हंडी जनताच फोडणार, जनसंघर्ष यात्रेत अशाेक चव्हाण यांचा इशारा

प्रतिनिधी | Update - Sep 03, 2018, 09:47 PM IST

दहीहंडी उत्सवाचे निमित्त साधून काँग्रेसच्या नेत्यांनी साेमवारी सातारा जिल्ह्यातील कराड येथे भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार

 • Ashok Chavhan criticize BJP government in Jan Sanghsh Yatra

  सातारा - दहीहंडी उत्सवाचे निमित्त साधून काँग्रेसच्या नेत्यांनी साेमवारी सातारा जिल्ह्यातील कराड येथे भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कारभाराची प्रतीकात्मक दहीहंडी फाेडून अनाेखा निषेध नाेंदवला. ‘भाजप सरकारच्या पापाचा घडा आता भरला असून २०१९ च्या निवडणुकीत जनताच भाजपच्या पापाची हंडी फोडून सत्तेवरून खाली खेचेल,’ अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशाेक चव्हाण यांनी केली.

  चाैथ्या दिवशी काँग्रेसची राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा कराडमध्ये पाेहाेचली. दिवंगत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या ‘प्रीतिसंगम’ या समाधिस्थळी सर्व नेत्यांनी अभिवादन केले. त्यानंतर यात्रेत सहभागी काँग्रेस नेत्यांनी भाजप सरकारच्या भ्रष्टाचाराची हंडी फोडली. रहिमतपूर येथे सभेला मार्गदर्शन करताना अशाेक चव्हाण यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

  ‘भाजप सरकारच्या चार वर्षांच्या सत्ताकाळात महाराष्ट्राचे वाटोळे झाले आहे. भाजपच्या चुकीच्या धोरणामुळे राज्याची अधोगती झाली आहे. चार वर्षांत घोटाळे करण्याशिवाय आणि खोटी आश्वासने देण्यापलीकडे या सरकारने काही केले नाही. राज्यात शेतकरी आत्महत्या करीत आहेत. बेरोजगारीला कंटाळून सुशिक्षित बेरोजगार तरुण आत्महत्या करत आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा व इतर समाजातील तरुण आत्महत्या करत आहेत. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी सरकार प्रश्न चिघळवत ठेवून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. राजकीय फायद्यासाठी राज्यात सामाजिक तेढ निर्माण करण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे’, असा अाराेप अशाेक चव्हाण यांनी केला.  या वेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, सतेज पाटील, शरद रणपिसे, डी. पी. सावंत, अमर राजूरकर, डॉ. सुधीर तांबे, जयकुमार गोरे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारूलता टोकस, काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे अादी उपस्थित हाेते. या सभेनंतर पुढे म्हसवडकडे जाताना काँग्रेस नेत्यांनी मौजे गोपुज येथे एका शेतात भोजन करून तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. ही जनसंघर्ष यात्रा ४ सप्टेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा, सोलापूर अक्कलकोट या शहरांत जाणार आहे.

  अनुभव नसलेले सरकार : पृथ्वीराज चव्हाण
  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, ‘सरकारमध्ये बसलेल्या लोकांना शासन चालवण्याचा अनुभव नाही. कुठलाही विचार न करता निर्णय घेतले जातात आणि लोकांनी विरोध केल्यावर निर्णय मागे घेतले जातात. या सरकारची धोरणे राज्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या हिताची नाहीत तर फक्त देशातल्या मूठभर उद्योगपतींच्या हिताची आहेत. नोटबंदीसारखा निर्णय घेऊन सरकारने अर्थव्यवस्थेचे वाटोळे केले आहे. त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न गंभीर झाला आहे. सर्वसामान्यांचे अच्छे दिन आणायचे असतील तर भाजप सरकार घालवून काँग्रेसचे सरकार आणावे लागेल.’

Trending