Home | Maharashtra | Western Maharashtra | Kolhapur | ashok chavhan criticizes PM modi and CM fadnavis

पाण्यावर टॅक्स लावणाऱ्या नरेंद्र मोदी, फडणवीस यांच्या भाषणांवरही कर लावा- अशोक चव्‍हाण

प्रतिनिधी | Update - Sep 02, 2018, 09:12 AM IST

काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा: राज्यात आंधळे-बहिरे सरकार; प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांची टीका

  • ashok chavhan criticizes PM modi and CM fadnavis

    चोकाक (जि. कोल्हापूर) - शेतकऱ्यांच्या विहिरीतील पाण्यावर टॅक्स लावणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाषणांवरही टॅक्स लावला पाहिजे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी केली.


    काँग्रेस पक्षाची राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा शनिवारी कोल्हापूर जिल्ह्यातील चोकाक येथे पोहोचली. सांगली फाटा येथे भव्य दुचाकी रॅलीने या यात्रेचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर चोकाक येथे आयोजित सभेत अशोक चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली.


    ते म्हणाले, राज्यातील आणि केंद्रातील भाजप सरकार शेतकरीविरोधी आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या ट्रॅक्टरवरच्या सुट्या भागांवर आणि इतर शेती अवजारांवर जीएसटी लावणाऱ्या या सरकारने आता शेतकऱ्यांच्या विहिरीतील पाण्यावर टॅक्स लावला आहे. खोटी आश्वासने देऊन जनतेची फसवणूक करणाऱ्या मोदी, फडणवीसांच्या भाषणांवरही टॅक्स लावला पाहिजे, असे चव्हाण म्हणाले. काँग्रेस सरकारच्या काळात विकासात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राची भाजप-शिवसेना सरकारने अधोगती केली आहे. शेतीमालाला भाव नाही. कर्जमाफी मिळाली नाही. शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाही. नुकसानीची मदत मिळत नाही. जनतेला मदत करण्याऐवजी सरकार इंधनावर कर लावून सर्वसामान्यांची लूट करत आहे. नोटबंदी आणि जीएसटीमुळे या भागातील पॉवरलूम व्यवसाय अडचणीत आला आहे. हजारो लोकांचा रोजगार गेला आहे. भाजप-शिवसेना सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सर्वच घटक अडचणीत आले आहेत. राज्यावर पाच लाख कोटींच्या कर्जाचा डोंगर करून ठेवला आहे. भाजप-शिवसेनेला जनतेच्या प्रश्नांची जाणच नाही त्यामुळे ते प्रश्न सोडवू शकत नाहीत. प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा काँग्रेसचेच सरकार आणले पाहिजे, असेही ते म्हणाले.

Trending