आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असलो तरी झुकते माप मराठवाड्यालाच, अशोक चव्हाणांचे मतभेद विसरून एकत्र येण्याचे अावाहन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष असलो म्हणून काय झाले, माझे मराठवाड्यालाच झुकते माप हे असणारच. मी नांदेडमध्येच लक्ष देतो, अशीही टीका होते. पण नांदेड आहे म्हणून मी तेथे आहे. त्यामुळे मी नांदेड आणि मराठवाड्याचाच विचार करणार. पाणीप्रश्न पेटवण्याचा प्रयत्न हाेताेय. या प्रश्नावर उत्तर व पश्चिम महाराष्ट्रातील सर्वजण एकत्र येताना दिसतात. तसे आपल्याकडे होत नाही. मनातून सर्वजण एकत्र आल्याचेही वाटत नाही. हाही मागासलेपणाचा भाग असावा. त्यामुळे येत्या काळात तरी मराठवाड्यातील सर्वांनी एकत्र येऊन आपला आवाज बुलंद करावा,' असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी शनिवारी औरंगाबादेत केले. 

 

विकासमहर्षी शंकरराव चव्हाण व अप्पासाहेब नागदकर : ऋणानुबंध मंचाच्या उद‌्घाटन कार्यक्रमात ते बाेलत हाेते. 'पाणी असूनही मराठवाड्यावर उपाशी राहण्याची वेळ आहे. महाराष्ट्राचे पाणी पेटवण्याचा प्रयत्न काेण करतेय? विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांना मराठवाड्यात काळे झेंडे दाखवण्यात आले. हा प्रश्न एकट्या विखेंचा नाही. तेथे शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी असे सर्वच एकत्र आले आहेत. अापल्याकडे तशी एकी दिसत नाही. आपल्या मंत्र्यांनीही एकी दाखवून इकडे पैसे खेचून आणले पाहिजे, असे ते म्हणाले. 

 

मराठवाडा पोरका झाल्याचे दिसतेय, आवाज बुलंद हवा 
'मराठवाडा पोरका झाल्यासारखे दिसतेय. कारण मी राज्यभर फिरतो. नांदेडला जाताना खड्ड्यात रस्ते आहेत की काय हे समजत नाही. तिकडे (विदर्भात) मात्र सर्व काही गुळगुळीत. आम्हालाच अशी वागणूक का बरे, कोणी बोलत नाही, म्हणून असे होतेय का? आता आपण सहनशीलता दूर ठेवली पाहिजे. सरकार कोणत्याही पक्षाचे असो, आपला आवाज बुलंद असला पाहिजे. आपल्या अन्यायाला आपणच वाचा फोडली पाहिजे, दुसरा कोणी वाली नाही,' असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. 

बातम्या आणखी आहेत...