आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्षणार्धात जीवनाचे मोल कळले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1972 चा ऑगस्ट महिना मला अजून आठवतो. मी आणि माझा मित्र अविनाश ऊर्फ आवन नगरकर, माझ्या सांगलीतील मोठ्या बहिणीसह नरसोबाच्या वाडीला गेलो होतो. पावसाचे दिवस असल्याने कृष्णा नदी दुथडी भरून वाहत होती. आवनचीही अंघोळ झाली होती. पाय-यावर पाणी असतानाही खालच्या पायरीवर पाय ठेवून मी अंघोळीसाठी पाण्यात उतरणार तोच माझा पाय घसरला आणि मी प्रवाहात पडलो. मला पोहायला येत नव्हते आणि आजही येत नाही. पाय घसरून पाण्यात पडताच मी गटांगळ्या खाऊ लागलो. ओरडू आणि धडपडू लागलो. माझी ही अवस्था पाहून आवनने मदतीसाठी उंचावलेला हात मी त्वरेने पकडला आणि त्वरेने काठाकडे आलो. मी पायरीवर पाय ठेवताच माझ्या जीवात जीव आला. पाण्यात बुडताच क्षणार्धात मला जीवनाचे मोल कळले. मी माझ्या जीवनदात्या मित्राला कडकडून मिठी मारली. यात सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे आवनलाही पोहता येत नव्हते. वातावरण नॉर्मल झाल्यानंतर मला माझी बहीण तसेच आवनकडून बरेच काही ऐकावे लागले.
पोहायला येत नसताना मी तेथे नेमका गेलोच कसा, पोहायला न येणा-या आवनने मला वाचवणे हा एक चमत्कार म्हणावा लागेल. आजही मी कृष्णा नदीच्याच नाही तर कोणत्याही नदीच्या काठावर गेलो की, मला त्या अनुभवाने हुडहुडी भरते. माझ्या बाबतीत काळ आला होता, पण वेळ आली नव्हती हेच खरे. त्यावेळी अविनाश ऊर्फ आवन नसता तर? आज आवन नाही, पण त्याने मला जे जीवन बहाल केले, ते जीवन मी सुखनैव उपभोगत आहे. आयुष्याची दोरी बळकट असल्याने मी आपटे-उपलप प्रशालेचा माजी मुख्याध्यापक तसेच वृत्तपत्र लेखक संघाच्या अध्यक्षपदापर्यंत मजल मारू शकलो. माझ्या अनुभवाने मला बरेच काही शिकवले. पाण्याशी आणि आगीशी कधीच मस्ती करू नये, म्हणतात ते उगीच नाही. बुडता बुडता माझ्या प्रिय मित्राने मला वाचवणे म्हणजे माझा जणू पुनर्जन्मच झाला, असे मला वाटते.