रस्त्यांचा प्रश्न / फाॅरेनच्या रस्त्यांचे तंत्रज्ञान शिकून का येत नाहीत? ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा सवाल

Sep 21,2019 10:19:00 AM IST

नागपूर - सध्या राज्यातील रस्त्यांचा प्रश्न प्रसारमाध्यमांतून गाजतो आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे सर्वसामान्य जनतेसह कलावंतांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक कलाकारांनी खड्ड्यांसोबत सेल्फी घेऊन आपला राग व्यक्त केला, असे सांगतानाच आपले लोक फाॅरेनचे रस्ते तयार करण्याचे तंत्रज्ञान शिकून का येत नाहीत? असा उद्विग्न सवाल ख्यातनाम अभिनेते अशोक सराफ यांनी येथे केला. 'व्हॅक्यूम क्लिनर' नाटकासाठी आले असता पत्रपरिषदेत ते बोलत होते. या वेळी अभिनेत्री निर्मिती सावंत यांनीही परखड मते व्यक्त केली.


राज्यातील नाट्यगृहांची दुरवस्था, नाटक सुरू असताना प्रेक्षकांनी मोबाइल सायलेंट न ठेवणे अशा प्रश्नांवर कलाकारांनी वेळोवेळी नाराजी व संताप व्यक्त केलाय. आता रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न गाजत आहे. अनेक कलाकारांना याचा फटका बसला. सर्वांनीच उघड संताप व्यक्त केला. पण, त्याचा काय उपयोग झाला सांगा. केवळ कलाकारांनी बोलून उपयोग नाही. खड्ड्यांचा मनस्ताप सोसणाऱ्या लोकांनीही पेटून उठले पाहिजे, असे सराफ म्हणाले.


कोणी कितीही बोलले तरी काहीही फरक पडणार नाही. कारण कोणी बोलले तरी ऐकणारे तर हवेत, असे निर्मिती सावंत म्हणाल्या. सगळ्या गोष्टी सरकारनेच का करायच्या? नाट्यगृहे नीटनेटकी ठेवण्याची जबाबदारी प्रेक्षकांचीही आहे. याचे भान प्रेक्षकांनीही ठेवले पाहिजे, असे सावंत यांनी या वेळी सांगितले. या वेळी नाट्य कलावंताची उपस्थिती होती.


हसण्याचे पैसे मिळत नाहीत हो...
अनेक रिअॅलिटी शोमध्ये आम्ही जातो. तिथे आम्ही मनाला भावलेल्या वा मनापासून आवडलेल्या विनोदावर एकदाच हसतो. पण, आमच्या हसण्याचे शाॅट एडिट करून वारंवार दाखवले जातात. त्यामुळे आम्ही प्रत्येकच विनोदावर खळाळून हसतो, असा समज होतो. आम्हाला हसण्यासाठी पैसे दिले जातात, असा अनेकांचा गैरसमज होतो, असे सराफ यांनी स्पष्ट केले.

X