आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आश्रमशाळा विद्यार्थी घेतात मशरूमचे उत्पादन, पाच महिन्यांत तीन लाखांचे उत्पन्न

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अमोल पाटील

धुळे  - कुपोषण व रोजगार निर्मिती या आदिवासी क्षेत्रातील प्रमुख दोन समस्या आहेत. या दोन्ही समस्यांवर एकाच पद्धतीने मात करता येऊ शकते. या दृष्टीने साक्री तालुक्यातील जैताणे येथील रामराव पाटील अनुदानित आश्रमशाळेत मुलांना कौशल्य शिक्षण देण्यात येत आहे. या काैशल्य शिक्षणात विद्यार्थ्यांना मशरूम उत्पादनाचे धडे देण्यात येतात. या शाळेतील पाचवीपासून दहावीपर्यंतचा प्रत्येक विद्यार्थी आता मशरूम उत्पादन घेण्यास समर्थ आहे. विद्यार्थ्यांना उत्पादन घेण्याबरोबरच विपणन कौशल्यदेखील देण्यात येतात. गत पाच महिन्यांत शाळेत तीन लाख रुपयांचे उत्पन्न घेण्यात आले आहे. राज्यातील हा पहिलाच यशस्वी प्रयोग असल्याचा दावा करण्यात आला आहे. आदिवासी भागातील अभिनव प्रयोग

धुळे व नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी समाजात कुपोषण ही गंभीर समस्या आहे. या समस्येच्या निराकरणासाठी विविध प्रयोग राबवण्यात आले. त्यामुळे किमान कुपोषण नियंत्रणात आहे. कुपोषणाबरोबरच दुसरी मुख्य समस्या रोजगार उपलब्धतेची आहे. या दोन्ही समस्यांवर सक्षम उपाय ठरणारा अभिनव प्रयोग आदिवासी विकास विभागाच्या वतीने साक्री तालुक्यातील जैताणे येथील अनुदानित आश्रमशाळेत राबवण्यात आला. 

मशरूमची बाजारपेठेत विक्री व आहारातही वापर

प्रकल्प अधिकारी राजाराम हाळपे यांच्या मार्गदर्शनाखाली  विद्यार्थ्यांना  कौशल्य  आधारित व्यवसाय शिक्षण कार्यक्रमांंतर्गत मशरूम उत्पादनाचे प्रशिक्षण देण्यात आले. २०१८-१९ मध्ये १५ विद्यार्थ्यांनी मशरूम लागवड यशस्वी करत २८ किलो उत्पादन घेतले. त्यापैकी १८ किलो मशरूमची स्थानिक बाजारपेठेत विक्री करण्यात आली. उर्वरित १० किलो मशरूम प्रशिक्षणार्थींना त्यांच्या आहारातून देण्यात आले. २०१९-२० मधील लागवड करण्यात आलेल्या मशरूमचे उत्पन्न नुकतेच हाती आले आहे. 

भविष्यात उद्योग उभारणीसाठी फायद्याचे ठरणार

मशरूम उत्पन्नाचे धडे शाळेतच मिळत आहेत. शाळेतील पाचवीपासून दहावीपर्यंतचा प्रत्येक विद्यार्थी उत्पादन घेण्याच्या प्रक्रियेत सहभागी अाहे. विद्यार्थ्यांना शाळेतील प्रयोगशील शिक्षक आरिफ शेख यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात येते. यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना भविष्यात उद्योग उभारणीसाठी फायद्याचे ठरणार आहे. वाया गेलेल्या कचऱ्याचा वापर करून शाळेत मशरूम उत्पादन घेण्यात येते. यासाठी शाळेत प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. या प्रक्रियेत निर्जंतुकीकरणापासून इतर उपयोगितादेखील विद्यार्थ्यांना शिकवण्यात येते. मशरूमची मागणी झपाट्याने वाढत अाहे. मात्र, उत्पादन  मर्यादितच आहे.   शास्त्रशुद्ध पद्धतीने उत्पादन घेतल्यास उत्पादकता वाढेल. प्रयोग यशस्वी, प्रोत्साहन देणार


धुळे जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर शाळेत राबवण्यात आलेला हा प्रयोग यशस्वी झाला आहे. आतापर्यंत शाळेला मशरूमपासून तीन लाखांपर्यंतचे  उत्पन्न मिळाले आले आहे. शाळेतील प्रत्येक विद्यार्थी या प्रक्रियेत सहभागी होत असल्यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांना मशरूम उत्पादनही घेता येणार आहे. स्थानिक बाजारपेठेसह अन्यत्र मशरूमला मोठी मागणीदेखील आहे. भविष्यात या दृष्टीने आदिवासी तरुणांना मार्गदर्शन व प्रोत्साहनाचे देखील नियोजन आहे.
राजाराम हाळपे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,धुळे