आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अष्टविनायक : इच्छापूर्ती करणारा गणेश म्हणून वरदविनायक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महड : श्री वरदविनायक
ता. खालापूर, जिल्हा रायग

गाणपत्य संप्रदायाचे आद्य प्रवर्तक व ऋग्वेदातील प्रसिद्ध मंत्रद्रष्ट्ये तसेच 'गणानां त्वा'या मंत्राचे प्रवर्तक ऋषी गृत्समद यांनी श्री वरद विनायकाची येथे स्थापना केली. मंदिराचा जीर्णाेद्धार झाला असून नवीन बांधकाम अतिशय सुंदर व देखणे आहे.

पेशव्यांनी बांधलेला हेमाडपंती गाभारा तसाच आहे. मंदिराजवळ देवाचे तळे आहे. याच तळ्यात श्री वरदविनायकाची स्वयंभू मूर्ती इ.स. १६९० मध्ये सापडली. ही मूर्ती भग्न झाल्यामुळे देवस्थानने या मूर्तीचे विसर्जन करून नवीन मूर्तीची स्थापना केली. मणिपूर भद्रक, पुष्पक, मढ इत्यादी या स्थानाची पौराणिक नावे आहेत. आता महड हे नाव प्रचलित आहे. रायगड जिल्ह्यात महाड नावाचे तालुक्याचे ठिकाण आहे. महड व महाड या नावात गोंधळ होतो.

आख्यायिका : गृत्समद ऋषींनी आपल्या मातेला शाप दिला होता. त्याचे प्रायश्चित्त म्हणून त्यांनी येथील अरण्यात 'ओम गं गणपतये नम:' या मंत्राचा अनेक वर्षे जप केला. श्री गणेश त्यांना येथे प्रसन्न झाले. त्यांनी गणेशास प्रार्थना केली की, त्यांनी येथेच राहून भक्तांची मनोकामना पूर्ण करावी. इच्छापूर्ती करणारा गणेश म्हणून त्यास येथे वरदविनायक म्हटले जाऊ लागले.

जवळची ठिकाणे : खोपोली योगिराज गगनगिरी आश्रम, खंडाळा व लोणावळा थंड हवेचे ठिकाण, कार्ले लेणी व एकवीरादेवी स्थान, देहू, चिंचवड - मोरया गोसावी यांची संजीवन समाधी.

बातम्या आणखी आहेत...