Home | Jeevan Mantra | Teerath Darshan | Ashtvinayakas Unknown Stories And Temples Travel Guide In Marathi

पृथ्वीतलावरची ही 8 अद्भुत ठिकाणे, जेथे स्वत: प्रकटले गणपती, वाचा पौराणिक आख्यायिका

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 17, 2018, 07:05 AM IST

या राज्यात श्रीगणेशाची विविध प्राचीन मंदिरे असून गणेशाचे अष्टविनायक दर्शनही पुण्यप्रद मानले जाते.

 • Ashtvinayakas Unknown Stories And Temples Travel Guide In Marathi

  गणेशोत्सवासाला सुरुवात झाली असून, सर्व गणेश मंदिरांमध्ये श्रीगणेशाच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी होत आहे. महाराष्ट्राच्या संकृतीमध्ये श्रीगणेशाचे मुख्य स्थान आहे. या राज्यात श्रीगणेशाची विविध प्राचीन मंदिरे असून गणेशाचे अष्टविनायक दर्शनही पुण्यप्रद मानले जाते. हे अष्टविनायक भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.

  स्वस्ति श्री गणनायाकम गजमुखं मोरेश्वारम सिद्धीदम |
  बल्लाळं मुरुडं विनायक मढं चिंतामणी थेवरम ||
  लेण्यान्द्री गिरीजात्माजम सुवरदम विघ्नेश्वारम ओझरम |
  ग्रामो रांजण संस्थितम गणपती कुर्यात सदा मंगलम ||

  या श्लोकामध्ये महाराष्ट्रातील आठही स्वयंभु गणपतींचा उल्लेख करण्यात आला आहे. या आठ गणेश स्थानांचे दर्शन केल्यानंतर अष्टविनायक यात्रा पूर्ण झाल्याचे मानले जाते. आज आम्ही तुम्हाला या आठ गणेश मंदिराची विशेष माहिती आणि पौराणिक कथा सांगत आहोत.

  पुढील स्लाईड्सवर क्लिक करून, घरबसल्या घ्या अष्टविनायकांचे दर्शन...

 • Ashtvinayakas Unknown Stories And Temples Travel Guide In Marathi

  मोरगावचा मयुरेश्वर


  अष्टविनायकातील पहिला गणपती म्हणून मोरगावचा मयुरेश्वर ओळखला जातो. येथील मूर्ती अतिशय नयनमनोहर आहे. डाव्या सोंडेची ही मूर्ती असून उत्तराभिमूख आहे. उजवा गुडघा छातीजवळ घेऊन बसलेल्या या श्रींच्या डाव्या हातात मोदक आहे. श्रींच्या भालप्रदेशावर आणि नाभीमध्ये रत्न जडविलेले आहेत. मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला रिद्धी - सिद्धी आहेत.

  श्रींच्या मूर्तीची एक अख्यायिका सांगितली जाते, मूर्तीच्या पाठीमागे अदृश्य स्वरूपात लोह आणि रत्नाच्या अणूंपासून मोरेश्वराची मूर्ती बनविलेली आहे. तिची प्रथम स्थापना ब्रम्हदेवाने केली होती. सिंधू दैत्याने दोनवेळा त्या मूर्तीचा विध्वंस केला. मात्र, ब्रम्हदेवाने तिची पुनःप्रतिष्ठापणा केली. त्यानंतर द्वापारयुगात पांडव भूस्वानंद क्षेत्री आले आणि त्यांनी मूळ मूर्तीला काही होऊ नये म्हणून तांब्याच्या पत्र्याने आच्छादित करून नियमीत पुजेसाठी सध्याच्या मूर्तीची स्थापना केली.

   

  मोरगावला जाण्याचा मार्ग
  मोरगाव पुण्यापासून 70 किलोमीटर अंतरावर आहे. तर, बारामतीपासून 35 किलोमीटर आहे. येथे जाण्यासाठी पुण्याहून एस.टी.बस आहे.

   

 • Ashtvinayakas Unknown Stories And Temples Travel Guide In Marathi

  सिद्धटेकचा सिद्धीविनायक


  अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात भीमा नदीच्या काठावर सिद्धटेक हे गाव आहे.

   

  श्रीसिद्धिविनायकाचे मंदिर टेकडीवर उत्तराभिमूख असून त्यावर सुंदर कलाकूसर केलेली आहे. मंदिराचा गाभारा बराच मोठा आहे. गाभा-याच्या बाहेरच्या बाजूस सभामंडप आहे. मंदिराच्या गाभा-यातच देवाचे शेजघर आहे. श्रीसिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू असून ३ फूट उंच व २.५ फूट लांबची आहे. मूर्ती उत्तराभिमूखी गजमुखी आहे. अष्टविनायकातील उजवीकडे सोंड असलेली ही एकमेव मूर्ती आहे. येथील गणेशाला श्रीसिद्धिविनायक असे नाव पडण्यामागे एक पौराणिक कथा आहे.

   

  ब्रम्हदेवाला सृष्टीरचना करावी वाटली तेव्हा त्याने गणेशाने दिलेल्या एकाक्षरमंत्राचा जप करुन गणेशाला प्रसन्न केले. तेव्हा गणेशाने 'तुझ्या सर्व मनःकामना पूर्ण होतील' असा वर दिला आणि ब्रम्हदेवाने सृष्टी निर्माण केली. त्यावेळी क्षीरसागरात गाढ झोपलेल्या भगवान विष्णूच्या कानातून मधू व कैटभ हे दोन राक्षस निर्माण झाले. त्यांनी ब्रम्हदेवास त्रास देण्यास सुरुवात केली. तेव्हा सर्व देवांनी विष्णूला जागे केले. विष्णूचे व मधू-कैटभाचे अनेक वर्ष युद्ध सुरु होते मात्र विष्णू त्या दैत्यांना मारू शकला नाही. म्हणून तो भगवान शंकराकडे गेला. तेव्हा शंकर म्हणाले, युद्ध सुरु होण्याआधी तू गणेशाचे स्तवन केले नाहीस, म्हणून तुला विजय मिळत नाही. तेव्हा विष्णू एका पवित्र टेकडीवर आला. तिथे "श्रीगणेशाय नमः" या मंत्राने गणेशाची आराधना केली. त्या आराधनेने विष्णूला सिद्धी प्राप्त झाली आणि त्याने मधू-कैटभाचा वध केला.

   

  विष्णूला श्रीविनायक ज्या ठिकाणी प्रसन्न झाले त्याठिकाणी विष्णूने एक मोठे मंदिर बांधले व त्यात गंडकीशिलेची विनायकाची मूर्ती स्थापन केली. या ठिकाणी विष्णूची कार्यसिद्धी झाली म्हणून या ठिकाणाला 'सिद्धटेक' असे म्हणतात.

 • Ashtvinayakas Unknown Stories And Temples Travel Guide In Marathi

  पालीचा श्री बल्लाळेश्वर


  पालीचा श्री बल्लाळेश्वर हा अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती. श्री बल्लाळेश्वर गणपती भक्ताच्या नावाने प्रसिद्ध आहे. श्री बल्लाळेश्वराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या अंगावर उपरणे व अंगरखा अशी वस्त्रे आहेत. बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. मंदिराची रचना देखील वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आहे. मंदिरात प्रचंड घंटा असून ती चिमाजी अप्पांनी अर्पण केली आहे. श्री बल्लाळेश्वराचे श्रद्धास्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात आहे. सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीच्या निसर्गरम्य सान्निध्यात बल्लाळेश्वराचे मंदिर वसले आहे.
   
  बल्लाळेश्वराची कथा
  प्राचीन काळी सिंधू देशातील कोकण पल्लीर गावात अर्थात आताच्या पाली गावात कल्याण नावाचा एक व्यापारी राहात होता. त्याच्या पत्नीचे नाव इंदुमती आणि मुलाचे नाव बल्लाळ. लहान वयातच बल्लाळला गणेशमूर्ती पूजनाची ओढ लागली. तो गणेश चिंतनात रमू लागला. त्याच्या या गणेशभक्तीने त्याचे मित्रही गणेशाची भक्ती करु लागले. बल्लाळच्या सोबतीने मुले बिघडली अशी ओरड त्यांचे आई-वडील करु लगाले. गावक-यांनी बल्लाळची तक्रार कल्याणशेठकडे केली. पोर भक्तीमार्गाला लागल्याचा त्यांना भलता राग आला. बल्लाळ ज्या रानात गणेशमूर्तीची पूजा करीत असे ते तिथे पोहोचले आणि त्यांनी बल्लाळला गणेशभक्तीत रंगून गेलेले पाहिले. त्यांचा पारा चढला. कल्याणशेठने गणेशमूर्ती फेकून देत पूजा मोडून टाकली आणि बल्लाळला रक्तबंबाळ होईपर्यंत मारले. त्याच अवस्थेत त्याला झाडाला बांधून ठेवले. बल्लाळ शुद्धीवर आल्यावर त्याने पुन्हा गणेशाचा धावा केला. बल्लाळचा धावा ऐकून विनायक तिथे अवतरले. त्यांनी त्याला बंधमुक्त केले. ते बल्लाळला म्हणाले, 'तू माझ्या भक्तीचा प्रवर्तक, श्रेष्ठ आचार्य आणि दीर्घायुषी होशील. आता तुला हवा तो वर माग.' तेव्हा बल्लाळ म्हणाला, 'तू याच ठिकाणी कायमचे वास्तव्य करावेस व भक्तांच्या इच्छा पूर्ण कराव्या.' तेव्हा गणेशाने त्याची इच्छा पूर्ण करत तिथेच ''बल्लाळ विनायक'' नावाने वास्तव्य केले.

   

  'भाद्रपद शुद्ध चतुर्थीला जे भक्त येथे येतील त्यांच्या सर्व मनःकामना पूर्ण होतील.' असा वर देऊन गणेश जवळ असलेल्या एका शिलेत अंतर्धान पावले. तीच शिला आज बल्लाळेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे.

 • Ashtvinayakas Unknown Stories And Temples Travel Guide In Marathi

  महडचा श्री वरदविनायक


  महडचा श्री वरदविनायक हा अष्टविनायकांपैकी चौथा गणपती. श्री वरदविनायकाचे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे. दगडी महिरप मंदिरात सिंहासनारूढ झालेल्या श्री वरदविनायकाची मूर्ती उजव्या सोंडेची आहे. एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती मिळाली. त्याच मूर्तीची या मंदिरातील प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. इ.स. 1775 मध्ये पेशवाई काळात हे मंदिर बांधण्यात आले आहे. या गणेशस्थानाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे भक्तांना स्वहस्ते पूजा करता येते. देवाजवळ कधीही हवन नसते. 1892 पासून येथे नंदादीप तेवत असल्याचेही सांगितले जाते.

 • Ashtvinayakas Unknown Stories And Temples Travel Guide In Marathi

  थेऊरचा श्री चिंतामणी

   

  महाराष्ट्रात असलेल्या अष्टविनायकांपैकी थेऊरचा श्री चिंतामणी हा पाचवा गणपती आहे. थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे श्री गणेशाचे ठिकाण आहे. भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणी म्हणतात. थेऊर पुणे-सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर असून पुण्यापासून हे 30 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्यापासून बसेसची सोय आहे. अतिशय प्राचिन क्षेत्र म्हणून हे प्रसिद्ध आहे.

   

  श्री चिंतामणीची कथा
  अभिजीत नावाचा एक राजा होता. त्याची पत्नी गुणवती. त्यांचा मुलगा गण. हा गण त्यांना रानावनात तपश्चर्या केल्यानंतर झाला. तो मोठा झाल्यानंतर जेवढा पराक्रमी झाला तेवढाच तापट होता. एकदा तो कपिलमुनींच्या आश्रमात गेला. त्यांच्याकडे चिंतामणी रत्न होते. या रत्नाच्या सामर्थ्याने त्यांनी त्याला भोजन इत्यादी दिले. गणाला या रत्नाचा मोह झाला आणि त्याने मुनींना रत्न मागितले. मात्र, त्यांनी त्याला नकार दिला. गणाने कपिलमुनींकडील चिंतामणी रत्न चोरले. याचे मुनींना अतिशय वाईट वाटले. त्यांनी विनायकाची आराधना केली. विनायक प्रसन्न झाले आणि त्यांनी कपिलमुनींना त्यांचे गेलेले रत्न परत मिळवून देण्याचे वचन दिले.

   

  चिंतामणी रत्न मिळविण्यासाठी विनायकाला गणासोबत युद्ध करावे लागले. विनायकाने गणाला ठार केले. मग त्याचा पिता राजा अभिजीतने विनायकाला ते चिंतामणी रत्न परत केले. विनायक ते रत्न देण्यासाठी कपिलमुनींकडे गेला. मात्र, त्यांनी ते रत्न स्विकारले नाही आणि ते विनायकालाच अर्पण केले. तेव्हा विनायकाने चिंतामणी नाव धारण केले आणि ज्या कदंब वृक्षाखाली ही घटना घडली तेथेच वास्तव्य केले.

 • Ashtvinayakas Unknown Stories And Temples Travel Guide In Marathi

  लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक


  लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक हा अष्टविनायकापैकी सहावा गणपती. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील जुन्नर लेण्यांच्या सहवासात कुकडी नदीच्या परिसरातील डोंगरावर श्री गिरिजात्मक गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे. श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती असून ती दगडामध्ये कोरलेली आहे. मंदिर परिसरातील खडकामध्ये कोरीवकाम, खोदकाम केलेले आहे. मंदिरात दगडी खांब आहेत व त्यावर वाघ, सिंह, हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे चारशे पायर्‍या आहेत. पेशवे काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता. लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक हा जुन्नरपासून सात किलोमिटर अंतरावर आहे. पुण्यापासून सुमारे 97 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे.

   

  गिराजात्मजाची पौराणिक कथा...
  पार्वतीने गजाननाने आपला पुत्र व्हावे यासाठी यासाठी लेण्याद्री पर्वताच्या गुफेत 12 वर्ष तपश्चर्या केली. तिच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन गजाननाने पार्वतीचा पुत्र होण्यास होकार दिला. त्यासोबतच तुझे आणि लोकांचे मनोरथ पूर्ण करेल असा वर दिला. भाद्रपद चतुर्थीला पार्वतीने गजाननाच्या पार्थिव मूर्तीची पूजा केली. ती मूर्ती सचेतन होऊन पार्वतीपुढे पुत्ररुपाने प्रकट झाली. त्या बालकाला सहा हात, तीन नेत्र आणि सुंदर शरीर होते.

   

  गिरजात्मज विनायकाने या प्रदेशात 12 वर्षे तप केले. बाल्यावस्थेतच अनेक दैत्यांच्या संहार केला. याच प्रदेशात गौतममुनींनी गणेशाची मुंज केली. येथेच त्यांनी मयुरेश्वराचा अवतार घेतला अशीही आख्यायिका आहे. सुमारे 15 वर्षे या प्रदेशात गणेशाचे वास्तव्य होते. त्यामुळे हा प्रदेश पवित्र समजला जातो.

 • Ashtvinayakas Unknown Stories And Temples Travel Guide In Marathi

  ओझरचा विघ्नेश्र्वर


  ओझरचा विघ्नेश्र्वर हा अष्टविनायकांतील सातवा गणपती. अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्र्वराची ओळख आहे. श्रींच्या डोळ्यात माणिक असून, कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगल मूर्ती असलेला श्रीगणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे.

   

  कुकडी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर एक जागृत श्रद्धास्थान आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील नारायणगावपासून अवघ्या आठ किलो मीटर अंतरावर ओझर हे गाव आहे. गजाननाने येथे विघ्नासुराचा वध केला आणि नंतर इथेच वास्तव्य केल्याची आख्यायिका आहे.

 • Ashtvinayakas Unknown Stories And Temples Travel Guide In Marathi

  रांजणगावचा महागणपती


  'महागणपती' हा अष्टविनायकांपैकी चौथा गणपती. पुणे-अहमदनगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. त्रिपुरासुर या दैत्यास शिवशंकरांनी काही शक्ती प्रदान केल्या होत्या. त्रिपुरासुराने मात्र या शक्तीचा दुरूपयोग केला. स्वर्गलोक व पृथ्वीलोकानील लोकांना त्रास देऊ लागला. शेवटी एक वेळ अशी आली की, शिवशंकराला श्री गणेशाचे नमन करून त्रिपुरासुराचा वध करावा लागला. म्हणून या गणेशाला ‘त्रिपुरारिवदे महागणपती’ असेही म्हटले जाते. अशी महागणपतीसंदर्भात एक दंतकथा आहे. महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे 'महागणपती'चे रूप आहे. श्री महागणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे.

Trending