आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगण्याचे ऑक्सिजन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 अश्विनी माने काल एका बस स्टाॅपवर बसची वाट पाहत होते. बऱ्याच दिवसांनी बसने जायचा प्रसंग आला. बस येण्याची चिन्हे दिसत नव्हती. वेळ घालवावा म्हणून बस स्टाॅपवरच्या लोकांचे निरीक्षण करू लागले. शेजारी आजोबा बसलेे होते. हातात अॅल्युमिनियमची काठी,कानाला हेडफोन, खांद्यावर शबनम, तोंडात चाॅकलेट असावे. मी त्यांच्याकडे पाहिल्यावर त्यांनीही माझ्याकडे पाहिले. ओळख नसताना ओळखीचे हसू त्यांच्या चेहऱ्यावर दिसले. काहीतरी विचारायचे म्हणून मी विचारले, आजोबा कुठे जायचे? ते म्हणाले पास आहे, जी बस येईल, त्या बसमध्ये बसायचे आणि फिरायचे. एकट्याने फिरताना भीती नाही वाटत? त्या वेळेस ते म्हणाले, मागील वर्षी बायको आजारी पडली, शेवटच्या क्षणी मी, मुलगा, डाॅक्टर हजर होतो. बायकोने भीतीने माझा हात धरून ठेवला होता. तरी मी  वाचवू नाही  शकलो. आम्ही  वय झाले म्हणून बाहेर फिरायचो नाही. ती गेल्यावर मात्र मी हिंमत केली. फिरायला सुरुवात केली. मन खंबीर केले, आवडेल तिथे जातो, लोकांशी बोलतो, जे बघितले ते मुलाला घरी जाऊन सांगतो. सोबत आधार कार्ड, डाॅक्टरांचा मोबाइल नंबर, मुलाचा मोबाइल नंबर, मेडिक्लेम पाॅलिसी, औषधे आणि मोजके पैसे ठेवतो आणि फिरतो. जे आवडले ते खातो. एखाद्या ठिकाणी मुक्काम करावासा वाटला तेथे थांबतो, मुक्कामाचे मुलाला फोन करून सांगतो. खूप एकटे वाटले की वृद्धाश्रमात जातो, छानपैकी खाण्याचे पार्सल घेतो. त्यांच्यासोबत खातो. त्यांच्याशी संवाद करतो. नवीन ऑक्सिजन मिळतो जगायला. काही वेळेस लहानपणीच्या आठवणी आल्या की अनाथाश्रमात जातो, खाऊ घेतो, खेळणी घेतो. त्यामुळे घरचेही  कंटाळत नाहीत आणि मीही आनंदात राहतो.  एक बस आली, त्यामध्ये ते चढले. खिडकीतून त्यांनी बाय केले. मोबाइल नंबर घ्यायचा राहिला,पण...जाता जाता मला ऑक्सिजन देऊन गेले. 

बातम्या आणखी आहेत...