आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूल्यकेंद्रीत जगण्याचे गुंफिरे जंजाळ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

"आटपाट देशातल्या गोष्टी’ ही संग्राम गायकवाड यांची "मनोविकास प्रकाशना'ने नुकतीच प्रसिद्ध केलेली कादंबरी. वर वर पाहता आयकर खात्याने टाकलेल्या धाडीची ही कथा आहे.परंतु, ती केवळ निमित्तमात्र आहे. इथे लेखक एका तटस्थ आणि धारदार आरपारतेने आयकर विभागाच्या बंदिस्त विश्वाचे निरीक्षण करतो आहे नि त्याच वेळी बाहेरच्या व्यापक जगाचे, त्यातील जाणिवांचे, संवेदनांचे, विचारप्रवाहांचे आणि ताण्याबाण्याचेही दर्शन घडवतो आहे...

 

आयकर खात्याने टाकलेली धाड हा सामान्य माणसांमध्ये कायमच कुतूहल निर्माण करणारा मामला आहे. अशा धाडीसाठी खबऱ्यांकडून गोळा केली जाणारी आगाऊ माहिती, धाडीची पूर्वतयारी, प्रत्यक्ष धाडीचे तपशील, ज्यांच्यावर धाड टाकली जाते, त्यांची स्थिती, धाड प्रकाराबद्दल बाह्य जगतात असलेला रोमँटिसिझम (कल्पनारम्यता) आणि प्रत्यक्षातील कोरडी ठाक वास्तवता यांचे अगदी तपशीलवार चित्रण प्रशासकीय बारकाव्यांसह संग्राम गायकवाड यांच्या "आटपाट देशातल्या गोष्टी’ या प्रस्तुत कादंबरीत आले आहे. पण ते तेवढेच नाही. या निमित्ताने लेखकाने अनेकविध विषयांना, मुद्यांना, संकल्पनांना हात घातला आहे.

 

संग्राम हा आयकर विभागातील जाणकार वरिष्ठ अधिकारी. अत्यंत प्रामाणिक, धडाडीचा आणि संपृक्त समाजभान असणारा. अनुभवविश्व समृद्ध असल्यामुळेच धाडीची ही कथा  त्याने अगदी सहज साकारली आहे. पण वाचकांना अपेक्षित असू शकणारी आयकर विभागातील खमंग अंतर्गत गुपिते सांगू पाहणारी, ही सुरस कथा नाही. धाडीची ही कथा केवळ निमित्तमात्र आहे. इथे लेखक एका तटस्थ आणि धारदार आरपारतेने आयकर विभागाच्या बंदिस्त विश्वाचे निरीक्षण करतो आहे नि त्याच वेळी बाहेरच्या व्यापक जगाचे, त्यातील जाणिवांचे, संवेदनांचे, विचारप्रवाहांचे आणि ताण्याबाण्याचेही दर्शन घडवतो आहे.

 

मुख्य पात्र निवृत्ती हा आयकर खात्यातील एक तत्वनिष्ठ आणि प्रामाणिक अधिकारी आणि त्याचे खास मित्र मल्हार आणि माधव, ही पात्रे कथानकाचा भाग बनतानाच वेगवेगळ्या विचारधारांचे प्रतिनिधित्वही करतात. निवृत्तीची पत्नी कादंबरीत ठिपक्या ठिपक्यानेच डोकावत राहते, पण निवृत्तीच्या अधिक समंजस "आल्टर इगो'चे प्रतिनिधित्व करते. याशिवाय निवृत्तीचे कुटुंबीय, गावाकडील पाहुणे, ऑफिसमधील वरिष्ठ, कनिष्ठ आणि सहकारी अधिकारी अशी अनेक पात्रे कथेच्या अनुषंगाने ठळकपणे येतात.

 

आधी उल्लेखल्याप्रमाणे कादंबरीत आयकर विभागाने टाकलेल्या धाडीचे तपशीलवार आणि उत्कंठावर्धक वर्णन आहे. खबऱ्यांकडून तुकड्यातुकड्यांत मिळालेल्या माहितीच्या आधारे केले जाणारे धाडीचे नियोजन, त्याची नियोजनबद्ध पूर्वतयारी, तुटकतुटक मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे प्रस्थपित केली जाणारी साखळी, ती कायदेशीररित्या सिद्ध करण्यासाठी करावी लागणारी किचकट प्रक्रिया, हे सगळं खुबीने मांडलंय. त्यातला अपरिहार्य वेळखाऊपणा आणि कोरडं वास्तव अनेकांच्या मनातील अशा धाडीबद्दलच्या स्वप्नरंजनाला छेद देतात. या निमित्ताने बेकायदेशीर प्रक्रियांचा अवलंब करून आयकर चुकवणाऱ्या व्यक्ती, त्यांची प्रभावशाली वर्तुळातील उठबस, कुंपणाने शेत खाण्याची वृत्ती यावर प्रकाश टाकला आहे. पण हे इथेच थांबत नाही. धाडीचा सूत्रधार असलेल्या  निवृत्तीच्या जवळच्या वर्तुळात वावरणारे लोक या धाडीच्या टप्प्यात सापडतात. त्यांची निवृत्तीच्या मनात एक निर्मळ आणि आदरणीय अशी पूर्वप्रतिमा आहे. या प्रतिमेला तडा जातो आणि ही बाब निवृत्तीला उद्विग्न करते. पण कथेचा ताण त्यात नाहीच.
 
निवृत्तीच्या नजरेत दोषी ठरू पाहणारे त्याचा घनिष्ठ मित्र मल्हार आणि त्याचे सासरे साहेबराव यांच्यादृष्टीने त्या दोघांना टोकाच्या प्रमाणिकतेच्या धारधार कसोटीवर तोलणारा निवृत्तीच दोषी आहे. मानवी नात्यांना न मानणारा आणि भावनाशून्य आहे. त्यांच्या मते, वर्षानुवर्षे अस्तिवात असणारी एक व्यवस्था, त्यातील उतरंड आणि ताण, त्यांना तोलणारी सर्वमान्य अशी त्या व्यवस्थेची स्वतःची एक मूल्यव्यवस्था आणि जगणे सुकर करण्यासाठी करावी लागणारी अपरिहार्य पण माफक तडजोड या गोष्टी निवृत्ती समजून घेत नाही. निवृत्तीबरोबरचे इतक्या वर्षांचे नातेसंबंध जे दृढ आहेत, असा त्यांचा विश्वास असतो आणि कोणत्याही वादळातून हे नातेसंबंध त्यांना तारतील किंबहुना तशी जगाची रित आहे, असे त्यांना वाटत असते. ते नातेसंबंध एका छोट्या वावटळीत ही समूळ उपटले जातात.

 

निवृत्तीची कठोर प्रामाणिकता हा गुण न ठरता त्यांच्या दुःखाचे आणि विश्वासघाताच्या भावनेचे निधान ठरते. या निमित्ताने निवृत्तीच्या जवळच्या वर्तुळातील इतर व्यक्तीही त्याला अनपेक्षित पद्धतीने प्रतिसाद देतात. अगदी अमलालादेखील त्याची पराकोटीची तत्वनिष्ठ वृत्ती खिन्न करते. मुळातच व्यक्तिवादी बुद्धिनिष्ठ असणाऱ्या निवृत्तीचे एकटेपण यामुळे अजूनच अधोरेखित होते. समूहाच्या आकांक्षांना समजून घेऊन व्यक्तिवादी अस्तित्वाला मुरड घालण्याची सामान्यपणे दिसणारी वृत्ती निवृत्तीची नाही. त्यामुळेच तो तुटत जातो, अवकाशातील निर्वात पोकळीत अधांतरी तरंगणाऱ्या ताऱ्यासारखा. आणि हाच या कादंबरीतील खरा ताण आहे.

 

मुख्य कथानकाच्या निमित्ताने आणि असे जाता जाताही निवेदकाच्या माध्यमातून आणि पात्रांच्या आपापसातील चर्चांमधून समाजाचा ऐतिहासिक धांडोळा सातत्याने घेतला जातो. हजारो वर्षांची सामाजिक आणि सांस्कृतिक सरमिसळ, जातींची उतरंड, नागरी आणि ग्रामीण जीवनाचे वास्तव, आधुनिकीकरणामुळे पारंपारिक जीवनपद्धतीत निर्माण झालेले तणाव, एकीकडे येथील समाजजीवनाचे व्यवच्छेदक लक्षण असलेली सांस्कृतिक आणि धार्मिक सहिष्णुता,  सततच्या परकीय आक्रमणांमुळे झालेली घुसळण, तिला सामोरे जाण्याची इथल्या संस्कृतीची आगळी वेगळी पद्धत, परंतु कालांतराने त्याबद्दल उपस्थित झालेली प्रश्नचिन्हे अशा अनेक मुद्द्यांना लेखक समर्थ नि सखोलपणे स्पर्श करतो.

 

समूहाचा विकास आणि वर्तनपद्धतीशी जोडलेली वैश्विक प्रभावातून तयार झालेली व्यवस्था प्रवाहात सामील होऊन स्वीकारायची की, शतकानुशतकांचा ऐतिहासिक वारसा आणि समूहाच्या आंतरिक प्रेरणा विचारात घेऊन, देशीवादी व्यवस्था विकसित होऊ द्यायची, यावरही निवृत्ती आणि माधव यांच्यातील चर्चांच्या माध्यमातून केलेले भाष्य चिंतनीय आहे. व्यक्तिवादी आणि बुद्धिवादी निवृत्तीची पराकोटीची प्रामाणिकता, समुहापासून त्याला कशी दूर नेते आणि समूहाच्या नजरेतून त्याला कशी ताठर, विक्षिप्त आणि अलिप्त ठरवते, याची विलक्षण कहाणी इथे उलगडत जाते. एकीकडे नातेवाईकांबद्दल जिव्हाळा आणि दुसरीकडे तर्काच्या कसोटीवर न टिकणारे, असे त्यांचे परिस्थितीशरण वागणे, सहन न होणे हा निवृत्तीचा आंतरिक संघर्ष आहे. त्याचं सतत मॅक्रो आणि ब्रॉड लेव्हलवर राहून विचार करणं, आणि सगळ्यात बाहेरील सगळ्यात मोठ्या नियमांच्या वर्तुळावर थांबूनच अगदी जवळच्या व्यक्तींचेही मूल्यमापन करून त्यांच्या भावभावना, विकार, आकांक्षा यांना कठोर तटस्थतेनं दूर लोटणं, या वृत्तीची अमलादेखील निर्भत्सना करते. समाजाच्या संक्रमणावस्थेमध्ये त्यांच्यासारख्या संवेदनशील अधिकाऱ्याने टोकाची भूमिका टाळून अधिक समजूतदार भूमिका घेतली पाहिजे, हे सांगण्याचा प्रयत्न करते. निवृत्तीचं असं व्यापक सत्याशी आणि संपूर्ण समाजाला बांधील असणाऱ्या मूल्यव्यस्थेशी पराकोटीचं प्रामाणिक असणं आणि त्यासाठी यत्किंचितही तडजोड न करणं, हे अगदी अमलाच्या नजरेतूनही त्याला स्वयंकेंद्रित बनवतं. 

 

खरं तर एखाद्या व्यक्तीचं समाजहितैषी मूल्यव्यवस्थेशी असं एकनिष्ठ असणं, हा कौतुकाचा विषय. पण तो तसा न राहता परस्परसंबंधातील तणावाचा विषय होतो. प्रामाणिकपणा हा गुण मानणाऱ्या समूहालाही जवळच्या वर्तुळातील व्यक्तींना जाच होईल, असा प्रामाणिकपणा कोणी दाखवणे मंजूर नसते. मानवी संबंध त्यांच्यासाठी अधिक महत्वाचे ठरतात. त्यासाठी लवचिक मूल्यव्यवस्था अवलंबणे अपेक्षित असते. तसे न झाल्यास निवृत्तीसारखी "चंद्रहीन आकाशा’ खाली वाटचाल करावी लागते. निर्वात पोकळीत दुःखाचा लंबक एकसलग झोका घेत राहतो. व्यवस्थेमध्ये कुठेच चपखल न बसल्याने येणारे एकटेपण अवकाशाच्या निर्वात पोकळीतील अवकाशवीराच्या वजनविरहिततेसारखं असतं. निवृत्तीचं हे अपरिमित सुटेपण अंगावर येतं.

 

लेखकाचा मूळ हेतू कथा सांगण्याचा नाहीच आहे, असं मला वाटतं. उलट लेखकाच्या मनातील वैचारिक उलाघाल, आजूबाजूला सातत्याने प्रभावीपणे वाहणारे वेगळे वैचारिक प्रवाह, त्यांच्याबरोबर चालू असलेले लेखकाच्या विचारधारेचे द्वंद्व, कितीही अलिप्त राहिले, तरी पुन्हा पुन्हा लपेटून टाकणारी जवळच्या कौटुंबिक आणि बाहेरच्या वर्तुळांमधील सामाजिक घुसळण... हे सर्व लेखकाच्या संवेदनशील मनःपटलावर पुन्हा पुन्हा आघात करत असणार. या पुस्तकाच्या रूपाने त्याला मूर्त स्वरूप आले आहे. कादंबरीतील सर्व घटना, उपघटना, पात्रे, उपपात्रे यांच्या निमित्ताने या वैचारिक घुसळणीची चर्चा अगदी सहजपणे लेखक संग्रामने केली आहे. कादंबरीचा घाट उभा व्यापक आणि बहुपेडी आशयाला साजेसा आहे. चतुर्मासाच्या कथेसारखा किंवा पुराणकथेसारखा थोडासा विस्कळीत, गोष्टी वेल्हाळ बाज वापरताना, त्यात ही विचारांची आवर्तने उपरी वाटू न देता, चपखल बसविण्यात लेखक बऱ्यापैकी यशस्वी झाला आहे. आटपाट देश, धेनुकाकट महानगर, कलिंगप्रदेश, इंद्रप्रस्थ असा ऐतिहासिक संदर्भ असलेली ठिकाणे आणि त्यावर आधुनिक काळातील घटना, व्यक्ती, व्यवहार आणि विचारप्रवाह यांना प्राप्त झालेली संस्थिती (juxtaposition) याची भट्टी मस्त जमून आली आहे. हा कादंबरीचा पारंपारिक घाट नाही. काही वेळेला ग. प्र. प्रधानांच्या "साता उत्तराची कहाणी’ची आठवण होते. कादंबरीची भाषा, शब्दकळा आणि प्रतिमासृष्टी या दोन्ही बाबतीत विलक्षण आहे.

 

महसूल प्रशासनाच्या काहीशा किचकट, आकड्यांच्या जंजाळात अडकलेल्या कंटाळवाण्या चौकटीत राहूनही  आपली संवेदनशीलता आणि समाजभान टवटवीत ठेवणाऱ्या संग्रामने सातत्याने ब्लॉगलेखन केले आहे. पण आपल्या मनातील विचारांना कादंबरीच्या ढाच्यातून इतके प्रभावी मूर्त स्वरूप देण्याचा तेही कथाबीजाची कोणतीही हानी न होऊ देता, हा प्रयत्न अत्यंत स्तुत्य आहे. येथे लेखक केवळ प्रशासकीय अधिकारी म्हणून समोर येत नाही, तसेच कथास्रोत ही प्रशासकीय अनुभवांपुरते मर्यादित राहात नाही.कादंबरी त्याच्या किती तरी पुढे जाते आणि अनेक मूलभूत नि मूल्यकेंद्रीत मुद्यांचा धांडोळा घेते...

 

बातम्या आणखी आहेत...