Home | Business | Business Special | Asia richest banker Uday Kotak news in Marathi

रिझर्व्ह बँकेसोबत वादानंतरही पाच वर्षांत 3 पट श्रीमंत झाले उदय कोटक

वृत्तसंस्था | Update - Mar 13, 2019, 11:22 AM IST

कोणत्याही नियामकासोबत वाद घालून विरोध केल्यास तुमच्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.

  • Asia richest banker Uday Kotak news in Marathi

    मुंबई - कोणत्याही नियामकासोबत वाद घालून विरोध केल्यास तुमच्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. मात्र, आशियातील सर्वात श्रीमंत बँकर उदय कोटक रिझर्व्ह बँकेसारख्या शक्तिशाली नियामकासमोर या बाबत फायद्यात राहिले आहे. कोटक महिंद्रा बँकेचे (केएमबी) संस्थापक उदय कोटक यांची संपत्ती मार्च २०१४ पासून आतापर्यंत तिप्पट वाढली आहे. उदय कोटक यांची बँकेत ३० टक्के भागीदारी आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमावलीनुसार कोटक यांना या बँकेतील भागीदारी मागील वर्षाच्या अखेरपर्यंत २० टक्क्यांपर्यंत आणायची होती. भारतीय बँकांमध्ये संस्थापक शेअरधारकांचा प्रभाव कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने हे निर्देश दिले होते. कोटक महिंद्रा बँकेने या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिलेले आहे. मागील वर्षी ५०० कोटी रुपयांचे प्रेफरन्स शेअर जारी करून जी भागीदारी कमी करण्यात आली, ती रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार असल्याचा तर्क बँकेच्या वतीने देण्यात आला आहे.


    न्यायालयातील कागदपत्रांनुसार बँक उदय कोटक यांची भागीदारी कमी करण्यासाठी निर्धारित करण्यात आलेली कालावधीची मर्यादा २०१४ आणि २०१६ मध्ये पालन करण्यास अपयशी ठरली होती. विशेष म्हणजे मागील वर्षी सप्टेंबरमध्ये रिझर्व्ह बँकेने शेअर भागीदारी नियमांचे पालन करण्यात अपयशी ठरल्यामुळे बंधन बँकेचे सीईओ चंद्रशेखर घोष यांचा पगार वाढवणे आणि नवीन शाखा सुरू करण्यावर बंदी घातली होती. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स निर्देशांकानुसार सध्या कोटक यांची संपत्ती ७९,८०० कोटी रुपये आहे. बँकेचा एनपीए सर्वात कमी, तर निव्वळ नफा सर्वाधिक आहे. यामुळे पाच वर्षांत बँकेच्या शेअरमध्ये २५० टक्क्यांची वाढ झाली आहे. उदय कोटक यांनी शेअर होल्डिंग नियमांचे पालन करण्यासाठी जितका उशीर करता येईल, तितका उशीर केला असल्याचे मत स्वतंत्र विश्लेषक हेमिंद्र हजारी यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी नियमांचे योग्य प्रकारे पालन केले असते तर त्यांना कमी दरावर शेअरची विक्री करावी लागली असती.

Trending