आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशियातील सर्वात श्रीमंतांमध्ये मुकेश अंबानी यांच्या एकूण संपत्तीत सर्वाधिक 1 लाख कोटींची भरघोस वाढ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (६२) यांची एकूण संपत्ती १ जानेवारीपासून २३ डिसेंबरपर्यंत तब्बल १६.५ अब्ज डॉलर अर्थात १.१७ लाख कोटींनी वाढली आहे. आशियातील सर्व श्रीमंतांचा विचार करता अंबानींच्या या एकूण संपत्तीत झालेली वाढ सर्वाधिक आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजला या वर्षी शेअरमध्ये झालेल्या ४० टक्के वाढीमुळे अधिक लाभ झाला आहे. अंबानी यांच्याकडे रिलायन्सचे ४७ टक्क्यांहून अधिक शेअर्स आहेत.

ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सनुसार, अंबानींची सध्याची एकूण संपत्ती ६०.८ अब्ज डॉलर म्हणजे ४.३१ लाख कोटी रुपये आहे. चीनची सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अलिबाबाचे संस्थापक जॅक मा यांची एकूण संपत्ती या वर्षी ११.३ अब्ज डॉलर म्हणजे ८०,२३० कोटी रुपयांनी वाढली आहे. त्यांची सध्याची एकूण संपत्ती ४७ अब्ज डॉलर (३.३३ लाख कोटी रुपये) आहे. मुकेश अंबानी गेल्या वर्षी जॅक मा यांना मागे टाकून आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले होते.

रिलायन्स जिओ तीन वर्षांतच ठरली सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी

रिलायन्सने गेल्या काही वर्षांत रिफायनिंग आणि पेट्रोकेमिकल्सच्या मुख्य व्यवसायाचा विस्तार करून रिटेल व टेलिकॉन सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात झेप घेतली. टेलिकॉम क्षेत्रात अंबानी यांनी ५० अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. जिओने ३ वर्षांतच देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी होण्याचा मान मिळवला आहे. रिलायन्सची ई-कॉमर्समध्ये उतरण्याचीही तयारी सुरू आहे. मुकेश अंबानी यांनी ऑगस्टमध्ये म्हटले होते की, २०२१ पर्यंत रिलायन्स कर्जमुक्त करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यानुसार रिपायनिंग व पेट्रोकेमिकल्स व्यवसायातील २० % शेअर्स १ लाख कोटींत सौदीच्या आरामकोला विकण्यासाठी करार झाला आहे.

टेलिकॉम, रिटेलचे शेअर्स ५ वर्षांत बाजारात

जिओच्या लाँचिंगनंतर आतापर्यंत रिलायन्सच्या शेअर्सची किंमत तिप्पट वाढली . रिलायन्स जिओचा प्रारंभ ५ सप्टेंबर २०१६ रोजी झाला. ७ सप्टेंबर २०१६ रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरची किंमत ५०८.७३ रुपये होती. आता ती १५५० हून अधिक आहे. रिलायन्सच्या शेअर्सनी या वर्षी ४० टक्के रिटर्न दिला आहे. १ जानेवारीला ही किंमत १,१२१.३५ रुपये होती.
 

बातम्या आणखी आहेत...