भारीप नेते आसिफ / भारीप नेते आसिफ खान हत्याकांड: आसिफ यांच्या डोक्याला गंभीर मार असल्‍याचे शवविच्छेदन अहवालात उघड

प्रतिनिधी

Aug 26,2018 12:38:00 PM IST
अकोला - भारिप- बमसंचे नेते, वाडेगावचे माजी सरपंच आसिफ खान मुस्तफा खान यांच्या मृतदेहाचे शुक्रवारी विच्छेदन केले. या वेळी त्यांच्या डोक्याला गंभीर मार असल्याचे समोर आले. यावरून त्यांच्या डोक्यावर मारले, त्यानंतर त्यांचा गळा आवळून खून केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. आरोपींनी दिलेल्या कबुलीजबाबात मारहाण करुन नंतर गळा दाबून हत्या केली असे आले नाही.


शवविच्छेदन अहवालावरून मूर्तिजापूर ठाण्यात वाशीम जि. प. च्या माजी अध्यक्षा ज्योती गणेशपुरेसह सहा आरोपींवर खून करणे, पुरावा नष्ट करणे, खुनाचा कट रचणे असे गुन्हे दाखल केले आहेत. आरोपी ज्योती अनिल गणेशपुरेने आसिफ खान यांना एरंडा आमला येथे बहिणीच्या घरी बोलावले होते. तेथे मुलगा वैभव, बहिणीचा मुलगा गोलू, कळंबेश्वर येथील तिघांच्या मदतीने खून करुन त्यांचा मृतदेह पूर्णा नदीत फेकला होता. आरोपींनी खूनाची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी आसिफ खान यांच्या मृतदेहाचा शोध सुरु केला होता. सात दिवसांनंतर त्यांचा मृतदेह ब्रम्हपुरीतील नदीपात्रात आढळला. मृतदेहाच्या विच्छेदनानंतर मृतदेहाच्या डोक्यामागे गंभीर इजा झाल्याचे समोर आले. त्यावरून आरोपींनी आसिफ खान यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने मारहाण केली असावी, नंतर गळफास देऊन त्यांना ठार केले असावे, असे दिसून येत आहे. मात्र तपासात ते समोर येणार आहे. ज्योती गणेशपुरेसह सहा आरोपी २७ ऑगस्टपर्यंत कोठडीत आहेत. तपास मूर्तिजापूर पोलिस करीत आहेत.

तपासाचे आव्हान!
मूर्तिजापूर ठाण्यात गुन्हा नोंदी नंतर आरोपींनी एरंडा आमला येथे खून केल्याची माहिती दिल्यानंतरही पोलिसांनी दोन दिवस घटनास्थळाची झडती घेतली नव्हती. आसिफ खान हत्याकांडाचे प्रकरण गुंतागुंतीचे असल्याने याचा तपास गांभीर्याने होणे गरजेचे आहे. कारण घटनास्थळ अमरावती जिल्ह्यात, मृतदेहाची विल्हेवाट बोरगाव मंजू ठाणे हद्दीत. मृतदेह दहिहांडा ठाणे हद्दीत आढळल्याने याचा तपास सक्षम अधिकाऱ्याकडे देण्याची गरज आहे.

X
COMMENT