मौन सोडू चला / मौन सोडू चला बोलू : शेजारचे काका, शिक्षक यांचीच मला भीती वाटते

सोयगाव हे किशोरवयीन मुलींच्या अस्वस्थतेमुळे चर्चेत आलेलं गाव. या परिसरातील मुलींचं एक सर्वेक्षण नुकतंच झालं.

दिव्य मराठी

Mar 03,2019 11:35:00 AM IST

सोयगाव - सोयगाव हे किशोरवयीन मुलींच्या अस्वस्थतेमुळे चर्चेत आलेलं गाव. या परिसरातील मुलींचं एक सर्वेक्षण नुकतंच झालं. त्यात दोन प्रश्न होते. एक, तुम्हाला काय आवडतं आणि दोन, तुम्हाला कशाची भीती वाटते? १२३ किशोरवयीन मुलींनी आपली प्रतिक्रिया नोंदवली. प्रतिक्रियेचे हे कागद हातात आले आणि सर्वांनाच धक्का बसला.


महिलांसाठी असुरक्षित देश म्हणून भारताची प्रतिमा आहे. याचे गावपातळीवरील दृश्य चित्रण नुकत्याच झालेल्या या सर्वेक्षणातून हाती आले. यानुसार, ६३ टक्के मुलींनी आम्हाला शेजारचे काका, अामचे काही शिक्षक आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या टवाळखोर मुलांची भीती वाटते, असे मत व्यक्त केले. शिक्षक आणि शेजारचे काका नको असणारा स्पर्श करतात, असेही काही मुलींनी लिहिले आहे.


‘दिव्य मराठी’च्या पुढाकारातून अस्मिता फाउंडेशन यांच्या वतीने औरंगाबाद तालुक्यातील सोयगाव येथे किशोरवयीन मुलींसाठी ‘मौैन सोडू, चला बोलू’ या संवाद सत्राचे आयोजन नुकतेच करण्यात आले. मला सर्वात जास्त माझी आई आवडते, मैत्रिणींशी गप्पा मारायला आवडतात, अशी प्रतिक्रिया सर्वेक्षणातील बहुतांश मुलींनी दिली. या मुलींशी संवाद होणे किती महत्त्वाचे आहे, हे यानिमित्ताने अधोरेखित झाले.


स्वप्न भंगणार तर नाही?
माझे पोलिस व्हायचे स्वप्न आहे. पण गावातले वातावरण पाहता ते पूर्ण होईल की नाही, अशी भीती सर्वेक्षणात एका मुलीने व्यक्त केली. तर शाळेतून घरी जाण्याचा रस्ता तसेच घर, परिसर असुरक्षित असल्याच्या भावना उत्तरांतून व्यक्त झाल्या. अशा वातावरणात मुलींचे शिक्षण सुरू आहे, ही खूप गंभीर बाब आहे.


समिती आढावा घेईल!
जरंडी येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर मुलींनी ही भीती व्यक्त केली असावी. परंतु प्रत्येक गावात जिल्हा परिषदेची शाळा असल्याने मुलींना शाळाही जवळ आहेत. तरीही शाळांतील शिक्षण समित्यांना गावांचा आढावा घेऊन उपाययोजना आखण्यास सांगू. -विजय दोतोंडे, गटशिक्षणाधिकारी, सोयगाव

X
COMMENT