आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमेदवाराची 'गाव तिथे बिअर बार'ची अजब घोषणा; दारुबंदीच्या जिल्ह्यात दारुला दिले उघड समर्थन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रपूर - राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.  निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी आणि उमेदवारांनी कंबर कसली आहे. आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या विजयासाठी पक्षातील दिग्गज मंडळी सभा घेत आहेत तर काही जण सेलिब्रिटींची मदत घेत आहेत. निवडणुकीत चर्चेत राहण्यासाठी कोण काय करेल, याचा काहीही नेम नाही. चंद्रपूरच्या चिमूर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराने प्रचारासाठी अजब शक्कल लढवली आहे. ज्या जिल्ह्यात दारुबंदी आहे, त्याच जिल्ह्यात या उमेदवाराने दारुला उघड समर्थन दिले आहे. 
 
चिमूर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार वनिता राऊत यांनी थेट जाहीरनाम्यातून दारुला समर्थन दिले आहे. त्यांनी ‘गाव तिथे बिअर बार’ अशी घोषणा देत प्रचाराचा नारळ फोडला. दारुबंदी असलेल्या जिल्ह्यात वनिता राऊत यांनी ही घोषणा दिल्याने सध्या चंद्रपुरात सर्वत्र या घोषणेची चर्चा होत आहे.
 
चिमूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या अपक्ष उमेदवार वनिता राऊत यांनी एक पत्रक काढले. या पत्रकात 'बेरोजगार तरुणांना दारु विक्रीचे परवाने, गाव तिथे बिअर बार, दारिद्र्य रेषेखालील लोकांना सवलतीत दारु,'  अशी आश्वासने दिली आहेत. 
 
चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या चार वर्षांपूर्वी झालेल्या दारुबंदीचा कसा फज्जा उडाला, हे त्यांनी या पत्रकात नमूद करुन, मी निवडून आल्यास दारुबंदी कशी हटवता येईल, याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. चिमूर तालुक्यातील पेंढरी इथे राहणाऱ्या वनिता राऊत यांनी याच मुद्यावरून प्रचाराला सुरुवात केली. त्यांच्या या अजब घोषणांची आता चर्चा होऊ लागली आहे. तसेच, त्यांनी काढलेले पत्रही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.