आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वंचितची काँग्रेसला ऑफर; महाआघाडीस फक्त 40 जागा देण्यास तयार, 10 दिवसांची मुदत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - लोकसभा निवडणुकीत मतांची मोठी आघाडी घेतलेल्या आंबेडकर-ओवेसी यांच्या वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस- राष्ट्रवादीला आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अवघ्या ४० जागा सोडत असल्याचे बुधवारी जाहीर केले. १० दिवसांत काँग्रेसने निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही स्वबळावर लढू, असा इशारा वंचित आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिला. 


लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी व काँग्रेस यांच्यात जागावाटपाचा तिढा न सुटल्याने दोघांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या होत्या. त्याचा मोठा फटका राज्यात काँग्रेस महाआघाडीला बसला होता. परिणामी काँग्रेसने विधानसभेसाठी वंचितशी जुळवून घेण्याचे दिल्लीत नुकतेच सूतोवाच केले आहे. त्या पार्श्वभूमीवर वंचित आघाडीने दादर येथील आंबेडकर भवन येथे बुधवारी पत्रकार परिषद घेतली. त्याला आघाडीचे महासचिव गोपीचंद पडळकर, सचिव अरुण सावंत, पार्लमेंटरी बोर्ड सदस्य अण्णाराव पाटील आणि अशोक सोनोने हजर होते. 


विशेष म्हणजे आजच्या पत्रकार परिषदेला वंचित आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर हजर नव्हते. काँग्रेस पक्षाने आम्हाला विधानसभेसाठी आघाडीचा कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. मात्र, आमची काँग्रेसबरोबर आघाडी करण्याची इच्छा आहे. आम्ही काँग्रेस आघाडीतील ५६ पक्ष, संघटनांना मिळून एकूण ४० जागा सोडू शकतो. उर्वरित २४८ जागा वंचित आघाडीकडे राहतील, असे पडळकर यांनी सांगितले.


वंचितने देऊ केलेला प्रस्ताव गमतीशीर : काँग्रेस
देशात सामाजिक ऐक्य व लोकशाहीला धोका निर्माण झालेला आहे. अशा परिस्थितीत पुरोगामी व धर्मनिरपेक्ष विचारांच्या पक्षांनी एकत्र येण्यासाठी काँग्रेस गांभीर्याने प्रयत्न करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे रक्षण करण्यासाठी काँग्रेसप्रमाणेच अन्य पक्षांनीही गांभीर्याने विचार करावा अशी अपेक्षा आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीकडून काँग्रेसला ४० जागा देण्याचे केलेले वक्तव्य गमतीशीर असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...