political / विधानसभा युतीतूनच लढणार, पवारांच्या वक्तव्याकडे लक्ष देऊ नका : उद्धव ठाकरे

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत माझ्याकडे पंचांग आलेले नाही
 

विशेष प्रतिनिधी

Jun 15,2019 11:15:00 AM IST

मुंबई - विधानसभेसाठी आपल्याला युतीतच लढायचे आहे. जागावाटप व मुख्यमंत्रिपदाबाबत भाजपाध्यक्ष अमित शहा व मुख्यमंत्र्यांशी बोलणी सुरू आहेत. तुम्ही पीक विमा योजना, शेतकऱ्यांच्या समस्यांवर जिल्ह्यात आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. युतीत वाद सुरू असल्याचा प्रचार शरद पवार करत असतील, तर त्याकडे लक्ष देऊ नका. त्यांना त्यांच्या भ्रमात राहू द्या, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांसमोर मांडली.


शुक्रवारी शिवसेना भवनात उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेत जिल्हाप्रमुख, संपर्क प्रमुखांची बैठक पार पडली. पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे दिसून येत आहे. पीक विमा मिळावा म्हणून त्यांच्या मदतीसाठी पक्षाच्या माध्यमातून ५ दिवसांत पीक विमा योजना आधार केंद्रांची स्थापना करा, असे आदेश ठाकरेंनी या वेळी दिले.


अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मागण्या मंजुरीचे आश्वासन : अंगणवाडी कर्मचारी तसेच आशा व गटप्रवर्तकांच्या कृती समितीच्या प्रतिनिधींनी मानधन तसेच पेन्शनसंबंधी मागण्यांसंदर्भात उद्धव ठाकरेंची शुक्रवारी दुपारी शिवसेना भवनात भेट घेतली. त्यांच्या मागण्या मंजूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन देत ठाकरे यांनी एकनाथ शिंदे, रामदास कदम, नीलम गोऱ्हे यांच्यावर ३-४ दिवसांत याची पूर्तता करण्याची जबाबदारी सोपवली.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत माझ्याकडे पंचांग आलेले नाही
मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातम्या सातत्याने येत असून आता रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे, असे म्हटले जात आहे. विशेष म्हणजे, रविवारीच उद्धव ठाकरे अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत त्यांना विचारले असता “माझ्याकडे अजून पंचांग आलेले नाही,’ असे मिश्कील उत्तर त्यांनी दिले. शुक्रवारी निफाड तालुक्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष विक्रम रंधवे व सचिन पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.

X
COMMENT