आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभेची तयारी : युतीचे 250 जागा विजयाचे लक्ष्य, आजवर न जिंकलेल्या जागांवर नजर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाध्यक्ष अमित शहांनी भाजपने देशात आजवर न जिंकलेल्या जागांवर २ वर्षांपासून लक्ष केंद्रित केले होते. या जागा जिंकल्यास ३००चा आकडा पार करू, असा विश्वास त्यांना होता आणि त्यानुसारच भाजपने ३०० पेक्षा जास्त जागांवर विजय संपादित केला. लोकसभेच्याच धर्तीवर आता राज्यातही युती २५० जागांचे लक्ष्य ठेवून मैदानात उतरणार असून आजवर न जिंकलेल्या जागांवर विशेष लक्ष देणार असल्याची माहिती भाजपमधील सूत्रांनी “दिव्य मराठी’ला दिली.


लोकसभा निवडणुकीत युतीने घवघवीत यश संपादन करत राज्यात ४१ जागा जिंकल्या. या विजयादरम्यान उत्तर महाराष्ट्रातील ३६ विधानसभा मतदारसंघांपैकी २५ ठिकाणी भाजपने चांगले मताधिक्य मिळवले असून शिवसेना ६, काँग्रेस ४ आणि राष्ट्रवादीने एका जागेवर मताधिक्य मिळवले आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात युतीला फक्त थोडी ताकद लावण्याची गरज आहे. विदर्भातील ६० विधानसभा मतदारसंघांपैकी भाजप २९, शिवसेना २०, काँग्रेस ७ आणि युवा स्वाभिमानी पक्षाने ४ जागांवर मताधिक्य मिळवले आहे. यापैकी काँग्रेसचे मताधिक्य असलेल्या जागांवर युती विशेष लक्ष देणार असून ६० पैकी ५५ ते ५८ जागांचे लक्ष्य ठेवण्यात आलेले आहे. मराठवाड्यातील ४८ विधानसभा मतदारसंघांपैकी भाजप २१, शिवसेना २०, काँग्रेस ३, राष्ट्रवादी २ आणि एमआयएमने एका मतदारसंघात मताधिक्य प्राप्त केलेले आहे. 


पश्चिम महाराष्ट्रातील ७२ विधानसभा जागांपैकी भाजप २६, शिवसेना २८, काँग्रेस १, राष्ट्रवादी १६ आणि स्वाभिमानी पक्षाने एका जागेवर मताधिक्य मिळवलेले आहे. राष्ट्रवादीने मताधिक्य मिळवलेल्या जागांवर कब्जा करण्याचा प्रयत्न करून येथे जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न केला जाणार असून कोकण, मुंबईतील ७२ विधानसभा मतदारसंघांपैकी भाजप २०, शिवसेना ३८, काँग्रेस ६, राष्ट्रवादी ४ आणि अन्य पक्षांनी ४ जागांवर आघाडी घेतलेली आहे. हा भाग शिवसेनेचा बालेकिल्ला असून या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आणखी काही जागा कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असेही सूत्रांनी सांगितले.


शिवसेना ३२, भाजपला १३ जागांवर आजवर विजय मिळवता आला नाही
शिवसेनेने राज्यातील ३० ते ३२ जागा , तर भाजपने १२ ते १३ जागा कधीही जिंकलेल्या नाहीत. मात्र, आता समीकरण बदललेले असल्याने या वेळी या जागांवर लक्ष केंद्रित करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागा आणखी कमी करण्यावर भाजपचा भर असणार आहे.


आघाडीच्या आमदारांचे इनकमिंग पथ्यावर
केंद्रात आलेले भाजपचे सरकार आणि भाजप-शिवसेनेची राज्यातील वाढती ताकद पाहून काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक आमदार युतीच्या गळाला लागण्याची शक्यता वर्तवून सूत्रांनी सांगितले. आम्ही आधी २२५ जागांपर्यंत मजल मारू, असे म्हणत होतो. परंतु, हे आमदार आल्यानंतर युतीची ताकद आणखी वाढणार. त्यामुळे २५०चा पल्लाही पार करण्यात यशस्वी होऊ, असे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.