Flood / धानोरा मक्ता येथे दोघेजण पुरामध्ये वाहून गेले; तीन शेततळीही फुटली

सलग तीन ते चार दिवसांपासून होत असलेल्या पावसाने किनवट तालुक्यात पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. सलग तीन ते चार दिवसांपासून होत असलेल्या पावसाने किनवट तालुक्यात पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे.

लोहा तालुक्यात मुसळधार;  पूल वाहून गेल्याने आष्टूर-लोहा मार्ग बंद

Sep 03,2019 08:09:00 AM IST

नांदेड - लोहा शहर व तालुक्यात रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने हाहाकार उडाला आहे. शहराजवळील सात किमीवरील धानोरा (मक्ता) येथे दोन दुचाकीस्वार नदीपात्रात वाहून गेले. तीन वेगवेगळ्या आपत्ती शोध पथकांकडून या दाेघांचा शाेध सुरू आहे. तर सावरगावजवळील पूल वाहून गेल्याने आष्टूर लोहा मार्ग बंद पडला. हळदव येथे तीन शेततळे फुटल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले. कलंबरमध्ये घरात पाणी घुसले तर खेडकरवाडी येथील जुन्या पाझर तलावाच्या पाळूला तडे गेले आहेत.


लोहा शहराजवळील धानोरा (मक्ता) येथे रविवारी रात्री नदीला (ओटा) पूर आला होता. गावातील जयराम काशीनाथ भुजबळ (वय ४२) व बंडू एकनाथ बोंडारे ( वय ४३) हे दोघे दुचाकीस्वार पूल ओलांडताना पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेले. रात्रीची वेळ असल्यामुळे त्यांचा बचाव होऊ शकला नाही. सकाळी गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेतला असता त्यांची दुचाकी मिळाली. पण ते दोघे बेपत्ता झाले अाहेत. जि.प.चे माजी सभापती प्रविण पाटील चिखलीकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. ग्रामस्थांकडून घटनेचा तपशील जाणून घेत तहसीलदारांना शोध घेण्यासाठी पथक पाचारण करण्याचे सांगितले. उपविभागीय अधिकारी पी. एस. बोरगावकर, तहसीलदार विठ्ठल परळीकर, नायब तहसीलदार राम बोरगावकर, अशोक मोकले, तलाठी बिद्राळे यांच्या टीमने सकाळपासून घटनास्थळावर शोध मोहीम राबवली. दोन स्वतंत्र पथक नांदेडहूनही मागवण्यात आले.


सावरगावजवळ पूल वाहून गेला : लोहा तालुक्यातील सावरगाव नसरत येथील गावालगतचा पूल रात्रीच्या पावसाने वाहून गेला. शिवाय शेतीतील पिकामध्ये पाणी शिरल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. आष्टूरकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे. पंचायत समितीचे उपसभापती बालाजी पाटील कदम व सरपंचांनी नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करावी अशी मागणी केली आहे.


सुनेगाव तलाव भरला : लोहा शहरासाठी पाणी पुरवठा सुनेगाव तलावातून होत असतो. यंदा हा तलाव कोरडा पडला त्यामुळे शहराला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. पावसाळ्यातही शहरात पाणी समस्या तीव्र होती. परंतु सतत दोन दिवसापासून झालेल्या पावसामुळे सुनेगाव तलाव पूर्ण भरला आहे.

हळदव येथे तीन शेततळी फुटली; शेतीचे नुकसान
लोहा शहरालगतच्या डम्पिंग ग्राउंड भागात हळदव येथील माजी सरपंच भीमराव पाटील शिंदे व हरी पाटील शिंदे या भावांच्या शेतीतील शेततळी मुसळधार पावसाने फुटली. शेततळी फुटल्याने त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर खेडकरवाडी येथील पाझर तलावाच्या पाळूला तडे गेले त्यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे. कलंबर गावात काही भागातील घरांमध्ये पाणी शिरून संसाराेपयाेगी साहित्य खाद्यपदार्थ अन्नधान्याची हानी झाली.

किनवट : अंघोळीला गेलेला तरुण पुरात वाहून गेला

पैनगंगा नदीवर अंघोळीसाठी गेलेल्या वीस वर्षीय युवक पुराचा लोंढा आल्याने वाहून गेला. ही घटना सोमवारी किनवट येथे घडली. वाहून गेलेल्या युवकाचा शोध स्थानिक मच्छीमार घेत आहेत. या वेळी हरितालिका गौरी विसर्जनासाठी गेलेल्या २५ महिलाही सुदैवाने बचावल्या आहेत.


किनवट शहरात सर्वत्र गणेश स्थापनेची लगबग सुरू असताना इस्लामपुरा भागात राहणारा शेख सोहेल शेख बाबा (वय २० वर्ष) अंघोळीसाठी पैनगंगा नदीवर गेला. दुपारी १ च्या सुमाराला पैनगंगेला अचानक आलेल्या पुरात तो वाहून गेला. वाहून जाताना त्याच्या मित्रांनी बचावासाठी आरडा-ओरड केली पण त्याला वाचवणारे कुणी नसल्याने तो वाहून गेला.


नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, तहसीलदार नरेंद्र देशमुख यांनी घटनास्थळावर धाव घेऊन मच्छीमारांना बोलावून सोहेलचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. शेख सोहेल हा आई-वडिलांना एकुलता एक मुलगा असून त्यास पाच बहिणी आहेत.

X
सलग तीन ते चार दिवसांपासून होत असलेल्या पावसाने किनवट तालुक्यात पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे.सलग तीन ते चार दिवसांपासून होत असलेल्या पावसाने किनवट तालुक्यात पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे.