आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रफाल कराराच्या वेळी मी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदी नव्हतो : इमॅन्युएल मॅक्रॉन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संयुक्त राष्ट्र- रफालवरून भारतात राजकीय वातावरण तापले असतानाच आता फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी वादाच्या मुद्द्यांना बगल देत म्हटले की, फ्रान्स आणि भारत सरकारदरम्यान जेव्हा हा करार झाला होता, तेव्हा मी राष्ट्राध्यक्षपदी नव्हतो. ३६ युद्ध जेट खरेदीचा करार दोन देशांच्या सरकारदरम्यान झाला आहे, असे ते संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेदरम्यान घेतलेल्या पत्रपरिषदेत म्हणाले. 


अद्याप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रफाल वादावर थेट प्रतिक्रिया दिलेली नाही. संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण व इतर वरिष्ठ मंत्र्यांनी आग्रहीपणे म्हटले आहे की, हा भारतीय जनतेसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. या करारात कोणतीही अनियमितता नाही. १० एप्रिल २०१५ रोजी मोदी यांनी पॅरिस येथे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रँकोइस आेलांद यांच्याशी चर्चा करून २३ सप्टेंबर २०१६ ला या कराराला अंतिम रूप दिले होते. यामध्ये एखादा भारतीय उद्योजक असण्याला स्थान कसे काय असेल, असा प्रश्न फ्रान्स सरकारनेही विचारला होता. त्यानंतर भारतात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल सुरू केला. व्यवहारात अनेक अनियमितता असून रिलायन्स डिफेन्स लिमिटेडला लाभ देण्यासाठी प्रयत्न होत असल्याची टीका सुरू आहे. रिलायन्स विमान निर्मिती क्षेत्रातील अनुभवी कंपनी नसूनही असे का, हा मुख्य प्रश्न विरोधकांनी उचलून धरला आहे. शिवाय आेलांद यांच्या वक्तव्यांमुळेही मोदी सरकार अडचणीत आले आहे. 


भारत-फ्रान्स संरक्षण व लष्करी सहकार्य कराराचा हा एक भागच 
आेलांद यांनी काय म्हटले होते? :
फ्रान्समधील माध्यमांनी २०१५ मध्ये फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदी असलेल्या फ्रँकोइस आेलांद यांचे वक्तव्य प्रकाशित केले होते. 'रफाल व्यवहारात भारतीय कंपनीची निवड नवी दिल्लीच्या आदेशाने करण्यात आली आहे. भारत सरकारने रिलायन्स डिफेन्सच्या नावाचा प्रस्ताव दिला आहे. रफाल करारात ही कंपनी भागीदार असून फ्रान्सकडे याशिवाय पर्याय नाही,' असे आेलांद यांनी म्हटले होते. 'मीडियापार्ट' या फ्रेंच भाषिक वृत्तपत्रात हे वक्तव्य छापून आले होते. डसॉल्ट या युद्ध जेट निर्माता कंपनीने अनिल अंबानींशी वाटाघाटी कराव्यात, असे सांगितल्याचे आेलांद म्हणाले. भारताने दिलेल्या समन्वयकाशी बोलण्याशिवाय मार्गच नाही, असे आेलांद यांनी नमूद केले. डसॉल्ट रिलायन्स एरोस्पेस लिमिटेडची निर्मिती यातूनच फेब्रुवारी २०१७ मध्ये झाली. 


भाजप ४ वर्षांपासून पिच्छा पुरवत आहे : वाड्रा 
नवी दिल्ली : संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांनी भाजप आपल्यावर गेल्या ४ वर्षांपासून नजर ठेवून असल्याचे म्हटले आहे. विचित्र राजकीय प्रेरणांनी भाजप झपाटला असल्याचा आरोप त्यांनी केला. बुधवारी वाड्रा यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. ऊठसूट आपले नाव भ्रष्टाचारात गोवण्याचा सत्ताधारी पक्ष प्रयत्न करत आहे. रफाल करार म्हणजे भाजपने केलेला सर्वात मोठा फार्स अाहे. खरंच त्यांच्याकडे ५६ इंची जिगर असेल तर त्यांनी रफालचे सत्य देशाला सांगावे, असे वाड्रा म्हणाले. 


रिलायन्स डिफेन्सला प्रस्तावाच्या प्रश्नाला टाळले 
इमॅन्युएल मॅक्रॉन हे संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण सभेसाठी येथे आले आहेत. त्यांना पत्रपरिषदेत माध्यमांनी विचारले की, रफाल करारामध्ये भारत सरकारने फ्रान्स किंवा रफाल युद्ध विमान निर्माता कंपनी डसॉल्टला रिलायन्स डिफेन्सला भागीदार बनवण्याचा मुद्दा मांडला होता का? यावर मॅक्रॉन म्हणाले की, ही २ देशांच्या सरकारमधील बोलणी होती. मे २०१७ मध्ये मी सत्तेत आलो आहे. हा करार झाला तेव्हा मी पदावर नव्हतो. मात्र, फ्रान्स सरकारचे नियम अत्यंत सूक्ष्म व स्पष्ट आहेत, इतकेच मी सांगेन. शिवाय उभय देशांतील लष्करी व संरक्षण सहकार्याची व्यापक पार्श्वभूमी या विषयाला आहे. त्यामुळे मी काहीच कमेंट करू शकत नाही. उभय देशांतील सहकार्य धोरणाच्या संदर्भात हा करार पाहिला जावा. आैद्योगिक नव्हे. 

बातम्या आणखी आहेत...