आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी भावविश्वात ‘मर्मबंधातली ठेव’ बनलेल्या गीतरामायणाचा रौप्यमहोत्सव १७ मार्च १९८० रोजी पुण्यात साजरा झाला होता. गीतरामायणाचे गीतकार ग. दि. माडगुळकर त्या वेळी हयात नव्हते, मात्र गायक सुधीर फडकेंची उपस्थिती होती. या सोहळ्यात अटलबिहारी वाजपेयी यांनी बहारदार लखनवी हिंदीत रामायणावर ४५ मिनिटं नितांतसुंदर विवेचन केलं. भारतरत्न भीमसेन जोशी अध्यक्षस्थानी, तर शरद पवार, बाबासाहेब पुरंदरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. वाजपेयींच्या त्या १९८० मधल्या भाषणाचा हा संपादित भाग.


गुढीपाडव्याचा आजच्या ऐतिहासिक दिवशी सरलेल्या काळाची चित्रे आपल्या डोळ्यांपुढे उभी राहतात. परकीयांचा पराभव करून राष्ट्रीय अस्मिता चेतवणारे, आत्मगौरवाची प्रतिष्ठापना करणारे महापुरुष आपल्याला प्रेरणा देत असतात. लखलखत्या नक्षत्राप्रमाणे ते आपल्या स्मृतींमध्ये चमकत राहतात. गीतरामायणाचा रौप्यमहोत्सव आज या पुण्यनगरीत साजरा होतो आहे हा आपल्या सर्वांच्या सांस्कृतिक जीवनातला मैलाचा दगड आहे. हजारो वर्षांपासून रामकथा जनमानसाला आंदोलित करत आली आहे. प्रोत्साहित करत आली आहे. रामकथा म्हणजे नवरसांचा कधी न आटणारा झरा आहे. अनंत, अगाथ आहे रामकथा. कोणत्या ना कोणत्या युगात या कथेतला एखादा रंग एखादा कलाकार ठळकपणे रेखाटतो, कोणी साहित्यिक एखादा रस घेऊन तो अधिक उत्कटतेने सादर करतो. कधी महाकाव्य, कधी प्रबंध, कधी खंडकाव्य अशा नाना साहित्यप्रकारांमधून रामकथा दाही दिशांमध्ये, सगळ्या भाषांमध्ये, मानवी जीवनाच्या सर्व अवस्थांमध्ये, आशेच्या काळात, निराशेच्या गर्तेत, विजयात, पराजयात पाथेय बनून, संकटकाळात संजीवनी बनून, तर आनंदप्रसंगी आध्यात्मिक उंचीवर घेऊन जाण्याचे काम करत आली आहे. (टाळ्या)

 

विदेशातही रामकथेचा गौरव केला जातो. आपल्या सगळ्या शेजारी देशांमध्ये कोणत्या ना कोणत्या रूपात रामकथा जनमानसावर प्रभाव टिकवून आहे. परिस्थितीच्या रेट्यात भलेही त्या देशांमध्ये भिन्न धर्माचे आचरण होऊ लागले असेल, पण रामकथेच्या गोडीला तिथं ओहोटी लागलेली नाही. ब्रह्मदेशाची राजधानी रंगून इथं सांस्कृतिक महोत्सवाला उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली. त्यात रामकथा होती. सीतेला मोहवणाऱ्या सोन्याच्या हरणाची कथा मी तिथं अनुभवली. इंडोनेशियात महिनाभर रामायणाचा उत्सव चालतो. त्या देशाचं सांस्कृतिक संचित रामायण आहे. थायलंड, कंबोडियातल्या संस्कृतीमध्येही रामायण रुजलं आहे. श्रीलंकेच्या बाबतीत मी खात्रीनं सांगू शकणार नाही, कारण रामायाणातली जी श्रीलंका आपल्याला अभिप्रेत आहे, ती म्हणजे आजची नव्हे. रामायणातल्या श्रीलंकेचा शोध चालू आहे. कदाचित तिला समुद्रात जलसमाधी मिळाली असेल. पुरातत्त्व संशोधक ती शोधून काढतील.

 

रामायणात महान भारताच्या इतिहासाचे भव्य चित्रण आहे. राम अयोध्येत जन्माला आले. अयोध्या उत्तरेत आहे. त्यांचा विवाह ज्या जनकपुरात, मिथिला राज्यात झाला ती मिथिला बिहारमध्ये आहे. भरताचे आजोळ कैकेय तेव्हाच्या अखंडित भारताच्या सीमेवरचं राष्ट्र होतं. ते भरताचं आजोळ कैकेय  म्हणजे आजचा अफगाणिस्तान. त्यामुळे भरत-शत्रुघ्नाला जेव्हा कैकेयला जावं लागलं तेव्हा ते आजचा हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, सिंध प्रांत ओलांडून तिथे गेले. हा सगळा प्रदेश कधीकाळी आपला होता. दक्षिण भारतही रामायणातून सुटलेला नाही. रामाच्या नशिबी वनवास आला. वनं काही फक्त दक्षिणेतच होती, असं नव्हे. हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या जंगलांमध्ये राम वनवासाला जाऊ शकले असते. काश्मरचीही यात्रा करु शकले असते. (हशा) ते केदारला गेले नाहीत. बद्रीनाथला गेले नाहीत. वनवासासाठी रामाने दक्षिणेची निवड केली. चित्रकूट, पंचवटी, किष्किंधा, पंपासुर, रामेश्वर; जणू सारा भारत त्यांना बाहूंमध्ये सामावून घ्यायचा होता. पण रामांचा हेतू वेगळा असावा. त्या वेळी केंद्रीय सत्ता दुर्बल झाली होती. (हशा) राष्ट्रीय शक्ती कमजोर झाली होती. समाज संभ्रमात होता. ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज ज्यांचा संबंध जन्माने दिलेल्या जातींशी अजिबात नसून कर्तृत्वाशी होता, अशा शक्ती एकजिनसीपणानं उभ्या नव्हत्या.

 

एवढंच काय विश्वामित्र आणि वशिष्ठ या गुरुवर्यांमध्येही मतभेद होते. भारतीय संस्कृती धोक्यात आली होती. त्याच वेळी विश्वामित्रानं राजा दशरथाला त्याचे पुत्र मागितले होते. दशरथ सहृदयी राजा होता. मनात आणलं असतं तर तो विश्वामित्रांना हवं तितकं सैन्य घ्या, पण माझे पुत्र नको, असं म्हणू शकला असता. पण त्यानं तसं म्हटलं नाही. देशावर संकटं येतात तेव्हा  मातापित्यांना त्यांच्या पुत्रांची आहुती द्यावीच लागते. (टाळ्या) विश्वामित्र ऋषीसुद्धा केवळ यज्ञाच्या रक्षणासाठी रामाला घेऊन आले नव्हते. त्यांचा अंतस्थ हेतू वेगळा होता. तसं नसतं तर ते रामाला जनकपुरीला घेऊन जाते ना.


पण त्यांना वाटत होतं की, अयोध्या आणि जनकपुरी ही राज्यं एकत्र आली पाहिजेत.
यातून पृथ्वीकन्या जानकी रामाची अर्धांगिनी बनली. रामाच्या राज्याभिषेकाच्या कथेत मी जात नाही. राम पुत्र होता. राम बंधू होता. राम पती होता. राम युवराज होता. वेगवेगळ्या नात्यांच्या कर्तव्यात राम बांधला गेला होता. पुत्राच्या कर्तव्यातून रामाने पित्याच्या आज्ञेचं पालन केलं. रामाची इच्छा असती तर सिंहासनावर बसण्यासाठी त्याला बहाणे शोधता आले असते. उत्तराधिकारी म्हणून दशरथानं ज्येष्ठ पुत्र रामाच्या नावाची घोषणा केलेलीच होती. त्यामुळं कायद्याचा आधार तो घेऊ शकला असता. लोकसभेत पुनर्विचाराची मागणी राम करु शकला असता. (हशा) परंतु, रामाने यातलं काही केलं नाही. वनवासाला जाण्यासाठी ते तयार झाले. भरताला गादीवर बसवण्याची सगळी तजवीज कैकयीनं केली होती. मुलाला सत्ता मिळावी ही मातेची भावना समजण्यासारखी आहे. त्यामुळं मी कैकयीला दोष देणार नाही. (जोरदार हशा) कैकयी फार चतुरसुद्धा होती. तिनं फक्त भरतासाठी राज्य मागितलं असं नव्हे तर भरताच्या सत्तेचं संरक्षणही तिनं पाहिलं. म्हणूनच रामासाठी चौदा वर्षांचा वनवास मागितला. राजधानी अयोध्येपासून रामाला दूर धाडा. चौदा वर्षं हा फार मोठा कालावधी झाला. लोकांची स्मृती कमकुवत असते. चौदा वर्षं भरताने सत्ता गाजवल्यानंतर रामाला सगळे विसरुन जातील आणि मीही राजमाता म्हणून निश्चिंत मनाने सत्ता भोगीन असा कैकयीचा कट होता. पण भरतानं सगळा खेळ उधळून लावला. (हशा) ग. दि. माडगुळकरांच्या शब्दात “माता न तू वैरिणी” असं भरत म्हणाला असेल पण ते हृदयावर दगड ठेवूनच. ज्या भरतासाठी कैकयीनं एवढा घाट घातला त्यानंच सत्तेकडं पाठ फिरवली.

 

सुमित्रा मला मोठी राजनितीज्ञ वाटते. सत्तेवर राम येवो की भरत, तिनं दोघांकडेही आपला एकेक मुलगा दिला. (हशा) कदाचित यात तिचं राजकारण नसेलही, पण मी राजकारणात असल्यानं माझ्या नजरेनं असं पाहिलं असावं. (जोरदार हशा) पण यातूनच राम-लक्ष्मण आणि भरत-शत्रुघ्न या बंधूंच्या दोन जोड्या अमर झाल्या. (टाळ्या) राम वनवासाला निघून गेले. त्यांना मृत्यूची भीती नव्हती. भीती असलीच तर ती फक्त बदनामीची होती. माझ्या नावाला खोट लागता कामा नये. पित्याची आज्ञा मोडली म्हणून कोणी माझी निंदा करता कामा नये यासाठी राजवैभवाचा त्याग करून ते चालते झाले. संकटं येत नाहीत असा मनुष्य तरी कोणता आहे या जगात?
राम वनवासात फिरत राहिले. पानाफुलांना, पशुपक्ष्यांना सीतेचा पत्ता विचारत राहिले. जिथं गेले तिथल्या लोकांना एकत्र करत राहिले. संघटन वाढवत नेलं. भरताला संदेश पाठवून फौज मागवली नाही. काय किंमत राहिली असती अयोध्येत? कुठं गेली पत्नी म्हणून सांगितलं असतं? जे करायचं ते स्बळावर. स्वतःच्या हिमतीवर. वालीचा वध केल्यानंतर मरणापूर्वी वालीनं रामाला प्रश्न केला. मी लढलो असतो रावणाविरोधात तुझ्या बाजूनं. माझ्याऐवजी सुग्रीवाकडे का सहकार्य मागितलंस? सुग्रीव वंचित होता. रामाचं आणि त्याचं दुःख सारखं होतं. सीतेची सुटका करण्यासाठी वालीची मदत घेतली असती तर तो रामाचा बरोबरीचा मित्र राहिला नसता. राजकारणात मित्रशक्ती  बरोबरची लागते. भारताच्या उद्याच्या राजकारणासाठी वालीचा वध रामासाठी आवश्यक होता. मरताना वालीनं अंगदाच्या भविष्याची हमी घेतली. रामानंही अंगदाचे अधिकार हिरावून घेतले नाहीत. लंकेत बिभीषणाच्या बाबतीत त्यानं हेच केलं. स्वतःचे उत्तराधिकारी नेमले नाहीत कुठं त्यानं. विस्तारवादाची आकांक्षा त्याला नव्हती. मित्र जोडायचे होते त्याला. वाली, सुग्रीव, हनुमान ही सगळी वानरं होती हा भ्रम डोक्यातून काढून टाका. त्या स्थानिक जाती-जमाती होत्या. रामाचा निरोप घेऊन हनुमान लंकेत पोचला तेव्हा सीतेशी मैथिली भाषेत बोलला. कारण ती दोघं संस्कृतमध्ये बोलली असती तर पहाऱ्यावरच्या राक्षसांना, रावणाला त्याचं बोलणं कळलं असतं.

 

रामकथेतल्या अशा गोष्टी अनोख्या आणि अनुपम आहेत. यांनीच रामाला ‘अवतार’ बनवलं. रामानं आमचं जीवन व्यापलं. उठता-बसता, झोपेत-जागेपणी रामाचं नाव आपण घेतो. मराठीत म्हणतात ‘राम राम पाव्हणं’. नमस्काराची जागा रामानं घेतली. कुठल्याच देशात, कुठल्याच काळात हे घडलं नाही. जन्म रामाबरोबर. मरण रामासोबत. ‘आयाराम’ आणि ‘गयाराम’सुद्धा आता तर ‘लियाराम’ और ‘दियाराम’ पण (प्रचंड टाळ्या आणि हशा) अवघ्या भारतीय जनमानसाला रामानं व्यापून टाकलं आहे.
सीता पवित्र आहे याची खात्री रामाला होती. कणभरही शंका मनात नव्हती. त्या अग्निशिखेकडं वाकड्या नजरेनं पाहण्याची हिंमत तरी होती का त्या रावणात? परंतु, अग्निपरीक्षा सीतेलाच करावी लागते, वेश्येला नव्हे. (टाळ्या) सीतेच्या मनात तरी कुठं शंका होती रामाच्या प्रेमाबद्दल? सीतेवर अन्याय जरूर झाला. पत्नीवर अन्याय केला ‘पती’ रामाने. प्रजेसोबत न्याय केला ‘राजा’ रामाने. आदर्शाचा मुद्दा होता. आचरणाचा मानदंड निश्चित करायचा होता. व्यवहाराची कसोटी द्यायची होती. पुढं लवकुशांचा जन्म आणि पित्याच्या महतीचं गायन करणारे ते दोन पुत्र. हे सगळं अद्भुत आहे. असं महाकाव्य रचण्यासाठी महर्षी वाल्मीकींइतका वेळ आज कदाचित कोणाला मिळणार नाही. परंतु, रामकथेचा संस्कार गीतरामायणाच्या माध्यमातून आज गंधित होतोय, फुलतोय. सुरांमध्ये नाहून निघतोय. कुणी तरी अगदी रास्त वर्णन केलंय – “गीतरामायण रचलेलं नाही. बस्स. घडून गेलं.”
“राम तुम्हारा चरित स्वयं ही काव्य है,
कोई कवी बन जाए सहज संभव है!” गीतरामायण हा भारतीय साहित्याचा वारसा आहे. आकाशवाणीनं तो घरोघर पोहोचवला. केवळ मराठीच नव्हे तर अन्य भाषांमध्येही तो अनुवादीत झाला. रामकथेसारखा विषय, ग. दि. माडगुळकरांसारखा समर्थ कवी, सुधीर फडके यांच्यासारखा कुशल गायक. या त्रिवेणी धारेनं मन पवित्र होऊन जातं यात शंका नाही. माडगुळकर आज आपल्यात नाहीत, पण त्यांच्या दर्शनाची संधी मला मिळाली होती. त्यांची गीतं मी ऐकली आहेत, साहित्य वाचलं आहे.

 

मला आशा आहे, की या गीतरामायणापासून प्रेरणा घेऊन आणखी कवी, साहित्यिक जन्माला येतील. रामायणातल्या उपेक्षित पैलूंवर ते प्रकाश टाकतील. बंधुप्रेमापोटी राज्यावर पाणी सोडणारा तो भरत मला सारखा, सारखा आठवतो. सत्तेसाठी भांडणारा भरत नव्हता. परंतु, या भरताचं एकही मंदिर नाही. कधी कधी मी विचार करतो, की सत्तेसाठी इथं एवढ्या साठमाऱ्या होतात त्याचं कारण काय असावं? कदाचित हेच की आपण भरताची पुजा केली नाही तर रामाचं पुजन करत आलो. (प्रचंड हशा) भरताचं भ्रातृत्व, ऊर्मिलेचा त्याग असे अनेक उपेक्षित प्रसंग गहिऱ्या रंगांमध्ये, प्रगाढ रसामध्ये प्रस्तुत झाले पाहिजेत. मला विश्वास आहे की गीतरामायाणाच्या रौप्यमहोत्सवातून कवी, सारस्वत प्रेरणा घेतील.

 

 

बातम्या आणखी आहेत...