आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सुहास चौधरी
जामनेर - जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अख्तर अली काझी यांना पक्षाने जामनेर विधानसभेची उमेदवारी दिली हाेती. मात्र मतदारसंघाबाहेरील उमेदवार दिल्याने कार्यकर्त्यांत धुसफूस होती. एक बैठक घेऊन त्यांनी अपक्ष नारायण किसन पाटील (नाकी) यांना सर्वानुमते अपक्ष उमेदवार म्हणून घोषित केले. जनसंघाच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवणाऱ्या ‘नाकीं’ च्या प्रचारासाठी आलेल्या अटलबिहारी वाजपेयींनी सभा संपल्यानंतर जामनेरपासून औरंगाबादपर्यंत चक्क मेटॅडोरने प्रवास केला.
तेव्हा जामनेर हा काँग्रेसचा बालेकिल्ला हाेता. १९६२ ते १९७२ अशी १० वर्षे आबाजी नाना पाटील हे आमदार राहिले. मात्र १९७२ च्या निवडणुकीत विद्यमान आमदार असतानाही आबाजी नाना पाटील यांना उमेदवारी न देता काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अख्तर अली काझी यांना उमेदवारी देण्यात आली. अख्तर अली काझी हे नशिराबाद येथील रहिवासी होते. एक तर लादलेला उमेदवार, त्यात जातीची किनार लाभल्याने स्थानिक काँग्रेसींमध्ये नाराजीचा सूर हाेता. यातूनच काही समविचारींनी तातडीची बैठक बोलावली. यात प्रस्थापितांविराेधात नेहमीच लढा देणारे ‘नाकी’हेही हाेते. उमेदवारी गळ्यात पडू नये म्हणून ते खाली मान घालून बसले हाेते. मात्र मराठा समाजातील तगडा उमेदवार म्हणून सर्वांनी त्यांचे नाव सुचवले. जनसंघाचाही पाठिंबा मिळाला. त्यांना काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी छुपा पाठिंबा दिला. त्यांच्या प्रचारासाठी अटलबिहारी वाजपेयी यांनी जामनेरला सभा घेतली. ही सभा संपल्यानंतर अटलजींना औरंगाबादला जायचे हाेते. मात्र कार्यकर्त्यांपैकी कुणाकडेही चारचाकी नसल्याने वाजपेयींनी मेटॅडोरने प्रवास केला. त्या वेळी मेटॅडोरचे १०० रुपये भाडे द्यावे लागल्याची आठवण स्मृती नारायण देशमुख यांनी सांगितली. या निवडणुकीत ‘नाकीं’चा विजय झाला.
अटलजींनी मागितली केळी
भुसावळ येथून नारायण किसन पाटील यांच्या प्रचारासाठी वाजपेयी जामनेरला आले. सभा संपल्यानंतर त्यांना चहापाण्यासाठी फ्रुटसेल सोसायटीच्या कार्यालयात आणले. ‘ये काहे का कार्यालय है? और यहां क्या मिलता है!’ अशी विचारणा अटलजींनी केली. फ्रुटसेलचे कार्यालय असल्याचे सांगताच ‘जलगाव के केले प्रसिद्ध हैं, केले खिलाओ’ असे अटलजी म्हणाले. त्या वेळी देशमुख यांनी पळत जाऊन पिकलेल्या केळीची फणीच उचलून त्यांच्या हाती दिली. त्यानंतर ते औरंगाबादकडे रवाना झाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.