आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अट्टल चोरट्याने सकाळी घेतले विष, पोलिसांनी रुग्णालयात केले दाखल,सायंकाळी पसार; रात्री केली दीड लाखांची चोरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत आजवर घरफोडीच्या अनेक घटना गजानन आत्रामने केल्या आहेत. दरम्यान, गुरूवारी (दि. १५) सकाळी त्याने घरी विष प्रशन केले. त्यानंतर गाडगेनगर पोलिसांनीच त्याला रुग्णालयात दाखल केले. दिवसभर उपचार घेऊन सायंकाळी त्याने रुग्णालयातून पळ काढला आणि मध्यरात्री रामपुरी कॅम्प परिसरातील हरेमाधव दरबारातील दानपेटी फोडून जवळपास सव्वा ते दीड लाखांची रोख लंपास केली आहे.

 

चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, तो गजानन आत्राम असल्याचे पोलिसांनी ओळखले आहे. रामपुरी कॅम्प परिसरात हरे माधव दरबार आहे. या दरबारात मोठ्या प्रमाणात भाविक जातात. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या दानपेटीमध्ये नेहमीच मोठ्या प्रमाणात रक्कम राहते. दरम्यान, गुरूवारी मध्यरात्री आत्रामने दरबारात प्रवेश करून लोखंडी दानपेटीचे कुलूप फोडून त्यामध्ये असलेली रोख लंपास केली आहे. ही चोरी झाल्याचे शुक्रवारी (दि. १६) सकाळी पुढे आले. त्यामुळे घटनेची माहिती तातडीने गाडगेनगर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जावून परिसराची पाहणी केली तसेच याठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यावेळी चोरटा हा गजानन आत्राम असल्याचे पोलिसांना लक्षात आले.

 

वास्तविकता गुरूवारी सकाळी त्याने विष घेतल्यामुळे पोलिसांनीच त्याला रुग्णालयात दाखल केले होते. मात्र रुग्णालयातून पळ काढून त्याने मध्यरात्री हात दाखवला. त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. दरम्यान. चार ते पाच दिवसांपूर्वीच याच परिसरातील रामलक्ष्मण संकुलातील तीन दुकाने एकाच रात्री चोरट्यांनी फोडली होती. ते चोरटेसुद्धा अद्याप पोलिसांना सापडले नाहीत. 

 

हरेमाधव दरबारातील हीच दानपेटी फोडली आहे. 
आत्रामविरुद्ध २० ते २२ गुन्हे दाखल 
गजानन आत्रामविरुद्ध गाडगेनगर पोलिस ठाण्यात मागील दीड ते दोन वर्षात तब्बल २० ते २२ घरफोडी, चोरीचे गुन्हे दाखल आहेत. ही चोरीसुद्धा त्यानेच केल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून आले आहे. त्याचा शोध सुरू केला असल्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...