आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहादा येथे गतिमंद मुलीवर अत्याचार, घटनेनंतर लोकांमध्ये आक्रोश; पोलिस ठाण्याला घातला होता घेराव

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहादा - शहरातील मध्यवर्ती भागात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन गतिमंद युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी तीन संशयितांना पोलिसांनी अटक केली. पीडित युवती हरवल्याची माहिती मिळाल्यानंतर अवघ्या पाच तासांत पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास करीत आरोपींना जेरबंद केले. 

 

शहरातील मध्यवर्ती भागात राहणाऱी १६ वर्षीय गतिमंद मुलगी बुधवार दि. ९ जानेवारीला दुपारी घरातून बाहेर पडली. सायंकाळी उशिरापर्यंत ती घरी पोहोचली नाही. तिचा कुटुंबीयांसह नातेवाइकांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र, ती आढळली नाही . रात्री १२ वाजेच्या सुमारास पोलिस निरीक्षक संजय शुक्ला रात्रीच्या गस्तीवर असताना त्यांना मुलगी हरवल्याची माहिती मिळाली. काहींची त्यांनी विचारपूस केली. शहरातील विविध भागात गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकाला तत्काळ सूचना दिल्या. नातेवाइकांना सोबत घेऊन संपूर्ण परिसर पिंजून काढला. 


याच दरम्यान, पहाटे चार वाजेच्या सुमारास ही युवती शहादा -दोंडाईचा रस्त्यावर असलेल्या भेंडवा नाल्याच्या पुलाखाली भयभीत अवस्थेत आढळली. नातेवाइकांनी तिची ओळख पटवल्यानंतर तिची तपासणी केली असता, तिच्यावर अत्याचार झाल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी तिला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात पाठविले. तिची शारीरिक तपासणी केली. त्यानंतर तातडीने पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवली. स्थानिक माहितीगारांच्या मदतीने तसेच काही नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी तपासाला वेग देत भेंडवा नाला परिसरातच शोध घेतला. तेव्हा गतिमंद युवतीवर अत्याचार करणारे तिघेही संशयित पोलिसांना रंगेहाथ सापडले. 


पीडित युवतीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार शहादा पोलिसात सूरज वसावे, शरद भिवा अहिरे, कैलास शालिक सूर्यवंशी सर्व ( रा.भेंडवा नाला परिसर) शहादा यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. तिघांना पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास महिला उपनिरीक्षक प्रियदर्शनी थोरात करीत आहेत. 


शहाद्याकडे केले रवाना..... 
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार ही मुलगी बुधवारी सायंकाळी सारंगखेडा येथे काही नागरिकांना दिसली. आठ वाजेच्या सुमारास तिला दोन नागरिकांनी अक्कलकुवा डेपोच्या बसमध्ये बसवून शहाद्याकडे रवाना केले. नऊच्या सुमारास ती शहादा बसस्थानकावर उतरली. तेथून पायी घराकडे न जाता ती दोंडाईचा रस्त्याने पायी जाऊ लागली. १० वाजेच्या आसपास ती दोंडाईचा रस्त्यावरील स्वस्तिक पेट्रोल पंप परिसरात एकटीच फिरत असल्याचे पाहून तिन्ही संशयितांनी तिच्या मागोमाग जात तिच्याशी गप्पा मारल्या. तेथूनच पुढे असलेल्या भेंडवा नाल्यावरील पुलाखाली तिच्यावर अत्याचार केला. 


तपासाची फिरली चक्र.... 
अवघ्या पाच तासांत तपासाची चक्रे फिरवून संशयितांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पोलिस ठाण्यात गर्दी झाली होती. अखेर पोलिसांनी तिघांना अटक केल्याची माहिती दिल्यानंतर जमाव माघारी फिरला. अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधीक्षक, पुंडलिक सपकाळे यांनीही पोलिस ठाण्याला भेट देऊन घटनेची माहिती घेतली. 

बातम्या आणखी आहेत...