आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीएसकडून जळगावमध्ये आणखी एक तरुण ताब्यात; सलग दुसऱ्या दिवशी पोलिसांची कारवाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- तालुक्यातील साकळी गावात सलग दुसऱ्या दिवशी दहशतवाद प्रतिबंधक पथकाने (एटीएस) कारवाई करून आणखी एका तरुणास ताब्यात घेतले. विजय उर्फ भैया उखर्डू लोधी   असे त्या तरुणाचे नाव असून गुरुवारी ताब्यात घेतलेल्या वासुदेव भगवान सूर्यवंशी या तरुणाचा विजय हा मित्र अाहे. शुक्रवारी सायंकाळी एटीएसच्या कारवाईसाठी आलेल्या पोलिस पथकाने    कुटुंबीयांना बाहेर काढून विजय लोधी यांची त्याच्या घरातच सुमारे तासभर चौकशी केली. त्यानंतर त्याला पोलिस वाहनात घेऊन गेले.  

 

दरम्यान,सलग दोन दिवस एटीएस पथकाच्या कारवाईमुळे गावात तणावपूर्ण शांतता असून लोधी यास कोणत्या संशयावरून ताब्यात घेतले अथवा कुठे नेले आहे? याविषयी एटीएस पथकाने कुुटुंबीयांनाही माहिती दिलेली नाही. त्यामुळे सूर्यवंशी कुटुंबीयांप्रमाणेच लोधी कुटुंबीयही संभ्रमात आहेत.  


एटीएस पथकाने गुरुवारी दुपारी साकळी (ता. यावल जि. जळगाव) येथून वासुदेव भगवान सूर्यवंशी यास ताब्यात घेतले होते.  दिवसभर यासंदर्भात चर्चा सुरू असतानाच शुक्रवारी सायंकाळी एटीएसची दोन वाहने गावात धडकली.  विजय उर्फ भैया उखर्डू लोधी (३४) यास गावाबाहेरूनच पथकाने ताब्यात घेत वाहनात बसवून आणले होते.  या वाहनातील अधिकारी थेट लोधीवाड्यात गेले. तिथे लोधी यांच्या घरात जाऊन त्याची तासभर चौकशी केली. तसेच लोधी यांच्या घराची झडती घेतली. ५ वाजता हे पथक  घराबाहेर पडले जाताना लोधी यास ताब्यात घेऊन साकळीतून रवाना झाले. सलग दुसऱ्या दिवशी अचानक झालेल्या  या कारवाईमुळे गावात प्रचंड खळबळ उडाली अाहे. पथकातील काही अधिकारी गावात तळ ठोकून अाहेत. तर  पथकांच्या सदस्यांकडून गावात आणखी माहिती घेणे व तपासणी सुरू आहे.  


मुलाची विचारपूस करायची अाहे...

तुमच्या मुलाची खासगीत विचारपूस करायची आहे, असेे सांगून एटीएस पथकातील अधिकाऱ्यांनी लोधी कुटुंबीयांना घराबाहेर काढले व आतून घर बंद करून घेत विजय लोधीची एक तास चौकशी केली.   


कुठे नेताय, गुन्हा काय? : आई-पत्नीने केला सवाल  
एटीएसच्या पथकाने दोन दिवसात गावातील दोन तरुणांना ताब्यात घेतले. मात्र,  विजयला कोणत्या गुन्ह्याच्या संशयावरून ताब्यात घेतले, त्यांना  कुठे नेणार?   याबाबत कुणीच काही संागत नाही. त्यामुळे  कुटुंबीयांनी त्यांचा शोध घ्यायचा तरी कुठे, असा प्रश्न लोधी यांच्या आई व पत्नीने प्रसारमाध्यमांसमोर उपस्थित केला.

 

बातम्या आणखी आहेत...