आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन वर्षांत 114 तरुणांना देशविघातक कार्यापासून रोखले, निर्दोषांना त्रास नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रश्न :  मुस्लिम युवक इसिस या संघटनेच्या संपर्कात का जातात, कारणे काय ? 
उत्तर :
 इसिससारख्या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात युवक का जातात याची अनेक कारणे समोर येत आहेत. धर्माविषयी व त्याच्या शिकवणीविषयी माहिती जाणून घेण्याच्या उद्देशाने विविध संकेतस्थळांवर जातात. त्याचाच फायदा या समाज विघातक यंत्रणा घेतात.  त्यांच्या या उत्सुकतेचा फायदा घेत हळूहळू त्यांच्याशी इंटरनेटद्वारे संपर्क वाढवला जातो आणि त्यांना माथे भडकवणारे व्हिडिओ त्यांना पाठवले जातात. जगात मुस्लिम समाजावर कशा प्रकारे अत्याचार होतो असल्याचे त्यांना जाणीवपूर्वक सांगितले जाते. त्यानंतर त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना देशविघातक काम करण्यासाठी भाग पाडले जाते, असे तपासात समोर आले आहे.   


केवळ भाजपच्याच काळात कारवायांमध्ये वाढ झाली असे नाही तर यापूर्वीही तपास यंत्रणा सक्रियच
प्रश्न  : एटीएसने केलेल्या काही कारवायांमध्ये साशंकता असल्याचे बोलले जाते. नुकत्याच मुंब्रा, औरंगाबाद येथे झालेल्या कारवाईबाबतही काही संघटनांनी आक्षेप घेतला आहे ? 
उत्तर : तो त्यांचा लोकशाहीचा अधिकार आहे. मात्र, करण्यात आलेली कारवाई सक्षम पुराव्यांच्या आधारावर करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास अजून सुरू असल्यामुळे याबाबत अधिक बोलता येणार नाही. मात्र, निर्दोष लोकांना कधीही त्रास दिला जाणार नाही. हे मात्र नक्की आहे. 
प्रश्न - भाजपचे सरकार आल्यानंतर कारवायांमध्ये वाढ झाली का? 
उत्तर : असे काही नाही, तपास यंत्रणा आपले काम करत राहते.  त्यामुळे सरकारच्या कुठल्याही कारवाईत  हस्तक्षेप नाही. यापूर्वीदेखील कारवाया होतच होत्या. उलट आता आम्ही या वाटेकडे जाणाऱ्या कुठल्याही धर्माच्या तरुणांचे समुपदेशन करतो.  मानसशास्त्रीय पद्धतीने त्याचे समुपदेशनदेखील केले जाते. तसा स्वतंत्र जीआरदेखील पास झाला आहे. 
प्रश्न : मुस्लिम युवकांना जाणीवपूर्वक या जाळ्यात फसवले जाते का? 
उत्तर : असे काही नाही. ट्रॅपिंगसारखा प्रकार कधीही महाराष्ट्र एटीएसने केला नाही. आणि कधी करणारही नाही. उलट या मार्गाला जाणाऱ्या ११४ तरुणांचे समुपदेशन आतापर्यंत केले गेले आहे. या मार्गावर जाणाऱ्या हिंदू तरुणांनाही अटक करण्यात आली आहे. त्यातूनच दाभोलकर खून प्रकरणदेखील उघडकीस आले. जे लोक सर्व पायऱ्या ओलांडून पुढे जातील त्यांना अटक केल्याशिवाय काहीही पर्याय नाही. 
प्रश्न : एटीएसच्या कारवायांचा संघटना आणि पक्ष फायदा उचलण्याचा प्रयत्न करतात? 
उत्तर : तो आमचा प्रश्न नाही. तपास करून कारवाई करणे हा आमचा कर्तव्याचा भाग आहे. तो करावाच लागेल. त्यामुळे राजकीय मंडळी याबाबत काय बोलतात किंवा त्याचा फायदा घेतात का? याबाबत मी बोलू शकत नाही. 
प्रश्न : डोंबिवली येथे शस्त्र सापडूनदेखील भाजपच्या एका पदाधिकाऱ्याला सोडून देण्यात आले. 
उत्तर :  ही कारवाई एटीएसची नव्हती. त्यामुळे त्याच्याबद्दल मला अधिक बोलता येणार नाही. मात्र, समाजविघातक कुठलीही गोष्ट करणाऱ्या कुठल्याही समाजाच्या आणि धर्माच्या  लोकांना वेगळी वागणूक दिली जात नाही हे निश्चित आहे. 


प्रश्न : अटक करण्यात आलेल्या तरुणांच्या विरोधात जाणीवपूर्वक पुरावे तयार केले जातात? 
उत्तर :
असे  काही होत नाही. पॅडलिंगचा प्रकार कधीही होत नाही. छोटे पुरावेदेखील गांभीर्याने घेतले जातात. तपासात कुठलाही मुद्दा सोडला जात नाही. त्यामुळे दोषारोपपत्र अधिक सक्षम बनते. त्यावरूनच आतापर्यंत दोषनिश्चिती होऊन शिक्षा लागलेली आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक पुरावा तयार करण्याचा प्रश्नच येत नाही. 


अटक करण्यात आलेल्या दहा तरुणांची पार्श्वभूमी 
मोहसीन सिराजोद्दीन खान

३२, राहत कॉलनी, मुंब्रा 
पादत्राणे विक्रीचा व्यवसाय. मुंब्रा व मुंबईतून आणलेला माल विकायचा. काही दिवस रस्त्यावर स्टॉल लावले.   औरंगाबादच्या मुलीशी लग्न केले आहे. ६ महिन्यांचा मुलगा आहे. 


सलमान सिराजोद्दीन खान 
२८, मुंब्रा 
गेल्या अनेक वर्षांपासून तो फुटबॉल खेळतो आणि मुंबई परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना त्याचे प्रशिक्षणही देतो. हा मोहसीनचा सख्खा भाऊ आहे. 


तकी सिराजोद्दीन खान 
२०, मुंब्रा 
मोहसीनचा धाकटा भाऊ तकी फुटबॉलपटू आहे. नुकताच दहावी पास झाला. औरंगाबादला पुढच्या शिक्षणासाठी पाहणी करण्यासाठी आला असताना अटक झाली. 


मोहंमद सर्फराज 
२५, मुंब्रा 
सर्फराज हा खासगी वाहनावर चालक म्हणून काम करतो. विशेष म्हणजे तो मोहसीनच्या सख्ख्या बहिणीचा पती आहे. तोही या प्रकरणी अटकेत आहे.


मो. मुशाहिद उल इस्लाम 
२३, कैसर कॉलनी, औरंगाबाद
मुशाहिदचे औरंगाबादेत डिझायनिंगचे दुकान आहे. तो मोहसीनचा मेहुणा असून त्याने त्याचे सिमकार्ड मोहसीनला वापरण्यास दिले होते. त्याचे २ भाऊ सध्या सौदीत आहेत. 


मजहर अब्दुल रशीद शेख 
२१, अलमास कॉलनी, मुंब्रा 
मजहर हा मेकॅनिकल इंजिनिअर आहे. तो सलमानचा मित्र आहे. घटनेच्या काही दिवसांपूर्वीच तो  मुंब्रा येथे राहण्यासाठी आला होता. 


फहाद इस्तेयाक अन्सारी 
२५, अलमास कॉलनी, मुंब्रा 
फहादने सिव्हिलचा डिप्लोमा केला असून बिल्डर तसेच इमारतीच्या देखरेखीचे काम काम करतो. वडील सौदीत असतात. तो आई, बहीण व आजीसोबत राहतो.    


जमान नवाब खुटेपाड 
३२, अमृतनगर, मुंब्रा 
जमान आणि त्याची पत्नी हे मूळचे उत्तर प्रदेशचे आहेत.  तो फार्मसिस्ट आहे.  तो ठाणे महापालिकेतही नोकरी करत असल्याचे समोर आले आहे.  


तल्हाक हनिफ पोत्रिक 
२४ रा. इम्रॉल टॉवर, ठाणे, 
हा एमबीए करत आहे. तो आजीसोबत मुंबईत राहतो. त्याचा भाऊ ऑस्ट्रेलियात असतो. या दहा जणांत हाच सर्वात टेक्नोसॅव्ही असल्याचे समोर आले आहे. 


१७ वर्षांचा मुलगा 
मुंब्रा येथील एका १७ वर्षीय  मुलालाही अटक झाली आहे. तो तकीचा मित्र असून मागच्या वर्षीच दहावी उत्तीर्ण झाला. दोघेही सोबतच शिकत असल्याचे समजते.  

बातम्या आणखी आहेत...