आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरक्षेच्या उपाययोजना कागदावरच राहिल्याने घाटीत महिला डॉक्टरवर हल्ला; सकाळी प्रतिक्रिया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - डॉक्टरांवर रुग्णाच्या नातेवाइकांनी हल्ला केल्याचे प्रकार नेहमीच होतात. ते टाळण्यासाठी कडक सुरक्षा यंत्रणा उभी करू, असे आश्वासन घाटी प्रशासनाने सहा महिन्यांपू्र्वी दिले होते. पण त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झालीच नाही. त्यामुळे २४ तासांत मारहाणीच्या दोन घटना घडल्या. पहिल्या घटनेत रुग्णांच्या नातेवाइकांनी डॉक्टरांना मारले, तर दुसऱ्या घटनेत डॉक्टरांनी या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून रात्री उशिरापर्यंत तपास सुरू होता. शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक ८ मध्ये सुभाष भीमराव जाधव (४६, रा. मिलिंदनगर) यांना रविवारी (१४ ऑक्टोबर) सायंकाळी ६.३० वाजता दाखल करण्यात आले होते. रात्री ८.३० वाजता त्यांचा मृत्यू झाल्याचे कळताच त्यांच्या नातेवाइकांनी डॉ. कृणाल तांबोळी, डॉ. व्यंकटेश पेंटावाड यांना मारहाण केली. 

 

मारहाण होऊन गेल्यावर पोहोचले सुरक्षा रक्षक 
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार जाधव यांच्या एका नातेवाइकाने डॉ. तांबोळी यांना हात धरून खेचण्याचा प्रयत्न केला. डॉ. पेंटावाड यांनी हस्तक्षेप केला तेव्हा इतरांनी दोघांना मारहाण केली. त्यानंतर काही वेळाने सुरक्षा रक्षक आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जमावापासून डॉक्टरांची सुटका केली. या हल्ल्याच्या वेळी तर सुरक्षा रक्षकच नव्हते. वॉर्ड क्रमांक ५ मध्ये दाखल स्वाइन फ्लूसदृश रुग्ण विनीता दादाराव शेंडगेचा (२९, रा. करमाड) १५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता मृत्यू झाला. त्यामुळे तिचे नातेवाईक संतापून डॉक्टरांना जाब विचारू लागले. तेव्हा निवासी डॉक्टरांनी तिचा पती आणि दीर यांना जोरदार मारहाण केली. वॉर्डमध्ये सीसीटीव्ही असल्याची डॉक्टरांना माहिती असल्याने त्यांनी या दोघांना बाहेर नेऊन त्यांचा पाठलाग करत हल्ला केला. रुग्णांच्या नातेवाइकांनी मारहाण केल्याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात घाटी प्रशासन तसेच निवासी डॉक्टरांनी तक्रार दाखल केल्याचे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले. 

 

असे होते आश्वासन 
- रुग्णासोबत २ नातेवाइकांना वॉर्डात प्रवेश देऊ. सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवू. 
- रुग्णांना दोनच सत्रात भेटीची परवानगी नातेवाइकांना देऊ. 
- भेटीच्या वेळांव्यतिरिक्त प्रवेश देणार नाही. 
- प्रत्येक वॉर्डात सीसीटीव्ही कॅमेरा लावू. 
- बेगमपुऱ्यातून घाटीत येणारा रस्ता बंद करू. 

 

तेव्हा पुकारला होता संप : मार्च महिन्यात आंबेडकरनगरातील रुग्णाचा मृत्यू झाल्यावर नातेवाइकांनी डॉक्टरांना मारहाण केली होती. त्यामुळे निवासी डॉक्टरांनी दोन दिवसांची सामूहिक रजा टाकून संप पुकारला होता. आम्हाला सुरक्षित वातावरण हवे, अशी त्यांची मागणी होती. त्यावर प्रशासनाने दिलेले आश्वासन पाळले नाही, असे २४ तासांतील दोन्ही घटनांवरून स्पष्ट झाले. 

 

सहकार्य नाही 
समस्यांतून सतत मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहोत, पण कोणाकडून सहकार्यच मिळत नाही. काही घटना घडली की, सर्व बाजूंनी दबाव येतो. निवासी डॉक्टरांना सुरक्षित वातावरण मिळाले पाहिजे. डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता 

 

आश्वासनाचा विसर 
दोन घटना घडूनही आम्ही काम थांबवलेले नाही. पण फक्त सुरक्षित वातावरण हवे ही आमची एकमेव मागणी आहे. घाटी प्रशासन आश्वासन पाळतच नाही. ते पाळले तर समस्या संपेल. डॉ. वकील खान, अध्यक्ष, मार्ड 

 

प्रत्यक्षात अशी स्थिती 
- ५-१० नातेवाईक सहज प्रवेश करतात. 
- संख्या वाढली, पण ते रुग्णांच्या नातेवाइकांना थांबवत नाहीत. 
- असे सत्र निश्चित केलेच नाही. 
- कोणत्याही वेळी नातेवाईक शिरतात. 
- सर्व वॉर्डात सीसीटीव्ही नाहीत. 
- राजकीय दबावामुळे रस्ता खुलाच आहे. 

 

डाॅक्टर की गुंड ? 
माझ्या पत्नीचा त्यांनी जीव घेतला. जाब विचारला तर डॉक्टरांनी मला आणि भावाला शिवीगाळ, पाठलाग करत बेदम मारहाण केली. हे डॉक्टर आहेत की उच्च शिक्षण घेतलेले गुंड? दादाराव शेंडगे, मृत महिलेचे पती 

बातम्या आणखी आहेत...