आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशत! धावत्या दुचाकीवरून ओढून मारहाण; मोबाइल, पैसे लुटले 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- दुचाकीने घरी जात असलेल्या तरुणास ओढून रस्त्यावर पाडले. यानंतर लोखंडी रॉडने मारहाण करीत त्याचे पाय फ्रॅक्चर करून भामट्यांनी तरुणाजवळील ४ हजार रुपये रोख व मोबाइल लुटून नेला. शुक्रवारी रात्री ७.४५ वाजता आसोदा-भादली दरम्यानच्या पाटचारीजवळ ही धक्कादायक घटना घडली. जखमी तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने तरुणाचे प्राण वाचले आहे. 

 

रितेश भागवत नारखेडे (वय २२, रा. भादली) असे लूट झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो जळगावातील कृषी औद्योगिक सर्वसेवा सहकारी संस्थेत सेल्समन म्हणून कामाला आहे. शुक्रवारी रात्री तो काम आटोपून दुचाकीने (एमएच- १९, सीई- ४१७७) घराकडे जाण्यासाठी निघाला होता. त्याला रात्री ७.४५ वाजता आसोदा ते भादली दरम्यान असलेल्या पाटचारीजवळ मागून दुचाकीने आलेल्या दोन भामट्यांनी ओढून रस्त्यावर पाडले. यात तो जखमी झाला. विव्हळत असलेल्या रितेशला एका भामट्याने पकडून ठेवत 'तू बाईचे नाव घेतो' असे म्हणत शिवीगाळ केली. यानंतर दुसऱ्या भामट्याने लोखंडी रॉडने रितेशवर हल्ला चढवला. त्याच्या दोन्ही पायांवर रॉड मारल्यामुळे तो जखमी झाला. रस्त्यावर कोणीच नसल्यामुळे आरडाओरड करूनही काही उपयोग झाला नाही. भामट्यांनी रितेशच्या खिशातील मोबाइल व चार हजार रुपये काढून घेत जळगावच्या दिशेने पळ काढला. दरम्यान, या घटनेनंतर रितेश कसातरी घरी पोहोचला. कुटुंबीयांना माहिती दिल्यानंतर त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून भामट्यांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक गणेश चव्हाण तपास करीत आहेत. मारहाणीची ही घटना घडल्यानंतर मारहाण करणाऱ्या युवकांनी पळ काढला आहे. पाेलिसांसमाेर त्यांचा शाेध घेण्याचे माेठे आव्हान उभे ठाकले आहे.

 

भामट्यांचे पोलिसांना खुले आव्हान :

डिसेंबर महिन्यात शहरात सर्वत्र भामटे, चोरट्यांनी हैदोस घातला होता. सोनसाखळी चोरी, घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. यानंतर पोलिसांनी चार चोरट्यांना अटक केली. त्यानंतर काही वेळ घटना थांबल्या होत्या; परंतु शुक्रवारी घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे पुन्हा एकदा पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. भररस्त्यावर लोखंडी रॉडने तरुणास मारहाण करून पैसे, मोबाइल लुटून नेल्यामुळे आसोदा-भादली गावात खळबळ उडाली आहे. या मार्गावर रात्री उशिरापर्यंत नाेकरदार वर्गाची वर्दळ असते. अशात लूटमारीच्या या घटनेमुळे लाेकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी चोख गस्त घालावी, अशी मागणी नागरिकांतून हाेत आहे. 


जीव वाचवण्यासाठी केला बेशुद्ध पडल्याचा बनाव 
मदत मिळवण्यासाठी रितेशने या वेळी सुरुवातीला जाेरजाेरात आरडाओरड केली होती; परंतु कोणीही मदतीला येत नसल्यामुळे भामटे अधिकच मारहाण करीत होते. अखेर रितेशने बेशुद्ध पडल्याचा बनाव केला. यामुळे भामट्यांनी मारहाण करणे बंद करून दुचाकीने घटनास्थळावरून पळ काढला. त्याने बनाव केला नसता तर कदाचित भामट्यांनी आणखी मारहाण केली असती. ऐनवेळी त्याला सुचलेल्या युक्तीमुळे त्याचे प्राण वाचले आहेत. 

 

४४ क्रमांकाची हाेती दुचाकी 
पळून जात असताना भामट्यांच्या दुचाकीचा क्रमांक रितेशने पाहिला होता. अस्पष्ट असा ४४ क्रमांक रितेशला दिसला आहे. काळ्या रंगाची सुझुकी कंपनीची दुचाकी असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी भामट्यांचा परिसरात शोध सुरू केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...