आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुऱ्हाडीने वार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस ७ वर्षे सक्तमजुरी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नगर - खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस जिल्हा न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी सात वर्षे सक्तमजुरी व एक लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. देविदास शंकर काळे (४८, माणिकदौंडी, ता. पाथर्डी) असे आरोपीचे नाव आहे. 


माणिकदौंडी येथील संगीता संपत गायकवाड या आश्रमशाळेत स्वयंपाकीण म्हणून काम करतात. आरोपी देवीदास याची पत्नीदेखील याच शाळेत स्वयंपाकीण म्हणून कामास होती. शाळेत कायम होण्यावरून दोघींच्या कुटुंबात वाद सुरू होते. घटनेपूर्वी संगीता हिचा पती संपत याने देविदास याच्या पत्नीचा शाळा सोडल्याच्या दाखल्याची माहितीच्या अधिकारात मागणी केली होती. त्याचा राग आल्याने आरोपी देवीदास याने संपत याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी संपत याने सप्टेंबर २०१६ मध्ये पाथर्डी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. त्यानंतर संपत व अशोक भाऊसाहेब कांबळे यांच्या गावातील मागासवर्गीय वस्तीत भांडण झाले. आज तुझा शेवटचा दिवस आहे, अशी धमकी अशोक याने संपतला दिली होती. त्यावेळी साक्षीदार विजय अनिल थोरात यांनी त्यांची भांडणे मिटवली होती. त्यानंतर संपत तारखेसाठी पाथर्डी येथील न्यायालयात गेला. दुपारच्या सुटीत संपत न्यायालयाच्या गेटबाहेर येत होता. त्याचवेळी आरोपी देवीदास दुचाकीवरून तेथे आला. हातातील कुऱ्हाडीने त्याने संपतवर वार केले. जखमी अवस्थेत संपतने पाथर्डी पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी त्याला उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल केले. 


संपतची पत्नी संगीता हिने पाथर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सहायक फौजदार भोईटे, सहायक निरीक्षक राक्षे, पोलिस उपाधीक्षक ए. एस. शिवथरे यांनी तपास करून आरोपीच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याचे कामकाज न्यायाधीश नावंदर यांच्यासमोर चालले. सरकारी पक्षातर्फे दहा साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी, जखमी, वैद्यकीय अधिकारी, तपासी अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. साक्षी पुरावा, कागदोपत्री पुरावा व सरकारी पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील अर्जुन पवार यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपी देविदासला सात वर्षे सक्तमुजुरी व एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. अशोक कांबळे याची मात्र निर्दाेष मुक्तता झाली. 

बातम्या आणखी आहेत...