आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यातनांची शेती!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अतुल देऊळगावकर  

शेतकऱ्याच्या निधनानंतर येणाऱ्या संकटांचा सामना करणाऱ्या लढवय्या विधवेचं दर्शन दाखवणारा "मदर इंडिया' १९५७ साली प्रदर्शित झाला. त्या "मदर इंडिया'ची एकसष्टी उलटल्यावर खऱ्या "मदर इंडिया' कशा जगत आहेत याचा धांडोळा म्हणजे पत्रकार दीप्ती राऊत यांचे रोहन प्रकाशनने नुकतेच प्रकाशित केलेले "कोरडी शेतं, ओलेे डोळे' हे पुस्तक. 
 

इ.स. ६४ साली तब्बल सहा दिवस रोम जळत होतं आणि त्या वेळी सम्राट नीरो हा धुंदीत फिडल वाजवण्यात मग्न होता. हे "ऐतिहासिक कर्तृत्व' सर्वश्रुत आहे. नीरोचा ऐषोराम व शाही पाहुणचार यांच्याही अनेक कहाण्या प्रसिद्ध आहेत. पाहुण्यांची "खातीर' करण्याकरता सूर्यास्तानंतर भव्य मेजवानी आयोजित केली जात असे. त्यासोबत गायन- नर्तन या कलांचा आस्वाद दिला जात असे. मधुर संगीत सुरू असतानाच सुंदर ललनांचं नृत्य व पदन्यास पेश होत असे. परंतु त्या काळी वीज नसल्यामुळे अंधार दूर कसा करावा ही समस्या होती. गरज ही शोधाची जननी असते ना? यातून एक अचाट  कल्पना निघाली. शाही महालाला अनेक स्तंभांचा आधार असे. त्या स्तंभांना सुक्या गवताने लपेटायचं. गवताच्या ज्वलनातून उजेड पडत असे. परंतु तो फार काळ टिकत नसे. दीर्घकाळ परिसर प्रकाशमान व्हावा याकरता काय करावं असा पेच निर्माण झाला. आणि मग ही अडचणदेखील दूर करण्यासाठी मार्ग सुचला. त्यानुसार प्रत्येक स्तंभाला गवतासोबत एक गुलाम लपेटला जाऊ लागला. गुलाम जिवंत जळत असताना सभोवताल उजळत असे.

जवळपास दोन हजार वर्षं उलटत आली तरी नीरोची आठवण करून देणारे असंख्य नेते आजही जगभर सापडत असतात. परिसर प्रकाशमान करण्यासाठी जिवंत जळणाऱ्यां गरिबांना स्वस्थचित्ताने पाहणाऱ्या अतिथींच्या मूक संमतीने भीषण क्रौर्य चालू अाहे. आजही हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या निष्क्रियपणे पाहणारा समाज, सरकार व प्रसारमाध्यमं हे त्याच अतिथी परंपरेतील आहेत, विख्यात पत्रकार पी. साईनाथ यांनी असा घणाघाती हल्ला "नीरोज गेस्ट्स' वृत्तपटात केला होता. 

१९४० साली मेहबूब खान यांनी शेतकऱ्याच्या निधनानंतर येणाऱ्या संकटांचा सामना करणाऱ्या लढवय्या विधवेचं दर्शन "औरत' चित्रपटातून दाखवलं. पुढे १९५७ साली त्याचा रिमेक अवतार "मदर इंडिया' प्रदर्शित झाला. त्या "मदर इंडिया'ची एकसष्टी उलटल्यावर खऱ्या "मदर इंडिया' कशा जगत आहेत याचा धांडोळा म्हणजे "कोरडी शेतं, ओलेे डोळे' हे पुस्तक. शेती, त्यात शेतकरी महिला, त्यात विधवा आणि त्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची विधवा अशा चोहोबाजूंनी आलेल्या वंचितावस्थेत दिवस काढणाऱ्या महिला म्हणजे उपेक्षितांतील उपेक्षित विश्व! आपल्या जगातून त्या जगाकडे पाहाण्याची इच्छासुद्धा न होणाऱ्या काळात, अशा अनेक घरांना वारंवार भेटी देण्याची इच्छा पत्रकार दीप्ती राऊत यांना झाली. केवळ करुण कहाण्या सादर न करता त्यांचा विश्लेषणात्मक अभ्यास, त्यांच्या समस्यांवर उपाय व अशा घन तमात लकाकणाऱ्या काही रेषांचं आशादायी चित्रदेखील त्यांनी रेखाटलं आहे.

१९९५ पासून आजपर्यंत महाराष्ट्रातील सुमारे ७५,००० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत आणि त्याची "शिक्षा' म्हणून त्यांच्या विधवांना जणू घरगुती जन्मठेप व सक्तमजुरी भोगावी लागत आहे, असं दृश्य हजारो घरांतून दिसत आहे. दीप्ती राऊत यांनी अशा अनेक होरपळलेल्या घरांची अवस्था जवळून पाहिली. या महिलांचं अंतरंग जाणून घेतलं आणि त्यातून हा प्रस्तुत दस्तऐवज वाचकांच्या हाती दिला आहे. पतीच्या आत्महत्येनंतर या विधवांसाठी पहिले दहा दिवस सांत्वनाचे आणि नंतर पूर्णपणे उपेक्षेचे जातात. छायाचित्र व प्रदर्शनासाठी येणारे आमदार त्यांच्याच संस्थेच्या महाविद्यालयात अर्ज करणाऱ्या तरुण शेतकरी विधवेच्या डी.एड.साठी रदबदलीच्या अर्जासाठी सहानुभूतीपूर्वक विचार सोडा, त्यासाठी झालेली पैशाची मागणी, शेतकरी आत्महत्येनंतर शवविच्छेदनाच्या अहवालासाठी मोजावे लागलेले ३००० रुपये, पतीच्या आत्महत्येसाठी सासरच्यांनी तिच्यावर ठेवलेला ठपका, संसाराचा गाडा ओढण्यासाठी घराबाहेर पडल्यावर झेेलाव्या लागणाऱ्या नजरा आणि खावे लागणारे टोमणे, विधवा म्हणून वाट्याला येणारा सामाजिक बहिष्कार, एकटी म्हणून होणारी सार्वजनिक चर्चा, जमिनीच्या हक्कावरून सुरू असलेला भाऊबंदांचा जाच, तिच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन प्रसंगी तिची फाइल मंजूर करण्यासाठी शासकीय स्तरावरून होणारी अश्लाघ्य मागणी हा सारा संतापजनक प्रवास यात रेखाटण्यात आला आहे. सोबतच कोलमडलेला संसार आणि करपलेली शेती सावरण्यासाठी, मुलांचे शिक्षण आणि सासरच्यांचे आरोग्य सांभाळत दिवस रेटणाऱ्या या महिलांचा भावनिक कोंडमारा यात भेदकपणे टिपण्यात आला आहे. लेखिकेच्या शब्दात सांगायचं म्हणजे, "एवढ्या बिकट परिस्थितीतही केवळ हिंमत, जिद्द आणि चिकाटी यांच्या जोरावर त्यांनी त्या संकटांनाच शिंगावर घेतलं आहे. फाशीचा दोर किंवा कीटकनाशकाची बाटली तोंडाला लावण्याऐवजी मुलाबाळांच्या भवितव्याचा विचार करून त्या जगत आहेत.'

पुरोगामी लोकशाही आघाडीचं सरकार आल्यावर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी १८ नोव्हेंबर २००४ रोजी शेतीतज्ज्ञ डॉ एम. एस. स्वामीनाथन यांची कृषी आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक केली. या समितीने विलक्षण परिश्रम घेऊन राष्ट्रीय शेतकरी आयोगाचा ६०० पानी अहवाल ४ ऑक्टोबर २००६ रोजी केंद्र सरकारकडे सुपूर्त केला. त्यामध्ये शेतीमालाच्या भावाव्यतिरिक्त अनेक सूचना केल्या आहेत. त्यात सातबारावर महिलांचं नाव असणं, त्यांनादेखील कर्जापासून सिंचनापर्यंत साऱ्या सवलती मिळाव्यात आणि आत्महत्याग्रस्त महिलांना विशेष निधी दिला जावा या शिफारशी आहेत. भारतीय शेतीचा निम्मा भार महिला उचलत असतात. याची दखल घेऊन २०११ साली प्रो. स्वामीनाथन यांनी महिला शेतकऱ्यांसाठी राज्यसभेत विशेष विधेयक मांडलं होतं. महिला शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांची  मागणी करणाऱ्या या विधेयकाला कोणीही वाली मिळाला नाही, यावरून आपल्या लोकप्रतिनिधींची संवेदनशीलता लक्षात येते. ती मागणी मान्य झाली असती तर हजारो शेतकरी विधवांच्या खस्ता नक्कीच कमी झाल्या असत्या.

शेती व संस्कृती दोन्हींचा उदय व चरमावस्था ही स्त्रीमुळे आली. आता शेती व संस्कृती या दोन्हीही नकोशा झाल्या आहेत. निसर्गावर बलात्कार करून संपत्तीची निर्मिती करण्याचा काळ, काम व वेग वाढतच आहे. दुसरीकडे जगाची वाटचाल स्वयंचलित, काटेकोर, मानवरहित व यंत्रमानवाच्या शेतीकडे होत असताना शेतकरी ही प्रजात नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. अशा बिकट काळात शेती व कुटुंबाचा भार खांद्यावर क्रूसारखा घेऊन हजारो महिला वाट काढत आहेत. कुठे माहेरचे, क्वचित सासरचे मदत करणारे निघतात. कुठे काही स्वयंसेवी संस्था साहाय्य करतात. अकोला जिल्ह्यातील कट्यार गावच्या ज्योतीताई पतीच्या आत्महत्यानंतर चौदाव्याला शेतात पहिलं पाऊल टाकतात. ७ वर्षात सासरा, नवरा आणि दीर अशा तीन आत्महत्यांंनंतर ही रणरागिणी तडफेने शेतात उतरते. नवऱ्याने गहाण टाकलेली बैलजोडी सोडवतात. बोअरवेल घेतात. विजेसाठी उपोषण करतात. जमीन हडपण्याचे इरादे करणाऱ्या नातेवाइकांपासून पोलिस पाटलांपर्यंत सर्व आघाड्यांवर थेटपणे लढतात आणि सर्वसामान्य मजूर ते तहसीलदार अशा अनेकांची साथ घेऊन प्रगतिशील शेतकरी बनतात. अशाही झुंजार महिला आपल्या आसपास आहेत. त्यांचा हा संघर्ष आणि त्यांची जिद्द फक्त महिलाच नाही तर पुरुष शेतकऱ्यांसाठीही ऊर्जा देणारा आहे. म्हणूनच हे पुस्तक लेखिकेने "डोळ्याचा पदर कंबरेला खोचून जगण्याची लढाई जिंकणाऱ्या साऱ्याजणींना' सार्थपणे अर्पण केलं आहे.

खरा प्रश्न आपण काय करणार हा आणि हाच आहे. आत्महत्या केलेल्या आणि त्या टोकावर असलेेल्या शेतकरी कुटुंबांचा शोध घेणं अवघड नाही. अशा कुटुंबांना थोडा तरी आधार आपल्यापैकी प्रत्येक जण देऊ शकतो.
कुणी मारावे, कुणी मरावे | कुणी जगावे खाऊनी दगड ।
कुणी रडावे, रडवावे कुणी | कुणी हसावे पिऊन वायू ।
कुणी दाबुनी जखम आजची, जरा उद्याचा काढावा पू ।।
मर्ढेकरांच्या या पंक्ती प्रत्यक्षात कंठणाऱ्या शेतकरी कुटुंबांकरता ती आशा असेल आणि लेखिकेने याचसाठी अट्टहास करत आपल्यापुढे "ते जग' आणून ठेवलं आहे. प्रस्तुत पुस्तक घराघरापर्यंत गेलं पाहिजे. यातील मजकूर वाचून समाजाच्या सर्व स्तरांंपर्यंत भिडला पाहिजे. बारा कोटींच्या महाराष्ट्राला काही हजार शेतकरी घरं अजिबात जड नाहीत, हे दाखवून समाजसुधारणेचं नवं पर्व सुरू झालं तरच आपली परंपरा व अस्मिता, अभिमान व संस्कृती, गर्जना व गर्व वगैरे सार्थ ठरण्याची शक्यता आहे.
 

(दीप्ती राऊत यांच्या "कोरडी शेतं.. ओले डोळे' या पुस्तकाच्या अतुल देऊळगावकर यांच्या प्रस्तावनेचे संक्षिप्त रूप)