आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूवर मात करणाऱ्या जीवनाच्या सावल्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोरंबाळं, सासूसासरे, आणि थोडी जमीन मागे टाकून जोडीदार अकाली निघून जातो तेव्हा काही काळ या बायाही खचतात. पण ते तात्पुरतंच. मुलांचं भविष्य काळवंडू नये, म्हणून उभं राहायला हवं या जाणिवेने त्या शब्दश: पदर खोचून कामाला लागतात. अपार कष्ट समोर दिसत असतात, पण ते झेलायला त्या तयार असतात. ज्या उमेदीने त्या कंबर कसतात, ती निव्वळ अचंबित करणारी असते. ही उमेद जागवणारी कहाणी नुकतीच नाट्यरूपात सादर होऊ लागली आहे, त्या विषयी...

 

आमच्या गावखेड्यात मोहरमच्या दिवसांत डोले मिरवले जात. त्यामध्ये ज्या महिलांची मुले जगत नसत त्यांना डोल्याखाली झोळीत निजवीत. ती सावली मृत्यूवर मात करणाऱ्या जीवनाची असे. प्रामुख्याने विदर्भासह महाराष्ट्रात होत असलेल्या शेतकरी आत्महत्या पाहिल्या की, मृत्यूवर मात करणारी जीवनाची ही सावली कुठे गेली, असा प्रश्न मनात आल्यावाचून राहत नाही. कोणे एके काळी शेतीत रमलेला, मातीमायच्या कुशीतून हिरवे स्वप्न पिकवणारा, शेतातल्या झाडासोबत मुले वाढवणारा शेतकरी एकाएकी आत्महत्या करायला लागला. हे सारेच खूप अस्वस्थ करणारे होते.

 

या नभाने या भुईला दान द्यावे
आणि या मातीतुनि चैतन्य गावे
कोणती पुण्ये अशी येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लखडून जावे

 

असं नभाने दिलेलं दान भुईला देऊन मातीतून चैतन्याचं पीक घेणारा शेतकरी गडी आत्महत्या कधी करायला लागला आणि जोंधळ्याला चांदण्या लखडण्याऐवजी आत्महत्येची कीड कधी लागली हे कधी समजलेच नाही. आजही समजलेले नाही. कारण स्वत:च सरण रचून त्याचे आत्महत्या करणे थांबलेले नाही. पक्ष्यांची अंडी डोक्यावर पडून फुटताच अभिषेक झाल्याच्या आनंद साजरा करणारे राजकारणी आहेत तर सरकारी यंत्रणा मृत पक्ष्यांच्या पिसांवरून आकडेवारी जाहीर करण्यातच धन्यता मानते. अशा वेळी आधाराची गरज असलेला शेतकरी आतून कोसळतो. त्यातून टोकाचा पर्याय निवडला जातो. पण मरणाने फक्त जाणाऱ्याची सुटका होते. त्याच्या मागे त्याने घेतलेलं कर्ज, बायको, लेकरं, मायबाप आणि सोबत आलेला दु:खाचा काळाेख सारे काही तसेच असते. अशा वातावरणातही आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची बायको शेतीसह आपले कच्चेबच्चे आणि सासू-सासऱ्यांचाही सांभाळ करते. आपल्या संपूर्ण जीवनाचा ताबा घेतलेल्या रूढींचा आणि त्यांच्याद्वारे शतकानुशतकं ठसलेल्या विचारांना तडे देत ठामपणे उभी राहाते. 

 

विदर्भातील अशा एकल शेतकरी विधवा एकत्र येऊन आपल्या वेदना व दु:खाला थेट भिडल्या. त्यांनी मुक्या वेदना व पोरक्या दु:खालाही सोबत घेतले. परिणामी त्यातून जगण्याची तिरीप आत आली. नव्याने लढण्याची जिद्द जागी झाली.नवऱ्याच्या राखेतून या सगळ्या जणी फिनिक्ससारख्या उभ्या राहिल्या. त्यांच्या पंखात आता बळ येते आहे. घरांनी बंद केलेली दारे आता किलकिली होण्याची आशा आहे. वैराण आणि एकाकी आयुष्याच्या वाटेवर लढण्याची जिद्द प्रवाहित झाली आहे.‘तेरवं’ या अध्ययन भारती निर्मित, हरीश इथापे दिग्दर्शित आणि श्याम पेठकर लिखित नाटकात या मुक्या वेदनांना बोलतं करण्यात आलं आहे.

 

पुढील स्लाइडवर वाचा- नाटकाविषयी

 

बातम्या आणखी आहेत...