आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिकहो, तुमच्यासाठी!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाटक, चित्रपटांतून अनेकदा सामाजिक संदेश दिलेच जातात. काही कलाकार त्याचं अनुकरण प्रत्यक्षात अाणतात, तर काही कलाकार त्याच्याकडे काम म्हणून बघतात अाणि साेडून देतात. पण, काही कलाकार अापले कलावंताचे मुखवटे बाजूला ठेवून सामान्य माणसाचा रंग लावून उभे राहतात तेव्हा त्यांच्यातील माणूसपण दिसून येतं. मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ दिलेल्या भूमीत जाे प्रलय अाला त्या भूमीतील बांधवांना, रसिकांना, प्रेक्षकांसाठी मदतीचा खारीचा वाटा उचलावा हा मराठी कलाकारांचा प्रयत्न सलाम करायला लावणाराच अाहे.  कोणाच्याच ‘ध्यानीमनी’ नव्हतं की अनेकांना ‘राहिले दूर घर माझे’ म्हणण्याची वेळ येईल. ‘सुखाशी भांडताे अाम्ही’ असं म्हणत असतानाच ‘घर दाेघांचं’ ‘कळत न कळत’ कधी वाहून गेलं ते कळलंही नाही. मग सुरू झाला खेळ ‘पळा पळा काेण पुढे पळे ताे’चा. ‘अाेझ्याविना प्रवासी’ मिळेल त्या दिशेला ‘बंद दरवाजे’ बघत ‘काेंडी’ हाेऊन ‘पांथस्थ’ झाले. ‘महापूर’ ‘झुंज’ देऊ लागला हाेता. ‘साैजन्याची एेशी-तैशी’ म्हणत त्याने ‘उद्याचे जग’ ‘देखवेना डाेळा’ केले हाेते. ‘अाधे-अधुरे’ स्वप्न उराशी कवटाळून जाे ताे एक झुंज पाण्याशी (वाऱ्याशी) करत हाेता. काेणी तरी किमयागार यावा, दीपस्तंभ व्हावा याची त्यांना अास हाेती. अासू अाणि हसू असलेल्या अशा हजाराेंना अाेळख ना पाळख असताना मग अनेकांनी "या घर अापलेच अाहे'  असंही म्हटलं. त्यातच हाेते "बे दुणे पाच' म्हणणारे रंगमंचवारील अनेक हात. एरवी सुख-दु:खाचे ‘मुखवटे’ रंगवणाऱ्यांनी मग ‘हिमालयाची सावली’ धरण्याचा प्रयत्न केला. प्रेक्षकांशी असलेली ‘नातीगाेती’ जपत मदतीचा क्षण एक पुरेचे अावाहन केले अन‌् अनेक ‘अश्रूंची झाली फुले’... रसिकांच्या जिवावर कलाकार माेठा हाेत असताे. रसिकाश्रय  नसेल तर ताे जगणारच कसा? एकवेळ मनाेरंजन नसेल तर चालेल, पण रसिकच नसतील तर कलाकारांचं जगणं असह्य हाेईल यात शंका नाही. मराठी मनांमध्ये कलाकारांसाठी एक विशेष जागा अाहेच. त्यामुळेच रसिकांना मायबाप म्हटलं जातं. म्हणूनच मग जेव्हा हा मायबाप प्रेक्षकच संकटात येताे तेव्हा कलाकाराला चार पावलं पुढे यावंच लागतं. कलावंत हा संवेदनशील असताे, किंबहुना ताे सामान्यांपेक्षा अधिक संवेदनशील असताे म्हणूनच ताे कलाकार असताे. त्याच्या याच संवेदना नुकत्याच सांगली, काेल्हापूर येथे अालेल्या महापुराच्या निमित्ताने दिसून अाल्या. गावंच्या गावं उद्ध्वस्त झाली. संसार उघडे पडले, अनेकांचं जगणं बाेडकं झालं. अंगावर कपडा नाही, खायला धान नाही, राेगराई म्हणते मी. पै-पै करून जमवलेला जगण्याचा पसारा क्षणार्धात पाण्याने अापल्या कवेत घेतला अाणि त्याची यात्रा सुरूच ठेवली. डाेळ्यातलं पाणी सुकलं, पण पुराचं पाणी काही सुकेना अन‌् दु:खावेग अाेसरेना. सुल्तानी राजा अस्मानी संकट ही नित्याची अाराेळी या वेळीही अाक्राेशाने दिसून अाली. पण, यात न पडता ज्यांची अापल्या जगण्यात अनन्यसाधारण जागा अाहे, किंबहुना मराठी चित्रपटाचा सुवर्णकाळ दिलेल्या भूमीत जाे प्रलय अाला त्या भूमीतील बांधवांना, रसिकांना, प्रेक्षकांसाठी मदतीचा खारीचा वाटा उचलावा हा मराठी कलाकारांचा प्रयत्न सलाम करायला लावणाराच अाहे. अन्नधान्य, कपड्यांपासून ते अंडर गारमेंट‌्स अाणि सॅनिटरी नॅपकीनपर्यंत कलाकारांनी साहित्य जमा केलं. साेशल मीडियाच्या माध्यमातून अावाहन केलं. एरवी अापल्या मित्राने वा एखाद्या सामान्य माणसाने मदतीचं अावाहन केलं तर अनेक जण दुर्लक्ष करतात, पण कलाकाराने त्यासाठी पुढाकार घेतला तर नक्कीच त्याला प्रतिसाद मिळताे. या वेळीही तेच झालं. कलाकारांच्या अावाहनाला मग सुबाेध भावे असेल, रवी जाधव, कुशल बद्रिके, प्रवीण तरडे यांच्यासह नाट्य परिषदेच्या शाखा असाे वा चित्रपट महामंडळाच्या शाखा अाणि त्यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी असाे, त्यांनी भरभक्कम मदत जमा केली. त्यासाठी चार-पाच दिवस रात्रीचा दिवस केला. साहित्याची विभागणी स्वत: केली. खराब कपडे, खराब वस्तू तशा फारशा नव्हत्याच. पण, ज्या हाेत्या त्या वेगळ्या काढल्या अाणि पूरग्रस्तांपर्यंत चांगल्या, उपयाेगाच्याच वस्तू कशा पाेहाेचतील याचा अहाेरात्र प्रयत्न केला. अनेकांनी स्वखर्चाने वस्तू उपलब्ध करून दिल्या. सामान्यांनी त्यांच्याकडील कपडे, धान्य वा अापल्या एेपतीनुसार गृहोपयाेगी वस्तू दिल्यानंतर कलाकारांनी पुढे अंदाज घेत पूर अाेसरल्यानंतरची परिस्थिती जाणून घेत अाैषधे, शुद्ध पाणी मिळावे म्हणून पाण्याच्या बाटल्या, अंडर गारमेंट‌्स, सॅनिटरी नॅपकीन, गुरांसाठी चारा अाणि महत्त्वाच्या जीवनावश्यक वस्तू स्वखर्चाने खरेदी केल्या. त्या केवळ जमाच केल्या असे नाही, तर सातारा, सांगली, काेल्हापूर, कराड, काेकण या भागातील कलाकार अाणि नाट्य परिषद, चित्रपट महामंडळाच्या शाखांच्या माध्यमातून शिवाय शासकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने शेवटच्या गरजू व्यक्तीपर्यंत पाेहाेचवण्याचे कलाकारांनी केलेले काम नक्कीच संवेदनशीलता दाखवून देणारे अाहे.  ‘यदाकदाचित रिटर्न’ची मदत नाटकातून काही तरी संदेश असताे, ताे केवळ रसिकांसाठीच नाही, तर अापल्यासाठीही अाहे याचीच जाणीव संताेष पवारने लिहिलेल्या, दत्ता घाेसाळकरांची निर्मिती असलेल्या “यदाकदाचित रिटर्न’च्या कलाकारांनी अाणि निर्मात्यांनी ठेवली किंबहुना दाखवूनच दिली. या नाटकात एका प्रसंगात शेतकरी अात्महत्या या गंभीर समस्येवर भाष्य करण्यात अालं अाहे. हे भाष्य केवळ नाटकातील प्रसंगच राहू नये वा रसिकांपर्यंत समस्येचं गांभीर्य पाेहाेचावं एवढ्यावरच मर्यादित न ठेवता ते या लाेकांनी प्रत्यक्षात उतरवलं.  या नाटकाच्या नाशिक येथील प्रयोगाच्या निमित्ताने अात्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील मुलांसाठी असलेल्या अंजनेरी येथील आधारतीर्थ आश्रमातील विद्यार्थ्यांना दोन महिने पुरेल एवढे अन्नधान्य देण्यात आले. या वेळी अाश्रमातील रोहित विष्णू इंगळे हा विद्यार्थी म्हणाला की, मी अकाेला जिल्ह्यातील बार्शी टाकळी गावातील अाहे. माझ्या वडिलांनी शेतीच्या कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली. मला गावच्या सरपंचांनी आधारतीर्थ आश्रमात सोडले. मी तुमच्यासारख्यातच देव बघताे. त्याचे हे बाेल खूप काही सांगून जातात अाणि डाेळ्यांच्या कडा अाेलावतात. माणसाला माणूसच दूर नेत अाहे. त्याच्याच भाषेच्या, धर्माच्या, प्रांताच्या अाणि जातीपातीच्या भिंती उभ्या केल्या जात अाहेत. पण, अशा वेळी प्रेमाच्या अाणि अापल्यासाठी अापणच काम करण्याचे जे दार उघडण्याचा प्रयत्न झाला अाणि त्यात सगळ्यांनाच सामील करून घेण्याची हाताेटी दिसली ती रंगमंभूमीचे दाेन मुखवटे सत्यात उतरवताना दिसली. बरं हे सगळं हाेत असताना कुठे गवगवा नाही, चमकूपणा नाही की, प्रमाेशन नाही. अाम्ही करताेय तुम्हीही साेबतीला या ही मायेची भावना त्यात दिसत हाेती. म्हणूनच मग बाॅलिवूड कलाकारांवर जी टीका झाली त्याला अापले मराठी कलाकार अपवाद ठरले. बाॅलीवूड कलाकारांचे उशीरा सुचलेले शहाणपण अाता माध्यमांमधून दिसून येतच अाहे. मग बिग बींची मदत असाे, अक्षय कुमारने केलेली मदत असताे वा मिका सिंगने पाकिस्तानात केलेल्या कामानंतर झालेल्या टीकेचे प्रायश्चित्त म्हणून पूरग्रस्त भागात ५० घरे बांधून देण्याची केलेली मदत असताे. ही मदतही स्वागतार्ह अाहेच. पण या लाेकांना जागं करावं लागलं अाणि अापल्या मराठी कलाकारांनी लाेकांना मदत करण्यासाठी जागं केलं हा त्यातला फरक अाहे. अार्थिक मदत गरजेची अाहेच. पण, तातडीची मदत अाेळखून ती गरजूंपर्यंत पाेहाेचवण्याचं त्यावेळचं प्राधान्याचं अाणि महत्त्वाचं काम हाेतं. त्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असते. ती वेळ अापल्या कलाकारांनी अाेळखली अाणि वेळ दवडूही न देता लगेच पडद्यामागून येऊन प्रत्यक्ष मैदानात उतरले. अनेकांनी अापले कार्यक्रम, शूटिंग रद्द केले अाणि कामाला लागले. यात बॅकस्टेज अार्टिस्टही मागे नव्हते. पाेतीच्या पाेती धान्य उचलण्यापासून ती ट्रकमध्ये ठेवण्यापर्यंत अाणि ते प्रत्यक्ष पूरग्रस्तांपर्यंत पाेहाेचवण्यासाठी अनेकांनी घरच्यासारखे काम केले. त्यासाठी कलाकारांनी मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण, पिंपरी-चिंचवड अशा फेऱ्या मारल्या अाणि जास्तीत जास्त उपयाेगी साहित्य जमा केले. अार्थिक मदत देश शकणाऱ्यांपुढे हात पसरले अाणि माेठी रक्कमही काहींनी गाेळा करत सरकारी तिजाेरीत जमा केली ती अापल्या मायबाप रसिकांना, माणसांना पुन्हा उभं करण्याची.  नाटक, चित्रपटांतून अनेकदा सामाजिक संदेश दिलेच जातात. काही कलाकार त्याचं अनुकरण प्रत्यक्षात अाणतात, तर काही कलाकार त्याच्याकडे काम म्हणून बघतात अाणि साेडून देतात. पण, काही कलाकार अापले कलावंताचे मुखवटे बाजूला ठेऊन सामान्य माणसाचा रंग लावून उभे राहतात तेव्हा त्यांच्यातील माणूसपण दिसून येतं. एरवी कलाकारांच्या उशीरा येण्यानं, एखाद्या ठिकाणी त्यांनी घातलेल्या वादानं किंवा समाजावर काही विपरीत परिणाम हाेईल अशा त्यांनी केलेल्या कृत्यानं त्यांना टीकेचं धनी व्हावं लागतं त्या वेळी तर रसिक त्यांच्यावर तुटून पडतात. पण, त्यांच्या उत्तम कामालाही दाद देतात, फक्त दादच नाही, तर अशा कामांत प्रत्यक्ष सहभागीही हाेतात हेच या अनन्य साधारण कामातून दिसून अालं. म्हणूनच तर कलाकारांच्या अशाच अागळ्या-वेगळ्या कामामुळेच मराठी रंगभूमी, चित्रपटाचं नावं या क्षेत्राच्या मुकुटावर अाहे हे काेणीही नाकारू शकत नाही.  लेखकाचा संपर्क : ७७७००५९००९