Home | National | Other State | Audio clips dispute in Karnataka; Now the inquiry will be done by SIT

कर्नाटकमधील ऑडिओ क्लिप वाद; आता एसआयटीद्वारे होणार चौकशी

वृत्तसंस्था | Update - Feb 12, 2019, 09:46 AM IST

विधानसभा अध्यक्षांच्या सूचनेनंतर केली घोषणा, काँग्रेसचा लोकसभेत गोंधळ

 • Audio clips dispute in Karnataka; Now the inquiry will be done by SIT

  बंगळुरू- जेडीएसच्या आमदाराला लालूच दाखवणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येदियुरप्पा यांच्या संभाषणाच्या ऑडिओ क्लिप प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी सोमवारी राज्य विधानसभेत केली. कुमारस्वामी यांनीच ही ऑडिओ क्लिप प्रसिद्ध केली होती.

  कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष रमेशकुमार यांचेही नाव या वादात ओढण्यात आले आहे. त्यामुळे अध्यक्ष चांगलेच संतप्त झाले होते. विधानसभेचे अध्यक्ष नि:पक्षपाती असतात, त्यामुळे त्यांच्या पदाची प्रतिष्ठा कायम राखली जावी, असे मत सर्व सदस्यांनी नोंदवले. त्यानंतर ‘या प्रकरणातील सत्य बाहेर येण्यासाठी एसआयटी स्थापन करा आणि मला १५ दिवसांत दिलासा द्या,’ असे अध्यक्षांनी सुचवले. त्यानंतर कुमारस्वामी यांनी ही घोषणा केली.

  कुमारस्वामी म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांवर लावण्यात आलेल्या आरोपांमुळे मलाही वेदना झाल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणातील सत्य जाणून घेण्यासाठी एसआयटी चौकशीची परवानगी द्यावी, अशी विनंती त्यांनी अध्यक्षांना केली. मात्र, राज्य सरकार एसआयटीचा गैरवापर करण्याची शक्यता असल्याने आमचा त्यांच्यावर विश्वास नाही, त्यामुळे अध्यक्षांवर झालेल्या आरोपांपुरतीच या चौकशीची व्याप्ती असावी, असे मत भाजपच्या सदस्यांनी व्यक्त केले. त्यावर, ‘एसआयटीने फक्त सत्य जाणून घ्यावे,’ अशी सूचना अध्यक्षांनी केली.

  केंद्रीय मंत्री गौडा यांनी फेटाळले आरोप :
  केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले की, कर्नाटकातील सत्तारूढ आघाडीतील काँग्रेस आणि जेडीएस या दोन पक्षांतच संघर्ष सुरू आहे. मुख्यमंंत्रिपदाची खुर्ची वाचवण्यासाठी हे दोन्ही पक्ष भाजपवर आरोप करत आहेत, येथे करण्यात आलेले आरोप पूर्णपणे खोटे आणि सत्यापासून दूर असणारे आहेत, असा दावा त्यांनी केला. दरम्यान, कर्नाटकात अगोदच सुरू असलेल्या राजकीय नाट्यात या आणखी एका प्रकरणाची भर पडली असल्याने गोंधळाची स्थिती आहे.

  ऑडिओ क्लिप जारी झाल्यानंतर झाले आरोप-प्रत्यारोप
  कर्नाटकमधील काँग्रेस व जेडीएस आघाडीचे सरकार अस्थिर करण्यासाठी येदियुरप्पा हे जेडीएसच्या एका आमदाराला आमिष दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे दर्शवणारी ऑडिओ क्लिप मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी गेल्या शुक्रवारी जारी केली होती. भाजपला मदत करण्यासाठी जे आमदार मदत करतील त्यांच्या बाजूने निर्णय देण्यासाठी अध्यक्षांना ५० कोटी रुपये देऊ असे येदियुरप्पा या क्लिपमध्ये म्हणत आहेत, असा आरोपही कुमारस्वामी यांनी केला होता. मात्र, हे आरोप सिद्ध झाल्यास आपण आमदारपदाचा राजीनामा देऊन राजकारणातून निवृत्त होऊ, असे येदियुरप्पा यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर राज्यात आमदारांच्या खरेदीसाठी घोडेबाजार सुरू असल्याच्या आरोपांवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते.

  कर्नाटकातील लोकसभेतही वादाचे पडसाद
  नवी दिल्ली- कर्नाटकमधील घोडेबाजाराच्या वादाचे सोमवारी लोकसभेतही पडसाद उमटले. काँग्रेसच्या सदस्यांनी येदियुरप्पांची कथित ऑडिओ क्लिप दाखवली. शून्य प्रहरात मल्लिकार्जुन खरगे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. विधानसभेच्या अध्यक्षांना तसेच न्यायमूर्तींनाही ‘मॅनेज’ करता येऊ शकते असा उल्लेख या क्लिपमध्ये आहे, असा दावा खरगे यांनी केला. जेडीएसचे नेते एच. डी. देवेगौडा म्हणाले की, पुन्हा ‘ऑपरेशन कमळ’सारख्या गोष्टी घडवण्याची परवानगी दिली जाऊ नये. काँग्रेसचे सदस्य ‘ऑपरेशन कमळ, लोकशाहीची हत्या’ असा मजकूर लिहिलेले फलक घेऊन हौद्यात उतरले होते.

Trending