आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउस्मानाबाद : साहित्य संमेलन हा रिकामटेकड्यांचा उपक्रम आहे, असे मत मांडून कुठल्याही साहित्य संमेलनापासून फटकून राहणारे ज्येष्ठ साहित्यिक आणि ज्ञानपीठ हा देशातील सर्वोच्च साहित्यसन्मान मिळवणारे भालचंद्र नेमाडे आता लवकरच वाचकांप्रमाणेच 'प्रेक्षकां'ना सामोरे जाणार आहेत. नेमाडे यांच्या साहित्याचे रसिक आता थेट नेमाडे यांना दृतश्राव्य स्वरुपातही भेटू शकणार आहेत. श्रीरामपूर येथील शब्दालय प्रकाशनाच्या सुमती लांडे यांच्याकडे नेमाडे यांच्यावर चित्रित केलेला तब्बल ४८ तासांचा दृकश्राव्य खजिना असून, लवकरच तो माहितीपट, लघुपटाच्या रूपाने अवतरणार आहे.
या संदर्भात दिव्य मराठीला माहिती देताना सुमती लांडे म्हणाल्या,'दोन हजार साली मी स्वत: पुढाकार घेऊन इगतपुरी येथील एका रिझॉर्टमध्ये नेमाडे यांच्याशी संवाद साधण्यासाठी निवडक तीस तज्ज्ञांना आमंत्रित केले होते. विविध क्षेत्रातील मान्यवरांसह अर्थातच साहित्य क्षेत्रातील तज्ज्ञांचाही त्यात समावेश होता. निमित्तही निराळे होते. प्रसिद्ध लेखक रंगनाथ पठारे यांच्या वयाचा सुवर्णमहोत्सव आणि त्यांच्या लेखनाचा रौप्यमहोत्सव, असा योग जुळून आला होता. एका उत्तम लेखकाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात, दुसऱ्या ज्येष्ठ सर्जनशील लेखकाशी मनमोकळा संवाद, असा या उपक्रमामागील हेतू होता. ज्येष्ठ समीक्षक - लेखक गो. मा. पवार, प्रभाकर कोलते, सतीश काळसेकर, राजन गवस, मधुकर वाघोडे, नीळकंठ कदम, सुधाकर यादव अशी अनेक मान्यवर मंडळी या संवादात सहभागी झाली होती. तीन दिवस सतत हा दीर्घ संवाद सुरू होता. त्याचे चित्रीकरण करण्यात आले होते. त्यानंतर नेमाडे सरांशी विविध निमित्ताने गप्पा झाल्या. त्याचेही रेकार्डिंग केले होते. हा सारा खजिना एकत्रित स्वरुपात आणला पाहिजे, असे सातत्याने वाटत राहिले. त्याला आता मूर्त रूप येणार आहे.
ज्ञानपीठ विजेत्या लेखकाचा जीवनपट उलगडणार
मराठी साहित्यविश्वापुरताच नाही तर संपूर्ण साहित्याचा समग्र परिघच भालचंद्र नेमाडे या लेखकाने आवाक्यात घेऊन, विविध पद्धतीने त्याची मांडणी आपल्या साहित्यातून केली आहे. आपल्या लेखनातून मानवी जीवनाला थेट भिडणारे त्यांचे लेखन, कोणत्या प्रेरणा घेऊन निर्माण झाले, त्यांची जडणघडण कशी झाली, कुठे झाली, कुणाचे प्रभाव त्यांच्यावर होते किंवा आहेत..नेमाडे स्वत:विषयी काय म्हणतात. कुठल्या परिसरात ते वावरले.. या साऱ्यांचा विस्तृत दस्तावेज या दृकश्राव्य खजिन्यातून पुढे येईल. या निमित्ताने मराठी भाषेला ज्ञानपीठ सन्मान प्राप्त करून देणाऱ्या लेखकाचा संपूर्ण जीवनपटच उपलब्ध होईल. यासंबंधीचा तपशील लवकरच जाहीर केला जाईल, असे सुमती लांडे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.