महापालिकेचे दुर्लक्ष : प्लेट काढल्या नाही, औज बंधारा माती भरावाला धोका

प्रतिनिधी | Update - Aug 28, 2018, 10:50 AM IST

शहराला पाणीपुरवठा होणारा औज येथील बंधारा ओसंडून वाहत आहे. खबरदारी म्हणून वेळीच प्लेट (दारे) काढली नाहीत.

 • Auj dam overfull

  सोलापूर- शहराला पाणीपुरवठा होणारा औज (ता. दक्षिण सोलापूर) येथील बंधारा ओसंडून वाहत आहे. खबरदारी म्हणून वेळीच प्लेट (दारे) काढली नाहीत. पाण्याचा प्रचंड दाब बंधाऱ्यावर येत असल्याने बाजूच्या माती बंधाऱ्याला धोका पोहोचू शकतो. दरम्यान, सोमवारी प्लेट्स काढण्याचे काम सुरू होते.


  बंधारा चार मीटर उंचीचा असून दरवाजे तीन मीटर उंचीचे आहेत. तो ओसंडून वाहत असल्याने एक मीटर खालून दारे वर काढण्याचे काम अवघड होत आहे. एरव्ही पावसाळ्याच्या तोंडावर खबरदारी म्हणून दरवाजे महापालिकेतर्फे काढण्यात येतात. मात्र, यंदा काढण्यास उशीर झाला. दरम्यान, सोमवारी दरवाजे काढण्याचा आदेश दिल्याचे प्रभारी नगरअभियंता गंगाधर दुलंगे यांनी 'दिव्य मराठी'ला सांगितले.


  शहरास पाणीपुरवठा करणारी औज व चिंचपूर बंधारे ओसंडून वाहात आहेत. दोन दरवाजे रिकामे सोडून इतर दरवाजे गरजेनुसार बंद करणे आवश्यक होते. मागील पंधरा दिवसापासून उजनी आणि वीर धरणातून येणारे विसर्ग पाहता, औज बंधारा येथील प्लेट काढणे आवश्यक होते. सोमवारी उजनी १०० टक्केपेक्षाही जास्त भरले. त्यामुळे भीमा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला. यापूर्वी सोडण्यात आलेले पाणी आणि पाऊस पाहता औज बंधारा ओव्हरफ्लो होत आहे.


  पाणीसाठ्यासाठी दारे ठेवली
  पाणीपुरवठ्याचे काम आहे. पाणीसाठा आवश्यक असल्याने काही प्लेट ठेवले होते. त्यावरून पाणी वाहत असून, प्लेट काढण्यास सांगितले. त्यानुसार काम सुरू आहे.
  - गंगाधर दुलंगे, प्रभारी नगर अभियंता, मनपा


  १० वर्षांत ऑगस्टमध्ये उजनी धरण भरण्याची चौथी वेळ
  ऑगस्टमध्ये पुणे जिल्ह्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे मागील वर्षापेक्षा यंदा चार दिवस आधीच उजनी धरणाने शंभरी ओलांडली. गेल्या १० वर्षांत ऑगस्टमध्ये उजनी धरण भरण्याची ही चौथी वेळ आहे. यापूर्वी २०११ मध्ये १ ऑगस्ट, २०१३ मध्ये १५ ऑगस्ट रोजी तर मागील वर्षी ३१ ऑगस्ट तर यंदा २७ ऑगस्ट रोजी उजनी धरण १०० टक्के भरले आहे. मात्र, अपुऱ्या पावसामुळे २०१२-१३ आणि २०१५-१६ वर्षी धरण १०० टक्के भरले नव्हते.


  सोमवारी धरणात येणारा विसर्ग पाहता धरणाचे १६ दरवाजे उघडून भीमा नदीमध्ये १२ हजार क्युसेकने पाणी साेडले आहे. २००७-०८ ते २०१७-१८ या १० वर्षाच्या कालावधीत उजनी धरणाने ऑगस्ट महिन्यातच चार वेळा शंभरी ओलांडली आहे.


  मागील १५ वर्षात धरण तीन वेळा भरले नाही. सन २००३-०४ मध्ये उजनी धरणाची पाणीपातळी वजा ६.८३ टक्के होती तर २०११-१२ साली उजनी धरणात १६.२६ टक्के (८.७१ टीएमसी) तर २०१५-१६ साली १४.६० टक्के (७.८२ टीएमसी) पाणीसाठा होता. २००४-०५ ते २००८-०९, २०१०-११ व २०११-१२, २०१४-१५, २०१६-१७ व २०१७-१८ अशी ९ वर्ष उजनी धरणाने १०० टक्के भरले आहे. यामध्ये बहुतांश वेळा सप्टेंबर महिन्यातच उजनी धरणाने पाणीपातळी ओलांडली आहे.

  आष्टी तलाव भरून घेण्यास सुरुवात
  कालव्यातून सोडलेल्या पाण्याद्वारे लहान-मोठे पाझर तलावासह आष्टी (मोहोळ) तलाव भरून घेण्यास सुरुवात केली आहे. पुणे जिल्ह्यातून उजनी धरणात येणारा िवसर्ग वाढल्यास भीमेत आणखी पाणी सोडले जाईल, असे प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी सांगितले.

Trending