आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद विमानतळाचे नाव आता छत्रपती संभाजी महाराज विमानतळ! मुख्यमंत्र्यांची घोषणा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - एकेकाळी आशिया खंडातील सर्वात झपाट्याने वाढणारे औद्योगिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबादच्या विमानतळाचे नामकरण करण्यात आले आहे. महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी यासंदर्भातील घोषणा केली. त्यानुसार, औरंगाबाद विमानतळ आता छत्रपती संभाजी महाराज विमानतळ होणार आहे. औरंगाबाद जिल्ह्याचे नाव संभाजी नगर करण्यासाठी हालचाली सुरू असल्याची पुन्हा चर्चा सुरू आहे. त्यातच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी या नामकरणाची घोषणा केली.

दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळवल्यानंतर केंद्र सरकारकडे पाठवणार -मुख्यमंत्री

औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज विमानतळ, औरंगाबाद असे करण्याची घोषणा गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, विमानतळाचे नामांतर करण्यासंदर्भात लोकप्रतिनिधींकडून सातत्याने मागणी होत आहे. त्याचप्रमाणे औरंगाबाद महानगरपालिकेने देखील "धर्मवीर राजे संभाजी भोसले विमानतळ" असे नाव करण्याबाबत ठराव संमत केला. लोकसभेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. त्याप्रमाणे मंत्रिमंडळाने आज (गुरुवारी) या प्रस्तावास मान्यता दिली आणि विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांची मान्यता घेऊन केंद्र शासनाच्या नागरी विमान मंत्रालयाकडे तो पाठविण्यात येईल.


उद्योग मंत्री तसेच शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी सांगितल्याप्रमाणे, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार जनतेला दिलेल्या आश्वसनांविषयी कटीबद्ध आहे. औरंगाबादच्या चिकलठाण येथे हे विमानतळ आहे. यापूर्वी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई असे करण्यात आले आहे. तर कोल्हापूर विमानतळाचे नाव छत्रपती राजाराम महाराज विमानतळ, कोल्हापूर असे करण्यात आले आहे. याच धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला अशी माहिती सरकारच्या वतीने देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...